मालवण आणि सिंधुदुर्ग यांचे नाते एवढे घट्ट आहे की मालवणच्या परिसरात यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी, स्थळे असतील असा विचारसुद्धा पर्यटकांच्या मनात कधी येत नाही. परंतु मालवणच्या जवळच कुणकवळे इथली देवीची अत्यंत सुंदर मूर्ती हे इथले खास आकर्षण आहे. अगदी आड मार्गावर असलेल्या गावात इतकी शिल्पजडित देवीची मूर्ती असेल यावर विश्वासच बसत नाही. मालवणपासून हे ठिकाण सुमारे १६ किलोमीटरवर आहे. मालवणहून कसालच्या दिशेने जायला लागले की कुंभारमाठ नावाचे गाव लागते. इथून पुढे चौके फाटा आहे. या फाटय़ापासून एक रस्ता कुणकवळे गावाला जातो. कुणकवळे गावात श्रीदुर्गादेवीचे मंदिर आहे. प्रत्यक्ष धर्मराजांनी या देवीची स्थापना केली अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. १९६१ साली झालेल्या वादळाचा तडाखा बसल्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करणे गरजेचे झाले. खास कोकणी पद्धतीची सुंदर अशी दीपमाळ एका ओटय़ावर उभी आहे. मंदिराला भव्य असा सभामंडप बांधलेला आहे. आणि या मंदिरात आहे अतिशय देखणी साडेचार फूट उंचीची दुर्गादेवीची उभी मूर्ती. चतुर्भुज देवीच्या हातात तलवार, चक्र, त्रिशूळ ही आयुधे असून डाव्या हातात परळ आहे. पायाशी दोन्ही बाजूला सेविका दाखवल्या आहेत. मूर्तीवर वस्त्रप्रावरणे, दागदागिने, ठसठशीत कोरलेले आहेत. दंडामध्ये वाकी असून बाजूला मोर दाखवले आहेत. देवीच्या पायात खडावा आहेत तर केशसंभार अप्रतिम आहे. देवीच्या पाठीमागे कोरलेली प्रभावळ फारच देखणी आहे. मूर्तीसमोर दगडी प्रसाद पात्र आहे. मालवणच्या भटकंतीमध्ये, अत्यंत देखणी अशी ही मूर्ती, आडवाटेला असली तरी खास वेळ राखून पाहायला हवी.
आडवाटेवरची वारसास्थळे : श्रीदुर्गादेवी-कुणकवळे
मालवणच्या जवळच कुणकवळे इथली देवीची अत्यंत सुंदर मूर्ती हे इथले खास आकर्षण आहे.
Written by आशुतोष बापट
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-03-2016 at 04:01 IST
मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shri durga devi at malvan