विविधतेने नटलेला विदर्भ हा नैसर्गिक, धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. विदर्भातील अनेक प्रसिध्द ठिकाणांपैकी एक म्हणजे चिमूर येथील श्री बालाजी मंदिर. महाराष्ट्राचे तिरुपती या नावाने प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे असेलेले बालाजी देवस्थान. याला श्रीहरी बालाजी असे म्हणतात. तिरुपतीच्या बालाजीला बोललेला नवस इथे फेडलेला चालतो, पण या बालाजीला केलेला नवस तिरुपतीला फेडले जात नाहीत, ते इथेच फेडावे लागतात, असा समज आहे. कथा आहे इ. स. १७०४ ची. चिमूर येथील शेतकरी भिकुजी डाहुले पाटील यांनी जनावराच्या गोठय़ासाठी जमीन खणायला सुरूवात केली असता एके ठिकाणी कुदळ आदळले आणि धातूसारखा आवाज आला. भिकू पाटील यांनी खोदणे थांबवले. त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नानुसार त्यांनी पुन्हा जमीन खोदण्यास सुरूवात केली आणि तिथे एक सुंदर मूर्ती वर आली. तिची प्रतिष्ठापना त्याच ठिकाणी करण्यात आली, अशी अख्यायिका आहे. पुढे इ. स. १७५७ मध्ये जानोजी भोसले यांनी पेशव्यांचे सरदार देवाजीपंत चोरघडे यांच्या विनंतीवरून चिमूर इथे २०० एकर जमीन मंदीर उभारण्यासाठी दिली. तटबंदीयुक्त प्रासाद असलेल्या मंदिराला उंच प्रवेशद्वार असून त्यावर कोरीवकाम केलेले आहे. लाकडी सभामंडपाला १२ खांब आहेत. त्यावर हत्ती, वाघ अशा प्राण्यांची चित्रे कोरलेली आहेत. याच्या पुढे चार दगडी खांब असलेला अजून एक सभामंडप आहे. त्याला वर आधारशिळा बसवलेल्या आहेत. बालाजीची मूर्ती बरीचशी तिरुपतीच्या मूर्तीसारखीच आहे. मंदिराच्या आवारात एक गरुड खांब असून बाहेर काही पुजारी मंडळींच्या समाध्या दिसतात. या ठिकाणी माघ शुद्ध पंचमीला बालाजीची घोडायात्रा भरते. एका रथावर लाकडी घोडा ठेवून त्यावर बालाजीच्या मूळ मूर्तीची लाकडी प्रतिकृती ठेवतात व त्याची मिरवणूक काढली जाते. इतके महत्त्वाचे देवस्थान आपल्या राज्यात आहे, याची स्थानिकांव्यतिरिक्त इतरांना फारशी माहिती नाही. विदर्भातील पर्यटनात एक दिवस राखून ठेवून चिमूरच्या बालाजीचे दर्शन घेता येईल.
आडवाटेवरची वारसास्थळे : चिमूरचा बालाजी
विविधतेने नटलेला विदर्भ हा नैसर्गिक, धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे.
Written by आशुतोष बापट
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-03-2016 at 01:28 IST
मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri balaji temple in chimur