वैष्णोदेवी यात्रा करणाऱ्या यात्रेकरू – पर्यटकांसाठी जम्मूजवळ अजून एक पर्यटन स्थळ विकसित होत आहे. जम्मू आणि काश्मीर सरकारच्या पर्यटन विभागाने, २०१६च्या जुल महिन्यातील पहिल्या आठवडय़ात, सुचेतगड सीमा प्रथमच पर्यटकांसाठी खुली केली. जम्मू आणि काश्मीर राज्यातील पर्यटनात, सीमा पर्यटन विकसित करण्याच्या टप्प्यातील हा पहिला टप्पा होय. वाघा येथील सीमेच्या धर्तीवर ही ‘सुचेतगड सीमा’ विकसित करून पर्यटकांना आकर्षति करणे आणि त्याद्वारे स्थानिकांना रोजगार मिळवून देणे असा राज्य सरकारचा हेतू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीमेजवळ जाण्यापूर्वी प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांची नोंद केली जाते आणि प्रत्येकाला ओळखपत्र जमा करावे लागते. लगेचच जकातीची इमारत आहे. फाळणीपूर्वी येथेच जम्मू-सियालकोट रेल्वेमार्गावरील सुचेतगड स्थानक होते. ही ४३ किमी नॅरो गेज रेल्वे जम्मू आणि काश्मीरमधील पहिली रेल्वे. या इमारतीतील एका दालनात सीमा सुरक्षा दलाची माहिती देणारी चित्रफीत पाहता येते. तेथेच सीमा सुरक्षा दलाची माहिती देणारे छोटेसे चित्रप्रदर्शनही कायमस्वरूपी मांडण्यात आलेले आहे. येथून पुढे गेल्यावर आपण ‘सियालकोट – ११ कि.मी. आणि लाहोर – १४१ किमी’ असे लिहिलेल्या दगडापाशी पोहोचतो. येथून पाकिस्तानची ‘इनायत’ चौकी २३० मीटरवर आहे. येथून एका भल्याथोरल्या द्वारातून पश्चिमेला आल्यावर दोहोबाजूस तारांचे भक्कम कुंपण, त्याच्या आत उंच झाडांची रांग आणि त्यामध्ये सीमेकडे जाणारा रस्ता असे दृश्य दिसते आणि पहिल्यांदा सीमा दृष्टीस पडते. सीमेअलीकडे भारताच्या भूमीवर सीमा सुरक्षा दलाची चौकी आणि पलीकडे पाकिस्तानची चौकी आहे. सीमेवर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे सीमा दगड (बॉर्डर स्टोन्स) आहेत. सीमेच्याजवळ पर्यटकांना बसण्यासाठी चौथरा आहे. पण जुल महिन्यातच राज्यात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे वाघा सीमेवर जसा कार्यक्रम होतो तसा येथे सुरू झालेला नाही. खूप धुके असल्याने अधिकाऱ्यांना नाइलाजास्तव घाई करावी लागली. पण तरीही केवळ पाच पर्यटक असताना अतिशय आपुलकीने त्यांनी आम्हाला सीमा दाखवली.

जकातीच्या इमारतीमागे रघुनाथ मंदिर आहे. जवळच पर्यटन विभागाचे विक्रीकेंद्र असून तेथे बासमती तांदूळ, सुका मेवा, केसर आदी स्थानिक पदार्थ विक्रीस आहेत. जम्मू येथून सुचेतगड केवळ २७ किलोमीटरवर आहे. जम्मूहून पाऊण-एक तासात आपण येथे पोहोचतो. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात या सीमेला भेट दिली तेव्हा खूप धुके असल्याने लांबचे काहीच दिसत नव्हते. अन्यथा जशी सीमा जवळ येते तसतसे सीमेपलीकडील शेते, टॉवर्स इ. सहज दिसतात. सीमेजवळील सुचेतगड, रणबीरसिंग पुरा येथे अनेक राईस मिल्स दिसतात.

राजन महाजन mahajan.rajendra@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suchetgarh border
Show comments