अनेक महत्त्वाची ठिकाणे अगदी हमरस्त्यालगत असूनही माहिती नसल्यामुळे ती दुर्लक्षित होतात. पुणे-सातारा रस्त्यावरच्या नसरापूर गावातील स्वराज्य स्मारक स्तंभ हे त्यातलेच एक. नसरापूरच्या फाटय़ावर डावीकडे असलेल्या शाळेजवळ कुंपण घातलेल्या प्रांगणात एक दगडी स्तंभ आहे. इ. स. १९४५ साली भोर संस्थानचे अधिपती श्रीमंत रघुनाथराव पंतसचिव यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्मारक म्हणून हा स्तंभ उभारला. एका दगडी चौथऱ्यावर खाली चौरस, मग अष्टकोनी आणि वर गोल असा हा स्तंभ आहे. या स्तंभाखाली तत्कालीन भोर संस्थानात असणाऱ्या किल्ल्यांची नावे आणि त्यांची मैलात असलेली अंतरे त्या-त्या दिशेला संगमरवरी पट्टीवर कोरलेली आहेत. हा स्तंभ इथेच का? याबद्दल एक कथा आहे. तोरणा किल्ला घेण्यासाठीचे डावपेच शिवबा आणि त्याच्या मावळय़ांनी याच ठिकाणी बसून आखले, असे म्हटले जाते. स्वराज्याचा श्रीगणेशा ज्या जागी झाला तिथेच त्याचे स्मारक हवे म्हणून भोरच्या संस्थानिकांनी हे स्मारक इथे उभारले. स्तंभावर भवानी देवीच्या पूजेचा प्रसंग कोरण्यात आला आहे. त्याखाली त्याची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला हाच मजकूर इंग्रजी भाषेत असून धनुष्यबाण आणि बाणाचा भाता कोरलेला दिसतो. तसेच स्तंभावर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेला प्रसंग आणि शिवरायांची राजमुद्रा कोरलेली आहे. जवळपास ९ मीटर म्हणजे ३० फूट उंचीचा हा स्तंभ आवर्जून पाहावा, असा आहे. ब्रिटिश राजवटीत एखाद्या संस्थानिकाने असे स्मारक उभारणे धाडसाचे होते. स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या ठिकाणी रोवण्यात आली, असा समज आहे अशा ठिकाणी उभारलेले स्मारक पाहण्यासाठी दिलेला वेळ नक्कीच सार्थकी लागेल.
ashutosh.treks@gmail.com