नेहमीच्या ठरावीक पर्यटन स्थळांऐवजी काही तरी वेगळं पाहण्यासाठी कायमच वाट वाकडी करण्याची गरज नसते. कधी कधी महामार्गालगतच थोडं धुंडाळल्यास काही पुरातन ठेवा सापडू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक वेळा प्रसिद्ध लेणी, मंदिरं यांबद्दल खूप लिहिलं जातं. प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या यादीतदेखील त्यांचा समावेश असतो. पण, अनेकदा मुख्य मार्गाच्या आसपासची अशी अनेक ठिकाणं असतात त्याबद्दल फारसं काही ऐकायला मिळत नाही. अहमदनगर जिल्ह्य़ातील पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वरची लेणी, सोमेश्वर मंदिर आणि जामगावचा किल्ला ही अशीच काही ऐतिहासिक ठिकाणं मुंबई-पुण्याहून एका दिवसातही व्यवस्थित पाहता येणारी. कल्याण-नगर रस्त्यावर नगरच्या अलीकडे ४० किलोमीटरवर आणि कल्याणपासून १७० किलोमीटरवर टाकळी ढोकेश्वर गाव आहे. महामार्ग सोडून गावात जाणाऱ्या रस्त्याने गाव पार करून पुढे गेल्यावर टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी दिसते. लेणींपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणींपासून पाऊण उंचीवर मध्य युगात बांधलेलं प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूची तटबंदी दुरूनच आपलं लक्ष वेधून घेते. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच एक दगडी रांजण आडवा पडलेला दिसतो. येथूनच पुरावशेष आपलं लक्ष वेधून घेऊ लागतात. पायऱ्या चढताना प्रवेशद्वाराच्या अलीकडे उजव्या बाजूला दोन समाधी मंदिरं आहेत. त्यावर दगडी फुलं कोरलेली आहेत. याच ठिकाणी एक शरभ शिल्पही पडलेलं आहे. हा दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी जेव्हा बांधली असेल तेव्हा प्रवेशद्वारावर शरभ शिल्प असणार, पण कालांतराने डागडुजी करताना ते मूळ जागेवरून काढून टाकलं असावं. लेणींच्या पायऱ्या चढताना नक्षीकाम केलेले दगड पायऱ्यांसाठी वापरलेले आढळतात.

टाकळी ढोकेश्वरचं मुख्य लेणं प्रशस्त आहे. लेणीत शिरताना दोन्ही बाजूला शालभंजिकेच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. सभामंडपातील डाव्या बाजूच्या भिंतीवर पाच वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका त्यांच्या वाहनांसह कोरलेल्या आहेत. त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसऱ्या बाजूला वीरभद्राची मूर्ती कोरलेली आहे. गाभाऱ्याच्या दारावर द्वारपालाचं शिल्प आहे. गाभाऱ्यात िपड आणि सभामंडपात नंदी आहे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ कोरून काढला आहे. या प्रदक्षिणा मार्गावर अनेक वीरगळ ठेवलेल्या आहेत. एक मोठा नंदीही आणि सर्पशिळा येथे ठेवलेल्या आहेत. मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाकेदेखील कोरलेले आहे. त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरून काढलेली आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या आहेत. लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे. फुलझाडांची लागवड करून परिसर सुशोभित केलेला आहे.

टाकळी ढोकेश्वरची लेणी पाहून पुन्हा महामार्गावर येऊन पारनेरचा रस्ता पकडावा. टाकळी ढोकेश्वर ते पारनेर अंतर २५ किलोमीटर आहे. पारनेरच्या पुढे चार किमीवर दोन ओढय़ांच्या संगमावर सोमेश्वर मंदिर आहे. या निसर्गरम्य ठिकाणी पराशर ऋषींची तपोभूमी होती असं स्थानिक लोक मानतात. या जागेत सध्या असलेल्या सोमेश्वर मंदिराचं बांधकाम मात्र मध्य युगात झालेलं असावं. मंदिरापर्यंत जाण्यासाठी ओढय़ावर बांधलेला पुल ओलांडावा लागतो. येथे दोन्ही ओढय़ांवर बांधारे बांधून पाणी अडवलेलं आहे. येथून मंदिराचं होणारं प्रथमदर्शन आपल्याला या जागेच्या प्रेमात पाडतं. मंदिरासाठी या जागेची योजना ज्याने केली तो खरेच निसर्गप्रेमी रसिक माणूस असणार. मंदिराच्या प्रांगणात जमिनीवर बांधलेला एक घुमट आहे. घुमटाखाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून गेल्यावर छोटासा काळोखी गाभारा आहे. त्यात िपड आहे. गाभाऱ्यात हवा खेळती राहावी यासाठी छताला झरोके केले आहेत. हे मंदिर खास ध्यानधारणा करण्यासाठी बांधलेलं असावं असं वाटतं. मुख्य मंदिर दगडात बांधलेलं आहे. मंदिराच्या भिंतींवर कोणत्याही प्रकारचं कोरीव काम किंवा मूर्ती नाहीत. मात्र मंदिराच्या परिसरात अनेक जीर्ण मूर्ती व्यवस्थित ठेवलेल्या पाहायला मिळतात. त्या जुन्या मंदिराच्या असाव्यात. मंदिर पाहून परत पुलापाशी येऊन मंदिराच्या विरुद्ध दिशेला गेल्यास दगडात बांधलेली सुंदर पुष्कर्णी आणि त्याच्या बाजूला बांधलेल्या कमानदार ओवऱ्या पाहायला मिळतात. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काही महिन्यांत हा परिसर नितांतसुंदर दिसतो.

पारनेर तालुक्यातील या दोन ठिकाणांबरोबरच पारनेरपासून १२ किमीवर असलेला जामगावचा भुईकोट किल्ला आणि त्यातील महादजी िशदे यांचा वाडा पाहण्यासारखा आहे. िशदेंनी हा वाडा रयत शिक्षण संस्थेला दान केलेला आहे. या वाडय़ात सध्या डीएड कॉलेज भरते. त्यामुळे वाडा आणि किल्ल्याचा परिसर अजूनही टिकून राहिलेला आहे.

एक दिवसाच्या भटकंतीत काही तरी वेगळं पाहायचं असेल तर हा एक चांगला आणि उत्तम पर्याय म्हणता येईल.

amitssam9@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Takali dhokeshwar someshwar caves caves history