तामिळनाडूमधील महाबलीपुरमची एकाश्म मंदिरे (रथ या नावाने ओळखली जातात) पाहायला जगभरातून लाखो लोक येतात, पण महाराष्ट्रातील एकाश्म मंदिरे स्थानिक लोकांशिवाय फारशी कोणाला परिचित नाहीत. कोल्हापूरसारख्या प्रसिद्ध ठिकाणाजवळच ही मंदिरे आहेत. अतिशय रम्य असा परिसर असलेली ही जागा किंचित वाट वाकडी करून पाहायला हवी. कोल्हापूरवरून गगनबावडामार्गे कोकणात जाताना कोल्हापूरपासून ४० कि.मी. अंतरावर आसळज गाव आहे. तिथून डावीकडे जाणारा रस्ता चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसंबे या गावी जातो. रस्ता जिथे संपतो तिथेच खालच्या भागात एका ओढय़ात रामलिंगेश्वर नावाने ओळखली जाणारी जागा म्हणजेच ही एकाश्म मंदिरे होत. त्या ओढय़ात काही अजस्र शिळा आहेत. त्यांचा खालचा भाग तसाच ठेवून वरच्या अध्र्या भागात कोरीव मंदिरे उभारलीआहेत. तीन वेगवेगळ्या प्रकारची ही खोदीव मंदिरे आहेत. इथे बांधलेल्या पायऱ्यांच्या वाटेने ओढय़ाकडे उतरत जावे. तिथे दाट झाडीत एकाच पाषाणातून कोरून काढलेले मंदिर सामोरे येते. या मंदिरांमध्ये आज कोणतीही मूर्ती नाही. परंतु अतिशय सुबक अशी घडवलेली एका दगडातली ही मंदिरे मुद्दाम पाहण्याजोगी आहेत. मंदिरांच्या शेजारीच एका मोठय़ा खडकामध्ये काही कोनाडे खोदलेले असून त्यात शिवलिंगे कोरलेली दिसतात. तसेच त्या मोठय़ा खडकाखालून पुढे गेले की एक मोठे शिवलिंग असून त्यावर वरच्या दगडातून झिरपणाऱ्या पाण्याचा सतत अभिषेक होत असतो. दक्षिण काशी कोल्हापूर आणि पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या सीमेवरील ही मंदिरे आज तरी अत्यंत दुर्लक्षितच आहेत.
ashok19patil65@gmail.com