हिमाचलमधील शिमल्यापासून अर्ध्या  तासाच्या अंतरावर असलेले छोटेसे गाव मशोबरा. मनालीपासून थोडे लांब म्हणजे साधारणपणे सात-आठ तासांवर असलेले मशोबरा थंड हवेचे ठिकाण आहे. येथील आरक्षित सूचिपर्णी वृक्षांचे जंगल पूर्वपरवानगी घेऊन बघता येते. पाइन, ओक, देवदार, मेपल, इंग्लिश हॉर्स चेस्टनटच्या फुलांची खूप झाडे इथे आढळून येतात. दुर्मीळ पक्षी खास करून हिमालयीन गरुड इथे दिसून येतात. सभोवतालचे डोंगर आणि उंचच-उंच झाडांच्या संगतीतला आपला वेळ इथे छान जातो.

ब्रिटिश अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी बांधलेले ब्रिटिशकालीन स्थापत्यकला दर्शविणारे व्हिला आणि काही जुने बंगले मशोबरात आढळतात. ब्रिटिश राजवटीत लॉर्ड माऊंटबॅटनचे उन्हाळी निवासस्थान इथे होते.

ते नंतर राष्ट्रपती निवास बनले. त्यानंतर ही जुनी भव्य वास्तू शासकीय कामकाजासाठी वापरली जाऊ लागली. स्थानिक देवाची महासूची जत्रा मे महिन्यात असते. त्या वेळेस अनेक नृत्यप्रकार बघायला आणि स्थानिक लोकसंगीत ऐकायला मिळते. क्रेग्नानो हे इथले चांगले पर्यटनस्थळ आहे. मशोबरामधील सफरचंदांच्या बागा, जवळचा सिमल्याचा माल-रोड, हातू शिखर पाहण्यासारखी आहे. मार्च ते मे महिन्यात करण्यासारखे राफ्टिंग, ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग, पाराग्लायिडग आदी साहसी खेळ मशोबरात प्रसिद्ध आहेत. भारतात पाराग्लायिडगसाठी बरेच जण मशोबरामध्ये नाही तर सहा तासांवर असलेल्या बिर-बिलिंगमध्ये खास पाराग्लायिडगसाठी जातात. इथले ट्रेक्सही चांगले आहेत.

कसे जाल?

जवळचे विमानतळ आणि

रेल्वे स्थानक : सिमला.

दिल्ली, चंदिगढ, जयपूर, अमृतसर, बेंगळूरु, लेह आदी ठिकाणाहून बससेवा.

sonalischitale@gmail.com

Story img Loader