अष्टविनायकातील पाली गावापासून १४ किलोमीटर अंतरावर खडसांबळे नावाचे एक छोटेसे गाव आहे. याच गावाच्या पाठीमागे डोंगरात मध्यावर एक लेणी समूह कोरलेला आहे. चहू बाजूने जंगलाने वेढलेल्या या लेण्यांना भेट द्यायची झाल्यास गावातून वाटाडय़ा घेणे आवश्यक ठरते. गावापासून लेण्यांपर्यंत पोहोचायला तासाभराची सोपी चढाई करावी लागते. पण थोडे कष्ट घेऊन पठारावर पोहोचताच येथील हिरवाईने नटलेला निसर्ग पाहून घेतलेल्या श्रमाचे चीज होते. दूर दूरवर पसरलेले हिरवे गवताच्छादीत पठार, त्यापलीकडे गुटख्यापासून ते थेट हिरडीपर्यंत (गुटखा-हिरडी ही घाटमाथ्यावरील गावे आहेत) आडवी पसरलेली सह्य़धार आणि त्यावरून मुसंडी मारून वाहणारे अनेक धबधबे असा नयनरम्य देखावा निरखत पुन्हा जंगलात शिरायचे आणि थेट लेणी गाठायची.
लेण्यांच्या समोर येताच विशेष लक्ष वेधून घेतो तो येथील विस्तीर्ण सभागृह. मात्र दरड कोसळून व छत खचून त्यातील बहुतांश गुहांचा प्रवेश बंद झाला आहे.
डोंगरमाथ्यावरून ओघळणारे पाणी लेणींच्या थेट पुढय़ात कोसळते. श्रावणात येथे गेल्यास या पाण्यावर पडणाऱ्या तिरप्या सूर्यकिरणांमुळे पाण्यात एकात एक गुरफटलेली अनेक इंद्रधनुष्यं पाहायला मिळतात. खडसांबळे लेण्यांची सफर एका अपरिचित वारसास्थळाची भेट आणि सुगम्य जंगल भटकंती असा दुहेरी आनंद देऊन जाते.
प्रीती पटेल – patel.priti.28@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा