ट्रेकिंग करताना काही वेळा सोपे प्रस्तरारोहणाचे टप्पे चढून जावे लागतात. सुरक्षेच्या दृष्टीने तिथे प्रस्तरारोहण तंत्र व गिअरचा वापर करावा लागतो. किल्ल्यांवरील तुटलेल्या पायऱ्यांचे टप्पे किंवा कठीण ट्रव्हर्स पार करताना सामान्य प्रस्तरारोहण तंत्र व गिअरची माहिती असावी लागते. संघातील सर्वच सदस्यांना हे तंत्र अवगत नसले तरी प्रस्तरारोहणाचा टप्पा प्रथम चढून जाणाऱ्या सदस्याला त्याची माहिती असायला हवी. संघातील इतर सभासदांना याबाबत माहिती असल्यास लीडरवरील ताण कमी होतो व वेळेचीही बचत होते.
प्रस्तरारोहणातील सामान्य बाबी
सरावाने कौशल्य वाढवणे व तंत्र अद्ययावत करणे- कोणत्याही खेळात सराव महत्त्वाचा असतो. सरावामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होतेच; त्याचबरोबर प्ररस्तरारोहणाच्या वेळी शरीर व हातापायांच्या हालचाली व्यवस्थित होतात. सरावाअभावी हातापायांच्या हालचाली झटपट न झाल्यामुळे सोप्या प्रस्तरिभतीवरही गिर्यारोहकाला आरोहण करणे कठीण जाते. हातापायांवर ताण येऊन लवकर थकवा येऊ शकतो. परिणामत: आधार सुटून प्रस्तरारोहक पडण्याची भीती जास्त असते. सराव करताना छोटय़ा-छोटय़ा आधारांवर जास्त वेळ उभे राहण्याचा सराव करावा.
गार्डिनग- गार्डिनग म्हणजे कडय़ातील आधार मोकळे करण्याचे तंत्र. शेवाळ, माती, दगड, गवत, छोटी झाडे यांमुळे कडय़ातील आधार बुजले जातात. आरोहण करताना घट्ट पकड मिळविण्यासाठी असे बुजलेले आधार मोकळे करावे लागतात.
आधारांची भक्कमता तपासणे- सह्यद्रीतील हवामानामुळे तिथला प्रस्तर ठिसूळ असतो. आरोहण करताना ठिसूळ आधार निखळून अपघात होऊ शकतात. म्हणून आरोहण करताना एखाद्या आधारावर भार देण्यापूर्वी तो आधार भक्कम आहे की ठिसूळ हे तपासून मगच त्यावर भार द्यावा. भक्कमता तपासताना अतिरिक्त शक्ती लावू नये किंवा पायाने जोरात प्रस्तर ढकलू नये. यामुळे एखादा सल दगड खाली पडून खालचा आरोहक जखमी होऊ शकतो.
त्रिसूत्री- प्रस्तरिभतीवर शरीर तोलून धरण्यासाठी वापरले जाणारे थ्री पॉइंट तंत्र हे मुक्त प्रस्तरारोहणाचा पाया आहे. कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध आरोहक चढण्याचा प्रयत्न करीत असतो. गुरुत्वाकर्षण बल त्याला खाली खेचत असते. अशा वेळी दोन हात किंवा दोन पाय यांपकी कोणत्याही तिघांची पकड आधारावर असायला हवी. वरचा आधार धरताना किंवा त्याची भक्कमता तपासताना उर्वरित हात व दोन्ही पाय यांची पकड आधारांवर असायला हवी. त्याचप्रमाणे पाय वरच्या आधारावर टाकताना एक पाय व दोन्ही हात यांची पकड आधारांवर असायला हवी. या तंत्रामुळे गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध सहजपणे जास्त शक्ती न वापरता आरोहण करता येते. काही ठिकाणी आधार नसल्यामुळे एक हात व एक पाय यांवरच तोल सांभाळून उभे राहावे लागते, तर प्रस्तरारोहणाच्या वरच्या ग्रेडच्या क्लायम्बिंगमध्ये ओव्हरहँगचे टप्पे चढून जाताना फक्त दोन्ही हातांच्याच शक्तीचा वापर केला जातो.
तोल सावरणे- खालच्या आधारावरून वरच्या आधारावर जाताना किंवा काही वेळा एखाद्या आधारावर उभे राहताना शरीराचा तोल सावरावा लागतो. योग्य तोल सावरणे म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा केंद्रिबदू पायांवर केंद्रित करणे. तोल सावरल्यामुळे आधारावर किंवा वरच्या आधारावर जाण्यासाठी जास्त शक्ती वापरावी लागत नाही. त्यामुळे आरोहक लवकर थकण्याचे प्रमाण कमी होऊन तो जास्त वेळ आरोहण करू शकतो. तोल न सावरल्यास जास्त शक्ती वापरावी लागून आरोहक लवकर थकेल.
सुरक्षित पडण्याचे तंत्र- आरोहक पडल्यानंतर त्याच्या शरीराचा जास्तीतजास्त भाग प्रस्तराला घर्षण होऊन किंवा आपटून इजा न होता सुरक्षित राहावा यासाठी सुरक्षित पडण्याचे तंत्र विकसित केले गेले आहे. या तंत्राप्रमाणे पडताना आरोहक प्रस्तरिभतीला हात व पाय लावून धरतो व त्यायोगे शरीराचा उर्वरित भाग प्रस्तरापासून लांब ठेवतो. पायात बूट असल्यामुळे पायाच्या तळव्यांना इजा होण्याची शक्यता कमी असते; परंतु हाताच्या तळव्यांना मात्र इजा होऊ शकते. तरीही उर्वरित शरीर हे सुरक्षित राहते.
ashok19patil65@gmail.com