‘कॅरॅबिनर’ म्हणजे अ‍ॅल्युमिनिअमच्या मिश्र धातूपासून बनवलेली साधारण लंबवर्तुळाकार कडी असते. या कडीला एक झडप असते व झडपेत बसवलेल्या स्प्रिंगमुळे झडपेवर सतत ताण ठेवलेला असतो. त्यामुळे झडप उघडण्यासाठी बोटाने त्यावर दाब द्यावा लागतो. दाब काढल्याबरोबर झडप आपोआप बंद होते. आरोहण करताना कोणतीही दोन साहित्य कॅरॅबिनरच्या साहाय्याने जोडता येतात. त्यामुळे कॅरॅबिनरला ‘क्रॅब’, ‘बायनर’ याप्रमाणेच ‘कनेक्टर’ किंवा ‘लिंक’ असेही म्हणतात.
उपयोगाप्रमाणे वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या आकाराचे व प्रकाराचे कॅरॅबिनर बाजारात उपलब्ध आहेत. कोणत्या उपयोगासाठी वापरायचा आहे त्याप्रमाणे कॅरॅबिनर विकत घ्यावा. सर्वसाधारणपणे कॅरॅबिनरचे दोन प्रकार केले जातात. लॉकिंग कॅरॅबिनर आणि नॉन लॉकिंग कॅरॅबिनर. लॉकिंग कॅरॅबिनरमध्ये त्याच्या झडपेवर लॉकिंग स्क्रू बसवलेला असतो. स्क्रू फिरवून घट्ट करून झडप लॉक करता येते. स्क्रू कुलूपाचे काम करतो. या उलट नॉन लॉकिंग कॅरॅबिनरच्या झडपेवर असा स्क्रू नसतो. त्यामुळे झडपेवर कसलाही दाब पडल्यास झडप उघडली जाऊ शकते व त्यात अडकवलेला दोर बाहेर पडण्याची शक्यता बळावते. लॉकिंग कॅरॅबिनरचेही अनेक प्रकार आहेत. आरोहण करताना आरोहण साहित्याचे वजन आरोहकाला जास्त पेलावे लागू नये म्हणून कॅरॅबिनर हे अ‍ॅल्युमिनिअमच्या मिश्रधातूपासून तयार केले जातात. त्यामुळे ते वजनाने खूप हलके असतात.तसेच ते खूप टिकाऊ असतात. कॅरॅबिनरची लांबच्या बाजूची क्षमता जास्त असते.प्रत्येक कॅरॅबिनरच्या प्रकाराप्रमाणे व कंपनीप्रमाणे वजन झेलण्याची क्षमता वेगवेगळी असते.
अशोक पवार-पाटील – ashok19patil65@gmail.com