किल्ले, मंदिरे, लेणी, प्राचीन मंदिरे ही आपली अचल मूर्त वारसास्थळे. त्यांचे पर्यटन चांगलेच रुजले आहे. त्याचबरोबर वर्षांनुवर्षे चालत आलेल्या रूढी-परंपरा, त्यांचे विविधांगी सादरीकरण, विविध लोककला हा आपला ‘कला-परंपरांचा वारसा’ अथवा ‘अमूर्त वारसा’ हा देखील आपल्या पर्यटनाचा एक भाग होऊ शकतो.
सुंदर देशा, पवित्र देशा यांबरोबरच विविध परंपरांनी समृद्ध देशा आणि सुंदर कलांच्या देखण्या देशा असेही महाराष्ट्राचे वर्णन करायला हवे. सह्य़ाद्रीच्या राकट रांगा, किल्ले, सागरकिनारे, पुळणी, गर्द वनराई, खडकामध्ये खोदलेली लेणी, प्राचीन मंदिरे आणि त्यामध्ये असलेल्या अत्यंत सुबक आणि देखण्या मूर्ती ही तर आपली वारसास्थळे आहेतच. त्यांना आपण भेट देऊ शकतो. पण त्याचबरोबर आपला महाराष्ट्रात वर्षांनुवर्षे चालत आलेल्या असंख्य रूढी-परंपरा, त्यांचे विविध रूपाने केले गेलेले सादरीकरण, नाटय, संगीत, विविध कला अशा असंख रूपाने नटलेला आहे, समृद्ध आहे. या सगळ्या गोष्टींना ‘कला-परंपरांचा अप्रत्यक्ष वारसा’ अथवा ‘अमूर्त वारसा’ म्हणावे लागेल.
युनेस्कोनेसुद्धा जगभरातील अशा वारशाची एक यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्यात चालीरीती, परंपरा, कला, संगीत अशा गोष्टी येतात. की ज्या गोष्टी दिसत नाहीत पण अनुभवल्या जातात. आपल्या भटकंतीत आपणदेखील महाराष्ट्रातील अशा काही गोष्टींचा जाणीवपूर्वक समावेश करून घेऊ शकतो. चित्रकथी, दशावतार, मारबत, गावपळण, झाडीपट्टी रंगभूमी, सावंतवाडीची खेळणी किंवा गंजिफा, कुंभार कला केंद्र, काष्ठशिल्प केंद्र, रानभाज्यांचा महोत्सव, समाजातील वाईट प्रवृत्तीना हाकलून देण्याची आष्टा वाळवा येथील भावई, होळीला सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील खेळे, होळीलाच रत्नागिरी जिल्ह्य़ात नाचवली जाणारी पालखी, अधिक मनिहन्यात अहमदनगर जिल्ह्य़ातील दुर्गाव गावातील दुयरेधनाची मिरवणूक, चैत्री पौर्णिमेला अथवा रंगपंचमीला विविध गावच्या यात्रेतील बगाड (बावधन, नारायणपूर म्हातोबाचा बगाड) अशा अनेक पारंपरिक कलांना, त्यांच्या सादरीकरणाला आपल्या महाराष्ट्राचा अमूर्त वारसाच म्हणावे लागले.
खरे तर हल्ली यापैकी अनेक कला आता लोप पावत चालल्या आहेत. यातील कलाकार मंडळी जिवाच्या करारानी त्या कला जपायचा प्रयत्न करताहेत. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या मंडळींनी आजही या कला टिकवून धरल्या आहेत.
कोकणात गेलात तर अशा कला परंपरेचा वारसा सांभाळणारी अनेक उदाहरणे दिसतील. दशावतार हा त्यापैकीच एक. नवरात्रीनंतर गावोगाव होणारे दशावताराचे प्रयोग म्हणजे लोककलेचा सुंदर आविष्कार असतो. शेतकरी, कारागीर अशी साधी साधी मंडळी विविध पौराणिक कथांचे सादरीकरण दशावतारात करतात. कुठलीही संहिता नसताना रात्रभर दशावताराचा प्रयोग सुरू असतो हे याचे खास वैशिष्टय़ !
कुडाळजवळच्या पिंगुळी गावची चित्रकथी म्हणजे गंगावणे या एकमेव परिवाराने मोठय़ा कष्टाने जपून ठेवलेला वारसा आहे. वेगवेगळी चित्रे दाखवून त्याद्वारे कथा सांगणे ही प्राचीन कला आता फक्त एका घराण्यानेच टिकवून ठेवली आहे. कळसूत्री बाहुल्या तसेच श्ॉडो पपेटचे खेळ इथे सादर केले जातात. दिवाळीनंतर गावागावांत जत्रा सुरू होतात. त्या वेळी चित्रकथीचे खेळ दाखवले जातात.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आचरे या गावी होणारी गावपळण ही अशीच विशेष घटना आहे. दर तीन वर्षांनी देवासाठी गाव मोकळा करून देण्याची प्रथा आहे. सर्व गावकरी गावाच्या बाहेर रानात कच्चे निवारे बांधून तीन दिवस मजेत राहातात. खरेतर रोगराई-प्रदूषण यापासून गाव तीन दिवस मुक्त व्हावा ही यामागची मूळ संकल्पना. त्याला धार्मिक अधिष्ठान दिलेले दिसते. सध्या हा प्रकार एक इव्हेंट म्हणून साजरा होत असतो. या पुढची गावपळण २०१७ साली येणार आहे.

तर तिकडे विदर्भात झाडीपट्टी रंगभूमीचे खेळ बहरतात ते दिवाळीनंतर अगदी फेब्रुवारीपर्यंत. नागपूर-भंडारा-गोंदिया-गडचिरोली हा प्रदेश खूप झाडीचा आहे. स्थानिक शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी नटवलेली नाटके हे या प्रदेशाचे आकर्षण. अनेक सामाजिक, राजकीय प्रसंगांवर इथे नाटके केली जातात. तिकीट लावून याचे खेळ होतात. वडसा या एका तालुक्याच्या गावी जवळजवळ ४० नाटक कंपन्या कार्यरत आहेत. यावरून या नाटकांची लोकप्रियता लक्षात येईल.
विदर्भातील अजून एक उत्सव म्हणजे नागपूरचे मारबत! श्रावणी अमावास्या म्हणजे बैल पोळा या दिवशी समाजातील वाईट चालीरीती-रूढी-परंपरा-रोगराई तसेच समाजातील व्यंग-उणिवा यांचे प्रतीक असलेल्या मूर्ती म्हणजे मारबत! या मारबतची मिरवणूक काढून त्यांचे दहन केले जाते. गणेशोत्सवाइतकाच लोकप्रिय असलेला हा एकदिवसाचा लोकोत्सव नागपूरला जाऊन आवर्जून पाहिला पाहिजे, अनुभवला पाहिजे.
जशा या कला बहरलेल्या आहेत त्याचप्रमाणे काही खास गोष्टींची निर्मिती करणे हेसुद्धा यामध्ये सामील आहे. तांबट लोकांनी घडवलेली तांब्याची भांडी, बुरूड मंडळींनी बांबूपासून तयार केलेल्या विविध गोष्टी हासुद्धा आपला वारसाच नव्हे काय? वासुदेव, भुत्या, गोंधळी, कडकलक्ष्मी, हिरवा देव, दारात येणारा नंदीबैल ही सगळी मंडळी हळूहळू पडद्याआड जायला लागली आहेत.
अशा अजूनही काही कला, परंपरा आहेत की त्यांना पण आपल्या भटकंतीच्या कक्षेत आणावे लागेल. बहुतांश ठिकाणच्या अशा उपक्रमांच्या तारखा ठरलेल्या असतात. त्या शोधाव्या लागतील त्यांचा अनुभव घ्यावा, त्यांची माहिती घ्यावी आणि त्या आपल्या भटकंतीमध्ये मुद्दाम समाविष्ट करून घ्याव्यात. महाराष्ट्राच्या गावागावांत आणखीही बराच मोठा वारसा जपलेला आहे. स्थानिक मंडळींशी बोलल्यावर तो नक्कीच आपल्यासमोर उलगडला जाईल. त्याचा आनंद घेता येईल. आपली भटकंती आणखीन समृद्ध होईल यात शंका नाही.
आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये
kiara advani and mithun chakravarti
मिथून चक्रवर्ती ते कियारा अडवाणी, बॉलीवूडमधील ‘या’ लोकप्रिय कलाकरांची खरी नावे माहित आहेत का?
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !