किल्ले, मंदिरे, लेणी, प्राचीन मंदिरे ही आपली अचल मूर्त वारसास्थळे. त्यांचे पर्यटन चांगलेच रुजले आहे. त्याचबरोबर वर्षांनुवर्षे चालत आलेल्या रूढी-परंपरा, त्यांचे विविधांगी सादरीकरण, विविध लोककला हा आपला ‘कला-परंपरांचा वारसा’ अथवा ‘अमूर्त वारसा’ हा देखील आपल्या पर्यटनाचा एक भाग होऊ शकतो.
सुंदर देशा, पवित्र देशा यांबरोबरच विविध परंपरांनी समृद्ध देशा आणि सुंदर कलांच्या देखण्या देशा असेही महाराष्ट्राचे वर्णन करायला हवे. सह्य़ाद्रीच्या राकट रांगा, किल्ले, सागरकिनारे, पुळणी, गर्द वनराई, खडकामध्ये खोदलेली लेणी, प्राचीन मंदिरे आणि त्यामध्ये असलेल्या अत्यंत सुबक आणि देखण्या मूर्ती ही तर आपली वारसास्थळे आहेतच. त्यांना आपण भेट देऊ शकतो. पण त्याचबरोबर आपला महाराष्ट्रात वर्षांनुवर्षे चालत आलेल्या असंख्य रूढी-परंपरा, त्यांचे विविध रूपाने केले गेलेले सादरीकरण, नाटय, संगीत, विविध कला अशा असंख रूपाने नटलेला आहे, समृद्ध आहे. या सगळ्या गोष्टींना ‘कला-परंपरांचा अप्रत्यक्ष वारसा’ अथवा ‘अमूर्त वारसा’ म्हणावे लागेल.
युनेस्कोनेसुद्धा जगभरातील अशा वारशाची एक यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्यात चालीरीती, परंपरा, कला, संगीत अशा गोष्टी येतात. की ज्या गोष्टी दिसत नाहीत पण अनुभवल्या जातात. आपल्या भटकंतीत आपणदेखील महाराष्ट्रातील अशा काही गोष्टींचा जाणीवपूर्वक समावेश करून घेऊ शकतो. चित्रकथी, दशावतार, मारबत, गावपळण, झाडीपट्टी रंगभूमी, सावंतवाडीची खेळणी किंवा गंजिफा, कुंभार कला केंद्र, काष्ठशिल्प केंद्र, रानभाज्यांचा महोत्सव, समाजातील वाईट प्रवृत्तीना हाकलून देण्याची आष्टा वाळवा येथील भावई, होळीला सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील खेळे, होळीलाच रत्नागिरी जिल्ह्य़ात नाचवली जाणारी पालखी, अधिक मनिहन्यात अहमदनगर जिल्ह्य़ातील दुर्गाव गावातील दुयरेधनाची मिरवणूक, चैत्री पौर्णिमेला अथवा रंगपंचमीला विविध गावच्या यात्रेतील बगाड (बावधन, नारायणपूर म्हातोबाचा बगाड) अशा अनेक पारंपरिक कलांना, त्यांच्या सादरीकरणाला आपल्या महाराष्ट्राचा अमूर्त वारसाच म्हणावे लागले.
खरे तर हल्ली यापैकी अनेक कला आता लोप पावत चालल्या आहेत. यातील कलाकार मंडळी जिवाच्या करारानी त्या कला जपायचा प्रयत्न करताहेत. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या मंडळींनी आजही या कला टिकवून धरल्या आहेत.
कोकणात गेलात तर अशा कला परंपरेचा वारसा सांभाळणारी अनेक उदाहरणे दिसतील. दशावतार हा त्यापैकीच एक. नवरात्रीनंतर गावोगाव होणारे दशावताराचे प्रयोग म्हणजे लोककलेचा सुंदर आविष्कार असतो. शेतकरी, कारागीर अशी साधी साधी मंडळी विविध पौराणिक कथांचे सादरीकरण दशावतारात करतात. कुठलीही संहिता नसताना रात्रभर दशावताराचा प्रयोग सुरू असतो हे याचे खास वैशिष्टय़ !
कुडाळजवळच्या पिंगुळी गावची चित्रकथी म्हणजे गंगावणे या एकमेव परिवाराने मोठय़ा कष्टाने जपून ठेवलेला वारसा आहे. वेगवेगळी चित्रे दाखवून त्याद्वारे कथा सांगणे ही प्राचीन कला आता फक्त एका घराण्यानेच टिकवून ठेवली आहे. कळसूत्री बाहुल्या तसेच श्ॉडो पपेटचे खेळ इथे सादर केले जातात. दिवाळीनंतर गावागावांत जत्रा सुरू होतात. त्या वेळी चित्रकथीचे खेळ दाखवले जातात.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आचरे या गावी होणारी गावपळण ही अशीच विशेष घटना आहे. दर तीन वर्षांनी देवासाठी गाव मोकळा करून देण्याची प्रथा आहे. सर्व गावकरी गावाच्या बाहेर रानात कच्चे निवारे बांधून तीन दिवस मजेत राहातात. खरेतर रोगराई-प्रदूषण यापासून गाव तीन दिवस मुक्त व्हावा ही यामागची मूळ संकल्पना. त्याला धार्मिक अधिष्ठान दिलेले दिसते. सध्या हा प्रकार एक इव्हेंट म्हणून साजरा होत असतो. या पुढची गावपळण २०१७ साली येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा