अत्यंत सुंदर, देखण्या, राजबिंडय़ा अशा विष्णुमूर्तीची यादी करायची झाली तर त्यात मेहेकरच्या बालाजीचे नाव नक्कीच अग्रस्थानी असेल. बुलढाणा जिल्ह्यात पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले मेहेकर हे गाव तिथे असलेल्या विष्णू मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. लोणार या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळापासून फक्त २२ किलोमीटरवर हे ठिकाण आहे.
मेघंकर नावाच्या दैत्याचा भगवान विष्णूने शारंग धनुष्याने पराभव केला. मेघंकर विष्णूला शरण आला आणि देवाने याच नगरीमध्ये वास्तव्य करावे, अशी प्रार्थना केली. विष्णूने ती मान्य केली आणि शारंगधराच्या रूपात मी इथेच वास्तव्य करीन, असा आशीर्वाद त्याने मेघंकराला दिला. तेव्हापासून भगवान विष्णू इथे शारंगधराच्या रूपात राहू लागले, अशी एक कथा आहे.
ही मूर्ती कशी सापडली, याचीही एक कथा आहे. एक वेडसर माणूस ठराविक जागी रोज झाडलोट करायचा. तिथे कोणालाही येऊ द्यायचा नाही. एके दिवशी येथे खोदकाम करा, असे तो लोकांना सांगू लागला. तिथे खोदल्यानंतर १२ फूट लांबीची मोठी लाकडी पेटी जमिनीखाली सापडली. त्या पेटीत बालाजीची मूर्ती आणि दोन ताम्रपट होते. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी रिचर्ड टेम्पल यांना ही माहिती मिळाली. मूर्तीचा ताबा घेण्यासाठी ते नागपूरहून निघाले. ग्रामस्थांनी तातडीने छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. इंग्लंडच्या राणीने काढलेल्या आदेशामुळे प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती रिचर्ड यांना घेऊन जाता आली नाही. त्याऐवजी त्यांनी त्या मूर्तीसोबत सापडलेले दोन ताम्रपट आपल्या ताब्यात घेतले.
काळ्या पाषाणातील अंदाजे १० फूट उंचीची विष्णुमूर्ती मेहेकर येथे आहे. इथे मूर्तीच्या गळ्यात दागिने दिसतातच. कमरेचे वस्त्र आणि त्यावर शिल्पांकित केलेले विविध दागिने या सौंदर्यात आणखी भर घालतात. मूर्तीला असलेल्या आधारशिलांवर दोन्ही बाजूंनी दशावतरांचे सुंदर रेखाटन करण्यात आले आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला खांद्याच्या वर ब्रह्मदेव तर डाव्या खांद्याच्या बाजूला महादेवाच्या मूर्ती आहेत. परंतु या मूर्तीचे वैशिष्टय़, सौंदर्य कशात असेल तर ते या मूर्तीच्या मुकुटात आहे. विष्णुमूर्तीला किरीट मुकुट आहे.
या मुकुटामध्ये आसनस्थ विष्णुमूर्ती कोरलेली असून, तिच्या हातात धनुष्य दाखविलेले आहे. याच वैशिष्टय़ामुळे या विष्णुमूर्तीला शारंगधर हे नाव प्राप्त झाले. सांबराच्या शिंगाच्या धनुष्याला शारंग म्हणतात. हे शारंग हातात धारण करणारा शारंगधर, अशी या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. अगदी अनोखी, अत्यंत देखणी विष्णुमूर्ती पाहायची असेल तर मेहेकरला जायलाच हवे.
आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आवाहन – वाचक सहभाग
वाचक पर्यटन : भटकतो तर आपण सर्वच. पण कधीतरी चिरपरिचित ठिकाणांपेक्षा जरा हटकेदेखील पाहावं. मग कधी ते भंडारदऱ्यानजीकचं सृष्टीचं कातळलेणं ‘सांधण’ असेल किंवा कधी मानवाने निर्मिलेली इसवी सनापूर्वीची एखादी लेणी किंवा स्थापत्यकलेचा वारसा असणारं मंदिर. कदाचित ते फारसं कोणाला माहीतही नसतं. अनेकांना माहित नसेल असं तुम्हाला काही माहीत आहे? अशा ठिकाणाला भेट दिली असेल तर मग उचला पेन आणि २०० शब्दांत त्या माहिती छायाचित्रासह पाठवून द्या.
ऑफबीट क्लिक : हल्लीच्या भटकंतीत, भटकंती कमी आणि छायाचित्रण अधिक असंच झालंय. पण त्यापलिकडे जाऊन काहीतरी अनोखं फ्रेममध्ये उतरवणारे असतातच. कधी ती फ्रेम अचानक मिळते, तर कधी बरीच प्रतीक्षा करावी लागते. असं एखादं छायाचित्र तुमच्याकडे असेल तर लगेच आम्हाला पाठवा.
भटकंती डायरी : सर्व सुखसुविधांयुक्त असं पर्यटन आज एक उद्योग व्यवसाय म्हणून स्थिरावलं असलं तरी आजदेखील अनेक संस्था डोंगर-जंगल भ्रमंतीचे उपक्रम ना नफा ना तोटा तत्त्वावर स्वयंसेवी पद्धतीने राबवत असतात. अशा उपक्रमांची नोंद भटकंती डायरीत घेण्यात येईल. आपल्या संस्थेचे आगामी उपक्रम संस्थेच्या लेटरहेडवर आपण पाठवू शकता.
आमचा पत्ता – लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१० ई-मेल – ’lokbhramanti@gmail.com

 

 

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishnu temple in buldhana