उन्हाळा आणि कोकणची भटकंती असं समीकरणच आहे. आंबा-काजूच्या या मोसमात भटकंती करताना कोकणातला समृद्ध वारसाही आवर्जून अनुभवायला हवा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकणात भटकंतीसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि ती पर्यटकांनी भरूनसुद्धा गेलेली असतात. पण अतिशय शांत आणि रमणीय ठिकाणांचीसुद्धा कोकणात काही कमी नाही. प्राचीन सुंदर मूर्ती, जुनी मंदिरे, त्याच्याशी जोडला गेलेला रोमहर्षक इतिहास आणि निसर्गनवल अशा गोष्टींचा मिलाफ जर पाहायचा आणि अनुभवायचा असेल तर रत्नागिरी जिल्ह्यतल्या गोळप-आडिवरे-कशेळी परिसराला भेट द्यायलाच हवी. किंबहुना या उन्हाळ्यात या भटकंतीचा बेत ठरवायला काहीच हरकत नाही. रत्नागिरी आणि राजापूर या दोन्ही ठिकाणांच्या मधोमध असणारा हा परिसर अतिशय शांत, रम्य आणि तितकाच ऐतिहासिकसुद्धा आहे. रत्नागिरीच्या दक्षिणेला सागरीमार्गाने निघाले की आधी येते स्वरूपानंदांचे पावस. तिथे दर्शन घेऊन पावसचेच जणू जुळे गाव असलेल्या गोळपला जावे. गोळप इथे हरिहरेश्वराचे मंदिर आहे. डोंगराच्या कुशीत असलेले हे नितांतसुंदर ठिकाण. दगडी पाखाडी उतरून मंदिर प्रांगणात आपला प्रवेश होतो. समोरच नाटके सादर करण्यासाठी तयार केलेला रंगमंच पाहून कोकणी माणसाचे नाटकाविषयीचे प्रेम किती उत्कट आहे याची जाणीव होते. हरिहरेश्वर मंदिराचे खास वैशिष्टय़ म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांच्या स्वतंत्र मूर्ती या मंदिरात शेजारीशेजारी ठेवलेल्या आहेत. ब्रह्मदेवाची मूर्ती काहीशी दुर्मीळ समजली जाते. साधारणत १२-१३ व्या शतकातील या अतिशय देखण्या मूर्ती, त्यांच्या पायाशी असलेली त्यांची वाहने आणि त्यांच्या प्रभावळीत असलेले इतर देव, असे देखणे शिल्पं जरूर पाहायला हवे.

गोळपवरून पुढे आडिवरेला जाताना वाटेत कशेळीचा फाटा लागतो. कशेळीला कनकादित्याचे म्हणजे सूर्याचे मंदिर आहे. गुजरातेत वेरावळजवळ प्रभासपट्टण इथे प्राचीन सूर्यमंदिर होते. इ.स. १२९३ साली अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्यावेळी तिथल्या पुजाऱ्याच्या मदतीने एका व्यापाऱ्याने तिथल्या काही सूर्यमूर्ती जहाजात घालून तिथून हलवल्या. त्यातलीच एक मूर्ती म्हणजे कशेळीचा कनकादित्य होय. या सूर्यदेवाला इ.स. शिलाहार भोजराजाने एक दानपत्र ताम्रपटावर लिहून दिले. तो ताम्रपट आजही देवस्थानने जपून ठेवला आहे. मात्र सध्या सुरक्षेच्या कारणास्तव तो बँकेच्या लॉकरमधे ठेवावा लागला आहे. अत्यंत रम्य मंदिर परिसर असून आता तिथे भक्तनिवाससुद्धा बांधलेला आहे.

कशेळीपासून जेमतेम चार किमीवर आहे आडिवरे हे गाव. या गावाचे प्राचीन काळापासून संदर्भ मिळतात. भोजराजाच्या ताम्रपटात याचा उल्लेख ‘अट्टविरे’ असा आला आहे. तर काही साहित्यात याचे नाव आदिवरम असे आढळते. शंकराचार्यानी या देवीची स्थापना केली असेही सांगितले जाते. सुंदर देवस्थान असलेल्या या मंदिरात विहिरीतून पाणी काढण्यासाठी ‘कोटंब’ नावाच्या जुन्या पारंपरिक पद्धतीचा वापर केलेला आजही आढळतो. मंदिराच्या सभागृहात छतावर अतिशय सुंदर नक्षीकाम असून विविध कथनशिल्पे इथे पाहायला मिळतात. मंदिरात महाकालीची प्रसन्न मूर्ती असून तावडे मंडळींची ती कुलदेवता आहे. परिसरात नगरेश्वर, महालक्ष्मी, महासरस्वतीची मंदिरे आहेत. नगरेश्वराच्या मंदिरात छताच्यावर गेलेले मोठे वारूळ पाहायला मिळते. या देवीची कथा मोठी सुंदर आहे. इथून जवळच असलेल्या वेत्ये गावी असलेल्या जाधव यांच्या स्वप्नात ही देवी आली, आणि मी बाऊळ इथे वस्ती करून आहे. माझी प्रतिष्ठापना आडिवरे इथे कर असा दृष्टांत दिला. त्याप्रमाणे बाऊळ इथून मूर्ती आणून तिची स्थापना आडिवरे इथे केली गेली. दरवर्षी देवीची वेत्ये या आपल्या माहेराला भेट असते असे या कथेत सांगितले आहे.. त्यावेळी वाजतगाजत देवीची मिरवणूक नेली जाते.

या ठिकाणी एक विचित्र घटना घडलेली आहे. आडिवरे आणि परिसरावर मोगलाईच्या काळात तावडे मंडळींचा मोठा प्रभाव होता. हे लोक मोठे लढवय्ये होते. यांना कदम तावडे असे म्हणत. अनेक मोगल सरदारांना यांचा पराभव करता आला नव्हता. मात्र, एकदा कपिलाषष्टीच्या दिवशी ही सर्व मंडळी वेत्ये इथे समुद्रस्नानासाठी गेली असता बादशहाच्या सरदाराने डाव साधला आणि जवळ जवळ सर्व पुरुष मंडळी मारली गेली. या सर्वाच्या स्त्रिया तेव्हा सती गेल्या. एकच स्त्री जी गरोदर होती ती वाचली आणि तिच्यापासून पुढे तावडे वंश वृिद्धगत झाला. महाकालीशेजारीच हे तावडे यांचे घर आहे. या स्त्रियांना चत्रबली देण्याची पद्धत इथे आहे. पूर्वी चार बकऱ्यांचा बळी दिला जात असे, आता मात्र चार नारळ फोडले जातात. तावडे मंडळींनी आडिवरे सडय़ावर आता भव्य असे चिरेबंदी भक्तनिवास बांधलेले आहे.

हा सगळा परिसर खरेतर दोन-तीन दिवस भटकावा असा आहे. कारण इथून जवळच असलेल्या देवीहसोळ या गावी असलेले आर्यादुग्रेचे मंदिर आणि त्याच्याच शेजारी असलेले रहस्यमय कातळशिल्प आवर्जून पाहावे असे आहे. कोकणात आता अनेक ठिकाणी कातळशिल्पे सापडू लागली आहेत. देवीहसोळचे हे शिल्प फारच सुंदर आणि देखणे आहे. इथून राजापूरकडे जाताना बारसू नावाच्या सडय़ावर देखील असेच एक भव्यदिव्य कातळशिल्पं पाहायला मिळते. हा सगळाच परिसर अतिशय रमणीय आणि देखणा आहे. आंबे, नारळ, सुपारी यांनी बहरलेला आहे. विविध पक्ष्यांनी नटलेला आहे. जरा वेळ काढून या परिसराची मनसोक्त भटकंती करावी.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wandering destination in konkan region