भटकंतीदरम्यान एखाद्या गावात युद्धप्रसंग कोरलेली दोन-तीन फूट उंचीची शिळा आपल्याला कधीतरी दिसते. हे नेमके काय आहे याची माहिती नसतेच, पण कधी कधी अज्ञानापोटी गावकऱ्यांनी देखील त्याची उपेक्षा केलेली असते. अनाम वीरांच्या स्मृतींच्या या खुणा इतिहासाच्या मूक साक्षीदारच असतात. आपल्या भटकंतीत जाणीवपूर्वक त्यांचा वेध घ्यायला हरकत नाही.

रणांगणावर वीरमरण येणे हे भारतीय लोकजीवनात गौरवास्पद आणि पुण्यप्रद मानले गेले आहे. असे वीरमरण प्राप्त झालेल्या वीराचे उचित स्मारक वीरगळाच्या रूपाने गावोगावी उभारलेले आपल्याला पाहायला मिळते. वीरगळ म्हणजे काय, आणि ते कसे असतात हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. मुळात हा शब्द कानडी भाषेतून आला आहे. कानडी भाषेमध्ये कल्लू म्हणजे दगड. वीराचा दगड तो वीरकल्लू, त्यावरून वीरगळ हा शब्द मराठीत प्रचलित झाला. स्थानिक लोक तर वीर गळून पडला म्हणून त्याचे स्मारक ते वीरगळ, असा अगदी सुटसुटीत अर्थ सांगतात.
एका पाषाणाच्या शिळेवर काही विशिष्ट शिल्पांकन करून तो पाषाणस्तंभ उभा करणे आणि त्या वीराचे स्मरण करणे; तो पाषाणस्तंभ म्हणजेच वीरगळ. आपल्या लाडक्या योद्धय़ाचे स्मारक असलेले हे वीरगळ महाराष्ट्रात गावोगावी पाहायला मिळतात. पण जनमानसात त्याची माहिती फारच कमी असते.
हे वीरगळ तयार करायची एक खास पद्धत आहे. आकाराने सामान्यत: अडीच ते तीन फूट उंचीच्या शिळेवर एकावर एक असे तीन किंवा चार चौकोन खोदून त्यात या वीराच्या कथेचे अंकन केलेले असते. सर्वात खाली तो वीर मृत्युमुखी पडलेला दाखवतात. त्याच्या वरच्या थरात त्याचे युद्ध चाललेले दाखवले जाते. त्याच्या वर तो मृत झाला असून त्याला अप्सरा स्वर्गात घेऊन जात असल्याचे कल्पिले आहे. तर सर्वात वरच्या चौकोनात तो शिवमय झाला असे दाखवण्यासाठी तो शिवपिंडीची पूजा करताना दाखवण्याची प्रथा आहे. युद्धात मरण आले तर तुम्हाला हमखास स्वर्गप्राप्ती होते हे जनमानसावर बिंबवणे हा देखील त्यामागील दृष्टिकोन असावा. यात अजून वर त्या पाषाणाच्या दोन बाजूंना चंद्र-सूर्य दाखवलेले असतात. याचा अर्थ असा की जोपर्यंत आकाशात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत त्या वीराचे स्मरण आम्हाला होत राहील असे सूचित करायचे असते. मृत्युमुखी पडलेल्या वीराची पत्नी जर त्याच्यासोबत सती गेली असेल तर त्या वीरगळावर स्त्रीचा हातदेखील कोरलेला असतो. त्या हातात बांगडय़ा दाखवलेल्या असतात. काही ठिकाणी नुसताच स्त्रीचा हात कोरलेले दगड दिसतात. यांना सतीशिळा असे म्हटले जाते.
वीरगळांची परंपरा कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्याचे सांगितले जाते. कर्नाटकात दहा-बारा फूट उंचीचे मोठे शिल्पपट असलेले वीरगळ पाहायला मिळतात. त्यांच्यावरील युद्धप्रसंग अगदी तपशीलवर कोरलेले दिसतात. कर्नाटकात अनेक वीरगळांवर लेखदेखील कोरलेले आहेत. महाराष्ट्रात मात्र अगदी अपवादानेच लेख पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याकडचे वीरगळ हे कुठल्या वीरासाठी तयार केलेले आहेत याचा संदर्भ मिळणे कठीण जाते.
महाराष्ट्रात अनेक गावागावांतून असे वीरगळ पाहायला मिळतात. एखाद्या गावात वीरगळ असणे हे त्या गावाचे प्राचीनत्त्व अधोरेखित करणारे असते. भूतकाळात इथे समरप्रसंग घडला होता आणि कोणी वीर धारातीर्थी पडले होते याची मूकपणाने साक्ष आज हे वीरगळ आपल्याला देत असतात. रायगड जिल्ह्यतल्या माणगाव तालुक्यात असलेले उंबर्डी हे गाव म्हणजे वीरगळांचे संग्रहालयच म्हणावे लागेल. इथे असलेल्या शिवमंदिराच्या आवारात अत्यंत देखणे असे ४५ वीरगळ ठेवलेले आहेत. इथे सतीचे हात असलेले अत्यंत रेखीव वीरगळ पाहायला मिळतात. कोणी महत्त्वाचा सरदार इथल्या लढाईत मृत्युमुखी पडला असणार. इथूनच जवळ दिवेआगरच्या रस्त्यावरील देगावला शिवमंदिरात चारही बाजूंनी घडवलेले अनेक वीरगळ ठेवले आहेत. त्यातल्या एका वीरगळावर दहा डोकी आणि वीस हात असलेल्या व्यक्तीचे अंकन केलेले दिसते. अगदी आगळावेगळा हा एकमेव वीरगळ आहे.
बोरिवलीजवळच्या एक्सर या गावात तर वीरगळावर नौकायुद्ध दाखवलेले आहे. अत्यंत अप्रतिम असा हा वीरगळ शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यांच्यातील युद्धाचा प्रसंग दाखवणारा आहे. इतका आकर्षक आणि देखणा वीरगळ महाराष्ट्रात दुसरा नाही.
सातारा जिल्ह्यतील किकली, नगर जिल्ह्यतल्या श्रीगोंदा या गावी असेच अनेक वीरगळ दिसतात. राजापूरच्या धूतपापेश्वर मंदिराच्या बाहेर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यतील वाडा इथल्या विमलेश्वर मंदिराच्या बाहेर असे देखणे वीरगळ रांगेत मांडून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर अनेक किल्लय़ांवर आजही असे अनेक वीरगळ विखुरलेले पाहायला मिळतात. पालीजवळील सुधागडवर अनेक वीरगळ आणि काही सतीशिळा आहेत. मुरबाडजवळील सिद्धगडावर असेच अनेक वीरगळ दिसतात.
पण अशी व्यवस्था सगळ्याच वीरगळांच्या नशिबी मात्र नाही. अज्ञानामुळे अनेक ठिकाणी त्यांना शेंदूर फसलेला दिसतो. अनेक ठिकाणी त्यांना शनीचा दगड म्हणून तेल वाहिलेले दिसते. त्यांचा वापर हा कपडे धुण्यासाठी घासायला उत्तम दगड म्हणून करणारेही कमी नाही. रांजणगाव जवळच पिंपरी दुमाला या गावात तर मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराच्या भिंतीत अनेक वीरगळदेखील बसवलेले आढळतात. वीरगळ म्हणजे आपल्या इतिहासाचा थेट साक्षीदार असलेला ठेवा. त्याचे काळजीपूर्वक जतन करायला हवे. त्याचे संवर्धन पूर्णार्थाने शक्य नसले तरी किमान त्याची नोंद भटकंतीत करणे, गावकऱ्यांना त्याचे महत्त्व समजावून देणे इतपत तरी आपण करू शकतो.

stationary survey team found Five and half crore worth of jewellery in Kolhapur
कोल्हापुरात स्थिर सर्वेक्षण पथकाला आढळले साडेपाच कोटींचे दागिने
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
Sangli, Miraj, Women Representative Miraj,
सांगली, मिरजेच्या रणांगणात ‘लाडक्या बहिणी’ची चर्चा ! रिंगणातून बाजूला करण्याचे प्रयत्न
atharvaveda bhumi suktam
भूगोलाचा इतिहास: वसुंधरेच्या कायापालटाची कहाणी
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
Lakshmi Pujan in traditional fervor fireworks at the business premises
लक्ष्मीपूजन पारंपारिक उत्साहात, व्यापारी पेठेत आतषबाजी

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com