प्रस्तरारोहणादरम्यान दोराच्या गाठींचा उपयोग अनेक वेळा अगदी सहजपणे होत असतो. पण केवळ प्रस्तरारोहणातच अशा गाठींचा वापर होतो असे नाही. तर काही मूलभूत गाठी तर एखाद्या डोंगरभटकंतीत अडनिडय़ा वेळेस उपयोगी पडते. अशाच काही मूलभूत गाठींचा उपयोग येथे पाहायचा आहे.
ओव्हरहँड – दोराला मारलेली मुख्य गाठ सरकून सुटू नये यासाठी तिच्या शेवटी ओव्हरहँड गाठ मारली जाते. म्हणून तिला सुरक्षा गाठ असेही म्हणतात. प्रत्येक मुख्य गाठीच्या शेवटी सुरक्षा गाठ मारण्याचा नियम प्रत्येक आरोहकाने लक्षात ठेवायला हवा.
ओव्हरहँड लूप- झटपट लूप तयार करायचा असल्यास या गाठीचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे एखाद्या टप्प्यावर फिक्स दोर लावलेला असेल व त्या दोरावर धरण्यासाठी ठरावीक अंतरावर आधार तयार करायचे असतील तर या गाठीचा उपयोग केला जातो. मात्र गाठीवर वजन पडल्यानंतर ही गाठ खूप घट्ट बसते व सोडवणे कठीण जाते.
टेप – गाठ/वॉटर – या गाठीचा उपयोग टेपची दोन टोके जोडण्यासाठी केला जातो. रनर म्हणून वापरण्यासाठी टेपचा लूप तयार करण्याकरता टेप गाठीचा वापर केला जातो. ही गाठ मारताना लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे गाठ मारताना टेपची दोन्ही टोके गाठीच्या बाहेर जास्त सोडावीत व गाठ घट्ट करून नंतरच रनर वापरावा. अन्यथा टेप गाठ सरकून उघडण्याची शक्यता असते. ही गाठ दोन दोर बांधण्यासाठी उपयोगात आणू नये.
रीफ – समान आकाराच्या/जाडीच्या दोराची दोन टोके किंवा समान आकाराचे / जाडीचे दोन दोर जोडण्यासाठी या गाठीचा उपयोग केला जातो. मात्र ही गाठ चुकीची मारली गेल्यास वजन आल्यानंतर सहज सुटते.
फिशरमन – समान आकाराच्या / जाडीच्या दोराची दोन टोके किंवा समान आकाराचे / जाडीचे दोन दोर जोडण्यासाठी या गाठीचा उपयोग केला जातो.
फिगर ऑफ एट – आधाराला दोर अँकर करण्यासाठी या गाठीचा मुख्य उपयोग केला जातो. ही गाठ डोंगरात भटकणाऱ्यांना किमान माहीत असणे गरजेचं आहे.
डबल फिगर ऑफ एट – आधाराला दोर अँकर करण्यासाठी या गाठीचा मुख्य उपयोग केला जातो. सिंगल फिगर ऑफ एट गाठ वजन पडल्यानंतर खूप घट्ट होते. अशी घट्ट झालेली गाठ सोडवणे कठीण होते. मात्र डबल फिगर ऑफ एट वजन पडल्यानंतरही सहज सोडवता येते.
बोलाइन – कंबरेला दोर बांधून घेण्यासाठी बोलाइन गाठीचा उपयोग केला जातो. ही गाठ वजनाचा ताण आल्यानंतरही सरकत नाही. वजन पडल्यानंतरही ही गाठ सोडणे कठीण होत नाही.
अशोक पवार-पाटील ashok19patil65@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा