सुकी, अनेर आणि मांजल या तीन नद्या आणि त्यांना मिळणारे छोटे-मोठे नाले यामुळे यावल अभयारण्याचे क्षेत्र हिरवेगार आणि जैवविविधतेने समृद्ध झाले आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या अस्तित्वाने संपन्न असलेल्या या अभयारण्याची घोषणा शासनाने २१ फेब्रुवारी १९६९ रोजी केली.
वनपर्यटनाचा मनमुराद आनंद घेणाऱ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय सुंदर असून, ज्यांना वन्यजीव पाहायचे आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना पक्षी पाहायचे आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना वाघ पाहायचा आहे त्यांच्यासाठीही हे अभयारण्य एक आकर्षणाचे ठिकाण आहे. रानिपगळ्याबरोबर गरुड, सुतार या पक्ष्यांसह २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी आपण येथे पाहू शकतो. पट्टेदार वाघाचा वावर आणि बिबटय़ाचे दर्शन अंगावर रोमांच उभे करतात. अस्वल, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर, रानमांजर, चिंकारा, हरिण, चितळ, चौिशग्या, सांबर आणि नीलगायीही आपल्याला नजरेस पडतात. साग, अंजनासोबत ऐन, शिसव, तिवस, खैर, हिरडा, बेहडा, तेंदूच्या झाडांची गर्दी मनाला सुखावून जाते. पावसाळ्यात तर पर्वतरांगांमध्ये विसावणाऱ्या ढगांनी सातपुडय़ावर धुक्याची दुलई पांघरली आहे की काय असं वाटू लागतं.
या अभयारण्यात मौल्यवान वृक्ष प्रजातींबरोबर असंख्य औषधी वनस्पती आढळतात. अभयारण्याचे क्षेत्र नसíगक उच्च प्रतीचे वन या प्रकारात मोडते. अभयारण्याचे क्षेत्र १७७.५२ चौ.किमी असून, यालगत प्रादेशिक यावल विभागाचे एकूण ९९५.३९ चौ.किमी वनक्षेत्र आहे. अभयारण्यात सुकी धरण १९७७ मध्ये पूर्ण करण्यात आले. हे धरण वन्यजीवांची तहान भागवते. क्षेत्रात विविध निरीक्षणस्थळे आहेत. यात चिंचाटी व्ह्यू पॉइंट, पालोबा पॉइंट, पाच पांडव ही उंच शिखरे असून, तेथून परिसराचा रमणीय देखावा दिसतो.
अभयारण्यात गारबर्डी, जामन्या, गाडय़ा, उस्मळी यांसारखी गावं समाविष्ट असून तिथे प्रामुख्याने तडवी, पावरा, कोळी या आदिवासींचे समाजाचे वास्तव्य आहे. त्यांची पारंपरिक लोकसंस्कृतीही या जंगलभ्रमंतीत आनंद देऊन जाते. जळगाव जिल्ह्यातलं हे एकमेव अभयारण्य आहे. पाल हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटनाचा उत्तम कालावधी हा सप्टेंबर ते फेब्रुवारी हा आहे. अभयारण्याला भेट देण्यासाठी जळगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे शासकीय विश्रामगृहाबरोबर खासगी निवासव्यवस्थाही उपलब्ध आहे. पाल येथे वनउद्यान आणि विश्रामगृहाबरोबर युवक वसतिगृहाची देखील सोय आहे. जवळचे रावेर रेल्वे स्थानक २५ किमी अंतरावर आहे. तर भुसावळ ५० किमी अंतरावर आहे. पाल, रावेर, सावदा, भुसावळ ही जवळची बसस्थानके आहेत. हे अभयारण्य समृद्ध वनदर्शनाबरोबर आदिवासी संस्कृतीची ओळख देणारे, त्यांचे जीवनमान आणि उत्सव यांचा मनमुराद आनंद देणारे असे स्थळ आहे.
drsurekha.mulay@gmail.com