‘संकटसमयी दृढसंकल्प दाखवून देणारे नेतृत्व!’ हा प्रसून जोशी यांचा लेख (२४ एप्रिल) वाचला. त्यात त्यांनी- आस्थेला प्रश्नांच्या पिंजऱ्यात उभे करायचे नसते, तर विश्वासाच्या खुल्या अंगणात घेऊन जायचे असते, असे मत व्यक्त केले; पण इथे प्रश्न असा की, आस्था म्हणजे काय? आस्थेची व्याख्या आपल्यासाठी एक आणि दुसऱ्यासाठी एक अशी वेगवेगळी असू शकते काय? आस्था धर्मावरची, संस्कृतीवरची की धारणांवरची?

पंतप्रधानांनी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या, पोलीस सेवेत काम करणाऱ्या, इतर अत्यावश्यक सेवांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशाला थाळी आणि टाळी वाजवण्याचा उपक्रम दिला आणि नंतर एकतेचे प्रदर्शन घडवण्यासाठी दिवे लावण्याचा. त्यावर काही लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. हे प्रश्न आस्थेला पिंजऱ्यात उभे करणारे वाटत असतील, तर अशा पिंजऱ्याची नक्कीच गरज आहे. थाळी-टाळी वाजवण्यासोबतच या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या वर्गाची सुरक्षा हा प्राथमिक विषय होता. त्यासाठी त्यांना योग्य ती सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे जास्त गरजेचे होते. राहिला विषय एकतेचे दर्शन घडवण्याचा. तर टाळेबंदी सुरू झाल्यापासून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांना १५ दिवसांचा अवधी लागला. त्यातूनच तर खरे आपण एकतेचे दर्शन घडवले! त्यावर प्रश्न निर्माण झाले तर तो विषय आस्थेचा आणि इतर धर्मीय त्यांचा धार्मिक कार्यक्रम पार पाडतात ते म्हणजे कट्टर सांप्रदायिकता, धर्मवेडेपणा!

आस्थेवर प्रश्न निर्माण झाले नसते तर आजही आपण सती प्रथा, केशवपन, बळी प्रथा, देवदासी अशा अघोरी आस्थांसोबतच जगलो असतो. त्या वेळेस अशा अमानुष प्रथांवर काही लोकांची श्रद्धा होती आणि तो त्यांचा आस्थेचा विषय होता. प्रश्न निर्माण झाले म्हणून परिवर्तन घडवून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्याला हातभार लागला आणि संविधानालाही तेच अभिप्रेत आहे.

– अमर मालगे, अमरावती</strong>

माहितीकडे समग्रपणे पाहिले तरच सत्य उलगडते

‘हर शख्स परेशानसा क्यों है?’ हा लेख (‘चतु:सूत्र’, २३ एप्रिल) वाचून अंध व्यक्ती आणि हत्ती या गोष्टीची प्रासंगिकता लक्षात आली. माहितीचे युग आहे; माहितीचा मारा आपल्यावर सतत होत राहणारच. कोणती माहिती, कोणत्या मार्गाने कधी येईल आणि कशी आपल्यापर्यंत पोहोचेल, याचा आज बिनचूक अंदाज बांधणे कठीण आहे. कोणत्याही घटनेत/ प्रकरणात आपल्यापर्यंत माहिती तीन टप्प्यांत पोहोचते : (१) प्राथमिक माहिती (२) तपशीलवार माहिती (३) संबंधित सत्य माहिती.

आता प्रश्न उरतो की, या माहितीला आपण प्रतिसाद कसा देतो आणि माहितीचा नेमका अर्थ काय घेतो? तीनही टप्प्यांतून मिळालेल्या माहितीचा मोठा ढिगारा आपल्यासमोर तयार झालेला असतो. आपली कसोटी लागते, त्या माहितीतून नेमके सत्य शोधून काढण्यात. कोणत्याही घटनेतील सत्य, हे त्या माहितीकडे समग्रपणे पाहण्यातूनच उलगडू शकते. जसे की, हत्ती हा हत्तीच आहे, हे त्याकडे समग्रपणे पाहण्यातूनच कळते. अन्यथा अंध व्यक्ती जशा आपापल्या परीने हत्तीचे वर्णन करून गल्लत करतात, तसेच आपलेही होण्याची शक्यता असते. माहिती पोहोचण्याचा पहिला टप्पा हा फक्त लक्षवेधक असतो, तो अंतिम नसतो. दुसरा टप्पा आपल्याला विचाराला प्रवृत्त करतो आणि तिसरा, आपण शोधलेले सत्य हे बरोबर आहे की नाही, हे ताडून पाहण्याची संधी देतो. जर वरचेवर प्रतिसाद दिला, तर सत्य माहितीपासून आपण स्वत:ला वंचित ठेवतोच. शिवाय आपण माहितीला दिलेला चुकीचा प्रतिसाद स्वत:साठी आणि पर्यायाने समाजासाठीदेखील हानीकारक ठरू शकतो.

– डॉ. नितीन आरोटे, अकोले (जि. अहमदनगर)

डोळ्यांवरील पट्टी बऱ्यापैकी सैलावली आहे..

‘संकोच आणि संचार’ हा अग्रलेख (२५ एप्रिल) वाचला. करोना संकटामुळे निश्चितच मानवाच्या निसर्गाकडे आणि निसर्गातील इतर प्राण्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाला आहे. मागील महिन्याभरातील मानवी टाळेबंदीमुळे प्राण्यांच्या वावरातदेखील बदल झाला आहे. एरवी मानवी वर्दळीने व्यापल्या जाणाऱ्या जागीदेखील वन्यजीव मोकळेपणी वावरताना दिसत आहेत. माणूसही याकडे अगदी शांतपणे आणि अंतर्मुख होऊन पाहत आहे. एक गोष्ट नक्की आहे, प्राण्यांच्या या मुक्त संचाराकडे मानव नक्कीच ईर्षेने पाहत नाहीये. उलट त्याला आपल्या चुकांची आणि आपल्या हातून झालेल्या निसर्गाच्या गळचेपीची प्रकर्षांने जाणीव होताना दिसत आहे. वैज्ञानिक प्रगतीने माणसाच्या डोळ्यांवर एक प्रकारची पट्टी बांधली गेली होती. आपला निसर्गाशी आणि इतर प्राण्यांशी काही संबंध आहे, हेच मानव विसरून गेला होता. आपणदेखील एक प्राणी आहेत आणि आपल्याही काही मर्यादा आहेत, याचा मानवाला विसर पडत चालला होता. करोना संकटाने मात्र मानवी डोळ्यांवरील पट्टी बऱ्यापैकी सैल झाली आहे. त्यामुळे करोनामुक्त जग निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल आणि निसर्गाचा योग्य तो मान राखेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

– ऋषिकेश क्षीरसागर, कोंढवा (जि. पुणे)

त्याग स्वयंस्फूर्तीने होणार नसेल, तर धोरण आखा

‘आरक्षणाचे धरण’ हे संपादकीय (२४ एप्रिल) वाचले. आजवर ‘क्रीमी लेयर’बाबत चर्चा झालेल्या आहेत. साधारणपणे दरेक १२ वर्षांनतर नवीन पिढी सुरू होते, असे म्हणतात. याचाच अर्थ आरक्षण सुरू होऊन आतापर्यंत सहा पिढय़ा उलटल्या असे म्हणता येईल. आरक्षणाचे लाभ अनुसूचित जाती आणि जमातींमधील सर्वच व्यक्तींपर्यंत समानतेने अजूनही पोहोचलेले नाहीत. केवळ काही कुटुंबांच्या सहा पिढय़ांनीच आरक्षणाचे लाभ सातत्याने उपभोगले. त्यांना ‘क्रीमी लेयर’ म्हटले जाते. इतर अनेक कुटुंबे मात्र त्या लाभांपासून कायम वंचित राहिली. यातूनच आरक्षणाचे लाभार्थी (धरणाच्या अलीकडले) आणि वंचित (धरणाच्या पलीकडले) असा वर्गभेद अनुसूचित जाती आणि जमातींअंतर्गत निर्माण झालेला आहे.

सतत सात दशके सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक सुबत्ता मिळवल्यानंतर या ‘क्रीमी लेयर’ने स्वयंस्फूर्तीने स्वार्थत्याग करून आरक्षणाचे लाभ सोडावेत आणि त्यांच्या उपेक्षित समाजबांधवांना ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा अनेकदा व्यक्त झाली आहे. सदर लाभांचा त्याग सामाजिक जाणिवेतून स्वयंस्फूर्तीने होणार नसेल तर सरकारने धोरण आखून ते बंद करावेत, अशी मागणी अनेकदा चर्चेत आलेली आहे. कोणताही पक्ष तसे धोरण आखण्यास उत्सुक दिसत नाही.

याची तीन कारणे स्पष्ट दिसतात : (१) आपल्याच उपेक्षित समाजबांधवांसाठी असा स्वार्थत्याग प्रस्थापित लाभार्थी कदापि करणार नाहीत. (२) सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षणाची संकल्पना केवळ मतपेटीवर डोळा ठेवून झापडबंद पद्धतीने राबविली आहे आणि जीवघेण्या सत्तास्पर्धेत त्या सरधोपट पद्धतीत गुणात्मक सुधारणेची अपेक्षा कोणत्याही पक्षाकडून ठेवता येणार नाही. (३) अनुसूचित जाती व जमातींमधील हा उपेक्षित वर्ग संघटित तर नाहीच, पण त्यांचे नेतृत्व दुभंगलेले आणि दिशाहीन आहे. त्यांचा वापर सर्व पक्ष शिताफीने स्वार्थ साधण्यापुरता करून घेत असतात.

या अनपेक्षित अंतर्गत वर्गभेदाची दखल संवेदनशीलतेने घेऊन त्यातील प्रस्थापित लाभार्थीच्या सवलती बंद करून त्या उपेक्षित वर्गास देण्याबाबत धोरण सरकारने राबवावे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले दिसते. उपदेश स्तुत्य आहे, पण तो कृतीत येणे शक्य दिसत नाही. एकदा धरण बांधले की त्याच्या पलीकडच्यांचा विचार कोणी करत नाही, हे दुर्दैवी सत्य आहे.

– विवेक शिरवळकर, ठाणे</strong>

वसंत व्याख्यानमालेत पुढील सत्रात वेबसंवाद..

‘कोविडोस्कोप’ या गिरीश कुबेर यांच्या नव्या सदरातील ‘व्याख्यानमालांचा ‘वसंत’!’ या लेखात (२६ एप्रिल) शिकागो विद्यापीठाच्या हार्पर व्याख्यानमालेत नुकतेच झालेले रघुराम राजन यांच्या व्याख्यानाबद्दल वाचले. सध्याचा काळ करोना संकटाचा असल्याने हे व्याख्यान वेबसंवादातून प्रसृत करण्यात आले. या उपक्रमात तब्बल ७,७०० श्रोत्यांनी नावनोंदणी करून हे व्याख्यान घरबसल्या ऐकले. नवतंत्रज्ञानाचा उपयोग करून अशा प्रकारे आपल्याकडेदेखील सुविधा निर्माण करता येतील, अशी सूचना लेखात पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेच्या आयोजकांस केली आहे.

पुण्याच्या मालेच्या कार्यक्रमात श्रोत्यांमध्ये ज्येष्ठांची संख्या मोठी असते. कित्येक श्रोते वाहतुकीच्या अडचणींमुळे येऊही शकत नसतील. अशा श्रोत्यांना ही एक पर्वणीच ठरेल. याशिवाय परगावी असलेल्यांनादेखील व्याख्यानांचा लाभ घेता येईल. त्यामुळे या सूचनेची नोंद आम्ही वसंत व्याख्यानमालेच्या पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली असून पुढील सत्रामध्ये अशा प्रकारे व्यवस्था/यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी अवश्य प्रयत्न करू.

– सुरेश पिंगळे (उपाध्यक्ष, वसंत व्याख्यानमाला), पुणे

संकटात संधी शोधण्यातच नेतृत्वाचा कस

‘व्याख्यानमालांचा ‘वसंत’!’ या लेखातील (‘कोविडोस्कोप’, २६ एप्रिल) पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेबाबतचे मत रास्त आहे. कदाचित वेबसंवादाबाबत माहिती व रुची असणारे नेतृत्व आयोजकांत नसेल; पण सध्याच्या ‘स्टे होम, स्टे सेफ’च्या काळात वेबसंवादाचा प्रयत्न केला असता तर- (१) काही कारणाने प्रत्यक्ष हजर राहू न शकणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरली असती आणि (२) (हे पुणेरीपणाच्या वावगे असले तरी) वसंत व्याख्यानमालेची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली असती.

पण हल्ली आयोजकांची कुवत हेच त्या संस्थेचे विधिलिखित झाले आहे. त्यात पुन्हा कौटुंबिकीकरण. मग नवीन विचार, कल्पना येणार कुठून? असो. अडचणीत खोळंबा करायचा की संधी साधायची/ शोधायची, यातच नेतृत्वाचा कस लागतो.

– सुहास शिवलकर, पुणे