जुन्या काळात आर्थिक विषमता असूनही मनुष्य श्रमनिष्ठ, कर्मनिष्ठ होता, नीतिमान होता. इच्छांच्या आहारी नव्हता म्हणूनच त्याच्या गरजा जीवन जगण्यापुरत्याच होत्या त्यामुळेच तो समाधानी होता.
काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रात एक लेख वाचनात आला. त्यात लेखकाने जुन्या जीवनपद्धतीविषयी, जुन्या काळातील घरे, जगण्याविषयीचे विचार, शेती पद्धतीविषयी बरेच काही विस्तारपूर्वक विवेचन केले होते. माझ्या मनाला ते पटले. (कारण माझ्या विचारांशी ते तंतोतंत मिळतात.) त्या लेखातील जुना काळ मीही बघितला आहे, जगलो आहे. आजच्यापेक्षा त्या काळात जीवनावश्यक वस्तू, सोयी-सुविधांसाठी कठोर परिश्रम करावे लागत असत आणि त्यातही फार थोडेच यशस्वी होत, पण यामुळे लोकांना यशाचे, वस्तू किंवा सोयी-सुविधा, परिश्रमाचे आणि जीवनाचे महत्त्व कळत होते. सहजसाध्य सुलभ उपलब्धीमुळे जीवनाची किंमत कळत नाही. जुन्या पद्धतीच्या घरात काय दु:ख होते? विटा, माती, चुना व शेणाने सारवलेल्या घरातच मोठमोठय़ा विश्ववंद्य विभूती जन्मल्या. त्यांनी आपल्या जीवनावश्यक सर्व गरजा यथाशक्ती त्या घरात राहूनच पूर्ण केल्या. त्यांनी देश व समाज घडविण्यासाठी सर्व शक्य तितके प्रयत्न केले व दिशादर्शनही केले. तो काळ असो की आजचा, मानवी जीवनातील दु:खे मानवी चुका व अवगुणांमुळेच येतात. जुन्या काळी भौतिकी सुख (?) सोयी नसूनही ते सुखी होते, कारण खरे सुख-समाधान संतुष्टात आहे. आजच्या काळासारखी वाढती सुख लालसा नव्हती. भौतिकी सुखसोयींची गरज वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजांमुळे भासू लागली, अन्यथा आर्थिक विषमता जुन्या काळी होती तशी या आधुनिक काळातही आहेच. आधुनिक काळातल्या वैज्ञानिकी तांत्रिक ज्ञानाने निरनिराळ्या सुखसोयींच्या संशोधनांनी मनुष्याच्या सुखाच्या कल्पनाही शरीर व स्वार्थ केंद्रित झाल्या आहेत. आजच्या निरनिराळय़ा सोयी, सुविधांच्या उपलब्धतेमुळे आजचा मनुष्य ऐषआरामी झाला आहे, श्रमापासून दूर झाला आहे. कमीत कमी वेळेत, कमीत कमी कष्टात (किंवा बिनाकष्ट) अधिकाधिक कार्यसाध्य हीच सुखाची उपलब्धी, हीच विकासाची खूण अशी मानसिकता झाली आहे. वाढत्या लोकसंख्येला नियंत्रित करण्याविषयी कोणीही विचार करताना दिसत नाही. याच प्रकारच्या उपलब्धींच्या विकासाची आश्वासने राजकारणी देऊन मते व सत्तेतील स्थान पक्के करताना दिसतात.
अशा प्रकारच्या विकासाने देशात सदोष स्पर्धा, अपराध, अधिकाधिकाची हाव आणि त्यातून अपराध आणि विकृती जन्म घेतात. पाश्चात्त्य देशांप्रमाणे येथे विकासाची साक्षरता, बौद्धिक समज, गांभीर्य, पर्यावरण जागरूकता, दूरगामी परिणाम, सामाजिक हित, सामाजिक स्वास्थ्य इत्यादी बाबींचा विचार न करता केवळ तात्कालिक सिद्धी व संकुचित दृष्टिकोनातून साधलेल्या सदोष विकासातून निरनिराळे दु:ख, समस्या यांचे विकृत परिणाम दृष्टिगोचर होऊ लागतात. पूर्वी आधुनिक भौतिकी सुखसोयी नसूनही तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात, बैलगाडीतून प्रवास करण्यात, ज्वारीची भाकरी खाऊनही मनुष्य सुखी नव्हता तरीही तृप्त, समाधानी होता. समाधान हेच सुख हे त्याला माहीत होते. आज वैज्ञानिक सुखसोयींनी मनुष्याच्या इच्छा चाळवून जाग्या केल्या, वाढीस लावल्या. त्या इच्छा आज विराट स्वरूप धारण करून भस्मासुर झाल्या आहेत. औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली कारखान्यांच्या खाली सुपीक शेतजमिनी चालल्या आहेत. डोंगर पोखरले जात आहेत. सिमेंट-काँक्रीटच्या बिल्डिंग्ज, डांबरी रोड तापून तापलेल्या वातावरणात भर घालीत आहेत. याला आजच्या बदलत्या परिवेशात विकास म्हणतात. आपल्या देशाला आधुनिक विकासापेक्षा आध्यात्मिक, नैतिक उन्नतीची अधिक गरज आहे. आजच्या निरंतर वाढत्या सामाजिक अपराधांना नैतिक प्रगती आणि सामाजिक एकीने नियंत्रित करणे सहज शक्य आहे. इच्छांच्या आहारी गेलेल्या राष्ट्रात कधीच सामाजिक, राजकीय, आर्थिक शांती नांदत नाही!
अत्याधुनिक तांत्रिक ज्ञानाची खरी गरज केवळ संरक्षणासाठीच असावयास हवी. देशाचे संरक्षण सर्वतोपरी आहे. आंतरिक, सामाजिक सुव्यवस्था, जनसंख्या नियंत्रण, नैतिक जबाबदारी पूर्ण जुनी पारंपरिक जीवनशैलीने निकोप राहू शकेल यात शंकाच नाही. जुन्या काळात आर्थिक विषमता असूनही मनुष्य श्रमनिष्ठ, कर्मनिष्ठ होता, नीतिमान होता. इच्छांच्या आहारी नव्हता म्हणूनच त्याच्या गरजा जीवन जगण्यापुरत्याच होत्या त्यामुळेच तो समाधानी होता. पश्चिमी देशांच्या विकासाची आंधळी नक्कल, राजकारण्यांच्या आश्वासनांचे भांडवल आणि देशातील निरनिराळय़ा दुर्घटनांचे कारण असण्यापेक्षा दुसरे काय?