भारतीय सिनेमाच्या क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या शोले सिनेमाला येत्या १५ ऑगस्ट रोजी तब्बल ४० वर्षे पूर्ण झाली. पण अजूनही प्रेक्षकांच्या मनावरचे या सिनेमाचे गारूड कमी झालेले नाही. काय आहे ते गारूड?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दि. १५ ऑगस्ट १९७५ रोजी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा टप्पा ठरलेला ‘शोले’ हा जी.पी. सिप्पी यांचा चित्रपट मुंबईच्या मुंबई सेंट्रल भागातील मिनव्‍‌र्हा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पूर्वीचे लोकप्रियतेचे बरेच रेकॉर्ड मोडून स्वत:चा असा विक्रम प्रस्थापित केला.
असाच एक विक्रम आमच्या राजाभाऊंनीदेखील केला. ‘शोले’ प्रदर्शित झाला तेव्हा राजाभाऊ विशीचे. तेव्हापासून राजाभाऊंनी दर वर्षी किमान पाचदा ‘शोले’ पाहण्याचे ठरविले. पाहता पाहता शोलेची चाळिशी, तर राजाभाऊंची साठी आली. दोनशे वेळा ‘शोले’ पाहण्याची आहुती पूर्ण झाली. त्यामुळे शोलेने (अग्निदेवाने) प्रसन्न होऊन राजाभाऊंना थ्रीडी दिव्यदृष्टी दिली. तर मंडळी अशा या राजाभाऊंच्या जबानी शोलेची ही थ्रीडी कहाणी..
‘शोले’च्या प्रदर्शनापासून ते आजतागायत म्हणजे गेली ४० वर्षे आम्ही या चित्रपटाबद्दल विविध कथा, दंतकथा ऐकत आलो आहोत. अगदी सिनेमाच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांनी घेतलेल्या बिल्डिंगपासून ते कलाकारांच्या लोकप्रियतेपर्यंत बरेच काही ऐकण्यात आले, तर काही समीक्षक मंडळी ‘शोले’ची समीक्षा करण्यात अजूनही गुंतलेली आहेत. त्यातील चुका, त्रुटींचा शोध ही मंडळी घेत आहेत; तथापि राजाभाऊंसारखी सोशल मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे करीत आहेत. अधूनमधून त्यांना यात यश येते.
आता हेच पाहा ना! मध्यंतरीच्या काळात व्हॉटस्अपवर ‘शोले’तील एक क्लिप अपलोड झाली. या क्लिपमध्ये ठाकूर बलदेवसिंह ऊर्फ संजीवकुमार ज्यांचे हात गब्बरने खांद्यापासून तोडलेले आहेत, त्यामुळे ते पायात असलेल्या खिळ्यांच्या बुटाने गब्बरला तुडवतात असे आहे; पण या क्लिपमध्ये चक्क ठाकूरच्या नसलेल्या हातांचे पंजे गोल सर्कल करून हायलाइट केलेले आहेत. अर्थातच चित्रीकरणासाठी ठाकूरचे दोन्ही हात पाठीकडील बाजूस बांधलेले होते हे खरे. असो, मात्र ही क्लिप स्लो मोशनमध्ये पाहात असताना, चक्क ठाकूरच्या हाताचा पंजा नजरेस येतो. ‘शोले’चे अगदी पारायण केलेल्या कोणत्याही सिनेरसिकाला हे हाताचे पंजे यापूर्वी कधी दिसले नाहीत. मात्र राजाभाऊंच्या थ्रीडी दिव्यदृष्टीमुळे ही गंमत व्हॉटस्अपच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आली. आता हे पंजे खरे की खोटे? का टेक्नॉलॉजीने निर्माण केलेले वगैरे वगैरे वादविवाद.. पण काहीही असो प्रेक्षकांची करमणूक झाली हे नक्की.
‘शोले’ – एक शिवधनुष्य
‘शोले’ची निर्मिती म्हणजे एक शिवधनुष्यच, जे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी मोठय़ा हिमतीने उचलले, बऱ्याच अडीअडचणी आल्या; मात्र त्यातून ब्लॉकब्लास्टर अशी ‘शोले’ची निर्मिती झाली. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात विक्रमांची नोंद करणारा चित्रपट म्हणून ‘शोले’कडे पाहिले जाते. यात रामगढ या खेडय़ाचा सेट बंगलोरपासून ४० कि.मी. अंतरावर असलेल्या रामनगरमजवळ उभारण्यात आला होता. यात ठाकूरची हवेली, वेगवेगळी दुकाने, बारा बलुतेदार, विहीर, मंदिर, मस्जिद, अगदी कापूस पिंजण्याच्या दुकानापासून ते थेट पाण्याच्या टाकीपर्यंत सर्व काही नीटनेटके उभारले. एकीकडे हुबेहूब असे ग्रामीण भागाचे दर्शन देणारे रामगढ हे खेडेगाव, तर दुसरीकडे क्रूरकर्मा गब्बरसिंगचा भयावह असा अड्डाही अचूक साकारला. रसिक प्रेक्षकांनीही रामगढला खरेखुरे खेडेगाव म्हणून स्वीकारले. असो. पण यात एक गंमत म्हणजे, प्रत्यक्षात ठाकूरच्या हवेलीमागेच गब्बरचा अड्डा होता. मात्र रामगढ व गब्बरचा अड्डा हे दोन्हीही एकमेकांपासून लांब असल्याचे चित्रपटातील अनेक प्रसंगांतून आपणास दिसले. ही दिग्दर्शकाची कमाल.
ही माहिती राजाभाऊंना समजल्यावर त्यांनी काहीही आश्चर्य व्यक्त न करता एक प्रश्न विचारला की, चित्रपटात जया भादुरी या त्यांच्या हवेलीचे दिवे बंद व चालू करतात असे बऱ्याचदा होते आणि ते जय ऊर्फ अमिताभ बच्चन पाहतात व त्यांचे अफेअर होते. मला सांगा, आता एवढी मोठी ठाकूरची हवेली, पण तिथे लाइट कनेक्शन का नव्हते? का लोडशेडिंग होते? त्यावर लोडशेडिंग सोडाच, पण गावात लाइटच नव्हती असे म्हटले, तर राजाभाऊ उत्तरले, अहो, गावात लाइट नव्हती तर मग पाण्याची टाकी बांधण्याचे कारण काय? कशाला फालतू खर्च केला? त्या टाकीत पाणी कसे चढत असणार? वगैरे वगैरे. आता काय उत्तर देणार, टाकीवर चढलेल्या वीरूलाच विचारावे लागेल की, टाकीत पाणी होते की नाही. असो..
कडी मेहनत
‘शोले’च्या यशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे यातील पात्रांची अचूक निवड. प्रत्येक पात्र, कलावंत व त्याची भूमिका याचा पुरेपूर विचार, तसेच वेशभूषा, रंगभूषा याबाबत केलेला अभ्यास हा महत्त्वाचा आहे, कारण अगदी एखादाही प्रसंग अथवा संवाद कलावंताच्या वाटय़ाला आला असला तरी तो कलावंत त्यामुळेच नावारूपास आलेला आहे, याची साक्ष गेल्या चाळीस वर्षांचा ‘शोले’चा इतिहास देतो. सुरमा भोपाली- जगदीप, अंग्रेजों के जमाने के जेलर- असरानी, कालिया- विजू खोटे, सांबा- मॅकमोहन, ही यातील महत्त्वाची नावे. तर मुख्य पात्रांच्या निवडीबद्दलही बरीच खलबते झाली. गब्बरसिंग ही भूमिका डॅनी करणार होते, पण फिरोज खान यांच्या ‘धर्मात्मा’चे चित्रीकरण त्याचदरम्यान असल्याने तारखेची अडचण झाली. ‘शोले’साठी डॅनी यांची घालमेल सुरू होती, पण शेवटी फिरोज खानसाठी ‘शोले’ला नकार द्यावा लागला आणि चरित्र अभिनेते जयंत यांचे सुपुत्र अमजद खान यांच्या वाटय़ाला ही भूमिका आली. या भूमिकेच्या अभ्यासासाठी अमजद खान यांनी ‘अभिशापीत चंबल’ हे चंबलच्या डाकूंवर आधारित जया भादुरी यांच्या वडिलांनी लिहिलेले पुस्तक वाचले, भूमिकेचा अभ्यास केला. अमजद खान लहान असताना त्यांच्या घरी येणारा धोबी हा स्वत:च्या पत्नीस बोलावताना ‘अरी ओ शांती’ असा आवाज देत. ती आवाज देण्याची स्टाइल अमजद खान यांच्या लक्षात होती. त्यांनी त्याच लयीमध्ये सहजतेने ‘अरे ओ सांबा’ असा आवाज देऊन सांबाला बोलावले आणि हा डायलॉग हिट झाला. प्रचंड मेहनत घेऊन अमजद खान यांनी या भूमिकेचे सोने केले हे नव्याने सांगणे नको.
असो, थ्रीडी चष्म्यातून पाहात राजाभाऊंनी मात्र एक विलक्षण प्रश्न केला की, एक सांगा या ‘शोले’त डबल रोल कोणी केला? बराच विचार केला, डोके खाजवले; मात्र उत्तर मिळाले नाही. त्यावर राजाभाऊंनी गब्बरसिंग स्टाइलचे हाऽऽऽ हाऽऽऽऽ हाऽऽऽऽ असे हास्य करत राजाभाऊंनी सांगितले की, शोलेमध्ये डबल रोल हा इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने केलेला आहे. तो कसा? तर अमिताभ हे नेहमी टॉस करीत असलेल्या नाण्याच्या दोन्ही बाजूंना राणी एलिझाबेथच आहे. तो त्यांचा डबल रोल. द्या टाळी..
अचूकतेचा अट्टहास
७० च्या दशकात निर्माते जी. पी. सिप्पी यांचे नाव गाजलेले. याआधी ‘ब्रह्मचारी’, ‘सीता और गीता’, ‘अंदाज’, ‘बंधन’, ‘मेरे सनम’ या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केलेली. त्यामुळे ‘शोले’च्या वेळी दिग्दर्शक रमेश सिप्पींवर नैतिक जबाबदारीचे दडपण असावे म्हणूनच ‘शोले’चा प्रत्येक सीन हा अगदी परफेक्टच असावा हा अट्टहास. त्यामुळे शोलेची निर्मिती जिकिरीची आणि खर्चीक झाली. या चित्रपटात सुरुवातीला असलेली रेल्वेतील डाकूंची फाइट, एक छान सिक्वेन्स. पनवेल ते उरण या रेल्वे ट्रॅकवर याचे चित्रीकरण करण्यात आले. त्या काळी एका ट्रॅकवरून केवळ एकच ट्रेन हा रेल्वेचा नियम. म्हणून दुसरी ट्रेन येण्याच्या आत चित्रीकरण करणे, तसेच ट्रेन परत पाठविणे वगैरे अडचणी. यात वेळेचे बंधन पाळणे सर्वानाच महत्त्वाचे. साधारणत: फेब्रुवारी १९७५ च्या शेवटी या चित्रीकरणाची सुरुवात झाली आणि सात आठवडय़ांच्या कालावधीनंतर दोन-तीन कॅमेरांच्या साहाय्याने हे चित्रीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले, जे तब्बल बारा मिनिटे पडद्यावर आहे. त्यामुळे या चित्रपटाची भव्यता लगेचच लक्षात येते. एकूणच ‘शोले’च्या विविध प्रसंगांमधून त्याचा मोठा आवाका लक्षात येतो व हे करण्यास कसे परिश्रम, किती वेळ लागला असावा हेही समजून येते.
मात्र राजाभाऊंना या वेळेच्या गणितापेक्षाही तीन तास २५ मिनिटे लांबीचा ‘शोले’ पाहताना चित्रपट सुरू झाल्यापासून ४२ व्या मिनिटानंतर झालेले हिरोईनचे म्हणजे बसंती ऊर्फ हेमा मालिनीचे दर्शन अस्वस्थ करून जाते. ते म्हणतात, ही काय पद्धत झाली? हिरोईनचे दर्शन होण्यासाठी आम्ही इतका वेळ का वाट पाहायची? काय करणार, बसंतीचे फॅन असलेले बिचारे राजाभाऊ या वयातही ते आपल्या पत्नीला कधी कधी बसंती म्हणून आवाज देतात. त्यामुळे राजाभाऊ अस्वस्थ झाले असावेत.
क्रूरकर्मा गब्बर
काही दिवसांपूर्वी अभिनेता सचिनच्या चित्रपट क्षेत्रातील ५० वर्षांच्या कारकीर्दीबद्दल एका चॅनलने विशेष कार्यक्रम केला. यात मान्यवरांची भाषणेही झाली. त्या वेळी ‘शोले’चे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘शोले’साठी चित्रित केलेली सचिनची काही दृश्ये दाखविली, जी प्रत्यक्ष चित्रपटात नव्हती. सेन्सॉरने कट करण्यास सांगितली होती. कारण यात अत्यंत क्रूरतेने गब्बरसिंग अहमदची हत्या करतो असे दाखविण्यात आले होते. मात्र सेन्सॉरच्या हरकतीमुळे ती दृश्ये कट करण्यात आली. गब्बरसिंग अहमदला आपल्यासमोर नाक रगडण्यास सांगतो, पण तो नकार देऊन त्यास मारण्यास धावतो. शेवटी गरम सळईने अहमदची हत्या करून त्याचा मृतदेह रामगढला पाठविला जातो. असे मूळ चित्रीकरण. यात सचिनचा खूप चांगला अभिनय झाला होता. पण आपणास पडद्यावर असे दिसते की, गब्बरसिंग खाटेवर पहुडलेला असताना त्याचा एक साथीदार सांगतो, ‘सरदार ये रामगढ का छोरा है, शहर जा रहा था हमे मिला’ आणि गब्बर स्वत:च्या हातावर चढलेल्या मुंगळ्याला मारतो. कट टु.. गावात अहमदचा मृतदेह घेऊन आलेला घोडा पाहून सर्व गावकरी जमतात. जय आणि वीरू दोघेही अहमदचा मृतदेह घोडय़ावरून खाली उतरवून जमिनीवर ठेवतात असा हा प्रसंग.
या दृश्यासाठी सचिनऐवजी डमी कलाकार घेण्याचे रमेशजींच्या मनात होते. मात्र सचिन यांनी स्वत: हे काम करण्याचे ठरविले. या प्रसंगात सचिन यांनी आपली बॉडी एकदम ताठर ठेवली व श्वास बराच वेळ रोखून धरला. त्यामुळे मृतदेह घोडय़ावरून उतरविताना अमिताभ बच्चन काही सेकंद स्तब्ध झाले. शॉट ओके झाल्यानंतर त्यांनी सचिनला प्रश्न विचारला की, तू किती पिक्चरमध्ये काम केलेले आहे. सचिन उत्तरले ६०. उत्तर ऐकताच अचंबित होऊन अमिताभजींनी परत विचारले, कधीपासून चित्रपट क्षेत्रात काम करत आहात. १९६२ पासून. सचिनजींचे उत्तर. आणि तेव्हापासून महानायक अमिताभ बच्चन हे सचिनजींना सीनिअर अ‍ॅक्टरचा सन्मान देऊ लागले. पुढेही बऱ्याच चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केले.
पुरे पचास हजार
असो, हे सर्व खरे असले तरी राजाभाऊंना मात्र सांबा आणि कालियाबद्दलची चिंता. कारण सांबाला संपूर्ण चित्रपटात केवळ एकच डायलॉग- पुरे पचास हजार, तर कालियाला दोन-तीन डायलॉग. तरीही या व्यक्तिरेखा व कलावंत फेमस कसे? आता काय सांगणार, या दोन्हीही कलावंतांनाही असाच प्रश्न पडला होता. सांबा ऊर्फ मॅकमोहनने तर चित्रपटाचा ट्रायल शो पाहून अक्षरश: रडत रडत आपली कैफियत दिग्दर्शक रमेशजींसमोर मांडली. या चित्रपटातील त्यांची भूमिका एखाद्या एक्स्ट्रा कलावंतासारखी वाटते, त्यामुळे त्यांची भूमिकाच कट करा असा त्यांचा आग्रह. त्यावर सेन्सॉरच्या तावडीतून जेवढे वाचू शकले ते ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, असे रमेशजींनी सांगितले. पण तू काही काळजी करू नकोस, हा चित्रपट पाहून कोणताही प्रेक्षक सांबाला विसरू शकणार नाही असे ते त्या वेळी म्हणाले. रमेशजींचे ते शब्द अक्षरश: शंभर टक्के खरे ठरले आणि सांबा ही भूमिका अविस्मरणीय झाली.
चित्रपटातील सर्वच कलावंतांनी चित्रीकरणासाठी महत्त्वपूर्ण अशी साथ दिली. दरम्यान, अमिताभ आणि जया यांचे लग्न झाले. धर्मेद्र आणि हेमा मालिनी यांचे प्रेमप्रकरण बहरत गेले. बऱ्याच काही घटना घडल्या, तर सचिननेदेखील त्याचे शूटिंग संपल्यावर रमेश सिप्पींच्या परवानगीने प्रॉडक्शनसाठी इतर विभागात मदत केली. तर अमजद खान स्वतंत्र युनिट सांभाळायचे.
चित्रपटात एक दृश्य असे आहे की, जय व वीरू रामगढला येतात. त्यांच्या राहण्याची व्यवस्था ठाकूरच्या हवेलीशेजारील एका घरात केली जाते. घराचे दार उघडताच काही मंडळी त्यांच्यावर हल्ला करतात. तो हल्ला दोघेही परतवून लावतात. त्यांच्या ताकदीची परीक्षा घेण्यासाठी ठाकूरनेच ही मंडळी पाठविलेली असते हा प्रसंग. याच्या चित्रीकरणासाठी इंग्लंडच्या स्टंटमॅनची टीम होती. ते त्यांच्याशी इंग्रजीत संवाद साधून योग्य काम करून घेणे महत्त्वाचे असल्याने इंग्रजीची उत्तम जाण असलेले अमजद खान यांची दुभाषक तथा त्या युनिटचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे कामही अमजद खान यांनी यथायोग्य पार पाडले व ‘शोले’च्या निर्मितीस हातभार लावला.
असो. या सर्व घटनांना आता चाळीस वर्षे पूर्ण झालेली आहेत. तरीही या चित्रपटाचा प्रभाव जराही कमी झालेला नाही. अजूनही विविध वाहिन्यांवर हा चित्रपट वारंवार दाखविला जातो, त्या वेळी तो आवडीने पाहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ‘रामगढ के शोले’, ‘मालेगाव के शोले’, ‘जंग के शोले’, ‘राम गोपाल वर्मा की आग’ (शोले), असे बरेच नामसाधम्र्य असलेले चित्रपट निघाले. राजाभाऊंनीही मोठय़ा उत्सुकतेने हे चित्रपट पाहिले. कारण या सर्व नावांमध्ये ‘शोले’ हे नाव होते ना. पण छे! त्यांना ते अजिबात आवडले नाहीत. राजाभाऊ स्पष्टपणे म्हणतात की, अहो, शोलेची बरोबरी अथवा नक्कल कोणीही करू शकणार नाही. अगदी सिप्पींनी सुद्धा ठरविले तरी शोलेसारखा दुसरा चित्रपट निर्माण होणे नाही.
डॉ. राजू पाटोदकर – response.lokprabha@expressindia.com