हिंदी सिनेमामध्ये सुपरस्टार ब्रॅण्ड बनलेल्या नायकांची पडद्यावरची नावे आणि त्यांची लोकप्रियता यांचे घनिष्ठ नाते नेहमीच आढळते. अलीकडेच सलमान खानने ‘प्रेम’ हे आपले नाव पुन्हा एकदा सिनेमात वापरले. अमिताभ बच्चन यांचे पडद्यावर बऱ्याचदा ‘विजय’ हे नाव लोकप्रिय ठरल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याचप्रमाणे जुना करिश्मा आणि प्रेमी नायकाची लोकप्रिय ठरलेली प्रतिमा पुन्हा एकदा वापरता यावी म्हणून ‘दिलवाले’ या सिनेमात शाहरूख खाननेही ‘राज’ हे नाव आपल्या व्यक्तिरेखेसाठी पुन्हा वापरले आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सिनेमापूर्वीही काजोलने ‘बाजीगर’ या सिनेमात शाहरूखसोबत काम केले असले आणि तो सिनेमाही सुपरहिट ठरला असलातरी ‘डीडीएलजे’ने इतिहास घडविल्यामुळे काजोल-शाहरूखचे नाव घेताच फक्त हाच सिनेमा प्रेक्षकांना लगेच स्मरतो. मात्र डीडीएलजेप्रमाणे ‘दिलवाले’मध्ये काजोलच्या व्यक्तिरेखेचे नाव मात्र सिमरन असे नसून ‘मीरा’ असे आहे. सुपरस्टार नायक आणि गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत अशा नायकांचा बनलेला ब्रॅण्ड यामुळे फक्त नायकाचेच जुने लोकप्रिय नाव पुन्हा त्याच्या नवीन सिनेमातील व्यक्तिरेखेसाठी वापरणे बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे असते. नायिकेच्या बाबतीत मात्र असे झालेले नाही. सिनेमाकर्त्यांनी म्हणूनच ‘राज’ या नावाची क्लृप्ती पुन्हा चालविण्याचे ठरविले असावे.
‘बाजीराव मस्तानी’ या प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त ठरलेल्या सिनेमाच्या बरोबरीने म्हणजेच १८ डिसेंबरलाच ‘दिलवाले’ हा सिनेमाही प्रदर्शित होतोय हे एव्हाना प्रेक्षकांच्या लक्षात आले आहे. भन्साळींच्या सिनेमासारखी प्रसिद्धी काजोल-शाहरूखच्या ‘दिलवाले’ने केलेली नसली तरी त्या दोघांचे चाहते, मसाला एण्टरटेनर सिनेमांचा बादशहा रोहित शेट्टीच्या सिनेमांचे चाहते यामुळे ‘दिलवाले’चीही धूम आहेच.
‘डीडीएलजे’नंतर २० वर्षांनी आणि ‘माय नेम इज खान’नंतर पाच वर्षांनी शाहरूख-काजोल ही जोडी प्रेक्षकांसमोर प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘डीडीएलजे’ने प्राप्त केलेला ‘कल्ट फिल्म’चा दर्जा आणि एसआरके-काजोलची अद्भुत केमिस्ट्री हाच या सिनेमाचा लोकप्रियतेचा मुद्दा ठरणार आहे, असे बोलले जात आहे; किंबहुना ‘गेरूआ’ या ट्रेलरमार्फत शाहरूख-काजोल जोडीचे प्रेमगीत लोकप्रिय करण्यावर रोहित शेट्टीने भर दिला आहे. वास्तविक ईशिता-वीर या तरुण व्यक्तिरेखांची प्रेमी जोडी कीर्ती सनोन-वरुण धवन या नव्या जोडीने साकारली असून त्यांची प्रेमकहाणी आणि त्याच वेळी राज-मीरा यांची प्रेमकहाणी समांतर दाखविण्याचा प्रयत्न करत आजच्या तरुणाईला सिनेमाकडे आकर्षित करण्याची क्लृप्तीही रोहित शेट्टीने केली आहे.
या सिनेमाचे पोस्टर आणि ‘दी बेस्ट ऑफ मी’ या २०१४ मध्ये गाजलेल्या प्रेमकथापटाचे पोस्टर अतिशय सारखे आहे. ‘दिलवाले’ची सारांशरूपी कथा अद्याप कुठेही प्रसिद्ध करण्यात आलेली नसली तरी या पोस्टरच्या साम्यावरून गाजलेल्या अमेरिकनपटाच्या कथेशी ‘दिलवाले’चे साम्य असू शकेल असे मानायला निश्चितच आहे. अर्थात रोहित शेट्टी हा मसाला एण्टरटेनर दिग्दर्शक आहे. त्यामुळे ‘साँग अॅण्ड डान्स’ आणि ‘कार रेसिंग’ फॉम्र्युला, विनोदाचा तडका अशा ‘फिल्मीगिरी’चा पुरेपूर वापर त्याने याही सिनेमात केला आहे हे ट्रेलर पाहून लगेच समजते. त्यामुळे थेटपणे हा सिनेमा अमेरिकनपटाची नक्कल आहे असे म्हणता येणार नाही. मात्र पोस्टर साधम्र्य आहे हे जाता जाता नमूद करायला हरकत नाही.
सुनील नांदगावकर –