हिंदी सिनेमामध्ये सुपरस्टार ब्रॅण्ड बनलेल्या नायकांची पडद्यावरची नावे आणि त्यांची लोकप्रियता यांचे घनिष्ठ नाते नेहमीच आढळते. अलीकडेच सलमान खानने ‘प्रेम’ हे आपले नाव पुन्हा एकदा सिनेमात वापरले. अमिताभ बच्चन यांचे पडद्यावर बऱ्याचदा ‘विजय’ हे नाव लोकप्रिय ठरल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याचप्रमाणे जुना करिश्मा आणि प्रेमी नायकाची लोकप्रिय ठरलेली प्रतिमा पुन्हा एकदा वापरता यावी म्हणून ‘दिलवाले’ या सिनेमात शाहरूख खाननेही ‘राज’ हे नाव आपल्या व्यक्तिरेखेसाठी पुन्हा वापरले आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सिनेमापूर्वीही काजोलने ‘बाजीगर’ या सिनेमात शाहरूखसोबत काम केले असले आणि तो सिनेमाही सुपरहिट ठरला असलातरी ‘डीडीएलजे’ने इतिहास घडविल्यामुळे काजोल-शाहरूखचे नाव घेताच फक्त हाच सिनेमा प्रेक्षकांना लगेच स्मरतो. मात्र डीडीएलजेप्रमाणे ‘दिलवाले’मध्ये काजोलच्या व्यक्तिरेखेचे नाव मात्र सिमरन असे नसून ‘मीरा’ असे आहे. सुपरस्टार नायक आणि गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत अशा नायकांचा बनलेला ब्रॅण्ड यामुळे फक्त नायकाचेच जुने लोकप्रिय नाव पुन्हा त्याच्या नवीन सिनेमातील व्यक्तिरेखेसाठी वापरणे बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे असते. नायिकेच्या बाबतीत मात्र असे झालेले नाही. सिनेमाकर्त्यांनी म्हणूनच ‘राज’ या नावाची क्लृप्ती पुन्हा चालविण्याचे ठरविले असावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा