अलीकडे रुपेरी पडद्यापेक्षा छोटय़ा पडद्यावरचे कलावंत मोठय़ा प्रमाणावर घराघरांत पोहोचत असल्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवितात. आतापर्यंत निदान मराठी कलावंतांच्या बाबतीत तरी सुरुवातीला नाटकांचा ग्रुप, एकांकिका स्पर्धा, मग छोटय़ा पडद्यावरील छोटय़ा-मोठय़ा किंवा प्रमुख भूमिका, एखादा रिअ‍ॅलिटी शो आणि नंतर रुपेरी पडदा अशी वाटचाल असायची. परंतु, आता एकाच वेळी नाटक-चित्रपट-मालिका, रिअ‍ॅलिटी शो अशा शक्य त्या सर्व माध्यमांत मराठी कलावंत दिसू लागलेत. लोकप्रियतेत सातत्य राखण्यासाठी कलावंतांना छोटा पडदा अधिक फलदायी आणि आर्थिकदृष्टय़ाही अधिक लाभदायी ठरताना दिसतोय.
परंतु, केवळ रिअ‍ॅलिटी शोचा स्टार म्हणून लोकप्रियता मिळवून अल्पावधीत चित्रपटातून प्रमुख भूमिकेत झळकण्याची संधी कपिल शर्मा या कलावंताला मिळाली आहे. आतापर्यंत तो फक्त विनोदवीर म्हणून प्रेक्षकांसमोर सातत्याने आला आहे.
‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा त्याचा पहिला स्वत:चा रिअ‍ॅलिटी शो कलर्स वाहिनीवरून जून २०१३ पासून प्रसारित होण्यास सुरुवात झाल्यानंतर कपिल शर्माला न भूतो न भविष्यति अशी लोकप्रियता मिळाली आहे. स्टॅण्ड अप कॉमेडियन म्हणून २००७ पासून ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज असो की कॉमेडी सर्कस, रिअ‍ॅलिटी शोची विविध पर्वे असो कपिल शर्मा आपल्या विनोदी शैलीने हा हा म्हणता लोकप्रियतेच्या शिखरावर स्वार होत गेला अणि कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोद्वारे त्याने अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली. आता या विनोदवीराला ‘किस किस को प्यार करू’ हा चित्रपट मिळाला असून हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे रोमॅण्टिक थ्रिलर, थ्रिलर, क्राइम थ्रिलर, अ‍ॅक्शन थ्रिलर असे थ्रिलर या गटातील सर्व प्रकार हाताळणारे गाजलेले दिग्दर्शकद्वय अब्बास-मस्तान यांनी प्रथमच ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटाद्वारे लोकप्रिय विनोदवीराला घेऊन रोमॅण्टिक कॉमेडी प्रकार हाताळत आहेत.
अब्बास-मस्तान यांचे नाव घेतले की चटकन आठवतील ते ‘बाजीगर’ आणि नंतर ‘रेस’ आणि ‘रेस २’ हे चित्रपट. रोमकॉम हा चित्रपट प्रकार त्यांनी कधीच हाताळलेला नाही. त्यामुळेही ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटाबाबत उत्सुकता वाटायला हरकत नाही.
या चित्रपटाची कथा मात्र जुनाट वाटावी अशी आहे. एक उद्योगपती आहे ज्याचे नाव आहे शिव राम किशन. हे त्याचे संपूर्ण नाव असले तरी तो या तीन नावांनी तीन बायकांशी लग्न करतो आणि एवढे कमी म्हणून की काय चौथ्या तरुणीच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशीही लग्नाचा घाट घालणार असतो. परंतु, त्याच दरम्यान तिन्ही बायकांना त्याच्या लग्नाविषयी समजते. आणखी एक विशेष म्हणजे त्याच्या तिन्ही बायका एकाच अपार्टमेंटमध्ये राहत असतात तरी त्यांना आपला नवरा अशी फसवणूक करतोय हे माहीत नसते.
एका पुरुषाला तीन बायका असणे अशा प्रकारच्या कथेत विनोदनिर्मितीच्या शक्यता वाढतात हे मान्य केले तरी आताच्या काळातील प्रेक्षकांना या गोष्टीचे नावीन्य किती वाटेल हा प्रश्न मनात येतो. कपिल शर्माच्या तीन बायकांच्या व्यक्तिरेखा मंजिरी फडणीस, सई लोकूर, सिमरन कौर मुंडी यांनी साकारल्या आहेत. तर तीन लग्नं केल्यानंतर पुन्हा कपिल जिच्या प्रेमात पडतो त्या तरुणीची व्यक्तिरेखा एली अवराम या अभिनेत्री साकारली आहे. यापैकी सई लोकूरने तीन-चार मराठी चित्रपटांतून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. एली अवराम ही बिग बॉसच्या सातव्या पर्वातील स्पर्धक होती. ग्रीक-स्वीडिश पाश्र्वभूमी असलेली एली अवराम हीसुद्धा एका रिअ‍ॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आली होती. सिमरन कौर मुंडी ही मॉडेल आहे. २००८ साली तिने मिस इंडिया युनिव्हर्स हा किताब पटकाविला आहे. मंजिरी फडणीस ही मराठी असली तरी तिची संपूर्ण कारकीर्द २-३ पडेल हिंदी चित्रपट आणि भरपूर तेलुगू आणि कन्नड चित्रपटांची आहे. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘सर्व मंगल सावधान’ या मराठी चित्रपटातून ती झळकणार आहे.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com