मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांमध्ये सचिन कुंडलकर हे एव्हाना सुस्थापित झालेले नाव म्हणता येईल. ‘रेस्टॉरण्ट’ ते ‘हॅप्पी जर्नी’ पर्यंत मोजकेच चित्रपट परंतु नवं काही देण्याचा प्रयत्न करणारा दिग्दर्शक अशी त्यांची ओळख मराठी प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. ‘हॅप्पी जर्नी’मधून फॅण्टसीच्या प्रयोगानंतर सचिन कुंडलकर पिढीजात व्यवसाय करून नामवंत झालेल्या एकत्रित कुटुंबाची गोष्ट ‘राजवाडे अॅण्ड सन्स’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर मांडणार आहेत.
मुंबई-पुणे आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिरे-मोती-सोने-चांदी व्यवसायात पिढय़ान्पिढय़ा नाव कमावलेली आणि ‘ब्रॅण्ड’ बनलेली अनेक मराठी कुटुंबं आहेत. अशाच एका मोठय़ा एकत्रित कुटुंबाच्या तीन पिढय़ामधील नातेसंबंध, संघर्ष, पिढीजात व्यवसायाचे प्रश्न, ब्रॅण्ड व्हॅल्यूमुळे निर्माण झालेला गुंता अशा अनेक कोनांतून एका एकत्रित कुटुंबाची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न सचिन कुंडलकर यांनी या चित्रपटातून केला असावा याचा अंदाज ट्रेलर पाहून करता येतो. ‘जनरेशन गॅप’ हा विषयही या चित्रपटात आहे.
‘जनरेशन गॅप’मुळे निर्माण झालेला पिढय़ान्पिढय़ांतील भेद, जुन्या काळातील गोष्टींना चिकटून वागणाऱ्या व्यक्ती, नवीन विचार, नवीन जीवनशैलीला काळानुरूप बदल करून स्वीकारण्याची प्रवृत्ती असलेल्या व्यक्ती अशा निरनिराळे पैलू दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटात असू शकेल, असाही कयास ट्रेलर पाहून करता येतो.
स्वत: दिग्दर्शक सचिन कुंडलकर, अभिनेता अतुल कुलकर्णी हे निर्माते म्हणून आव्हान पेलणार आहेत ही नवीन बाब आहे. आणखी एक अधोरेखित करण्याजोगा मुद्दा म्हणजे एल अॅण्ड टी फायनान्स होल्िंडग्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वाय. एम. देवस्थळी हे प्रथमच मराठी चित्रपटनिर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.
दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी ‘राजवाडे अॅण्ड सन्स’विषयी सांगताना नमूद केले की, ‘फॅमिली सागा’ करायचे खूप काळापासून मनात होते. आतापर्यंतच्या माझ्या चित्रपटांमधून एकेक व्यक्ती, एकेक पात्र, दोन-तीन व्यक्तिरेखा अशाच स्वरूपाचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. खूप व्यक्तिरेखा, अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी असा प्रकार मी हाताळलेला नव्हता. ‘फॅमिली सागा’ करायचे खूप काळापासून मनात होते ते ‘राजवाडे अॅण्ड सन्स’ या चित्रपटामधून मांडण्याचा योग जुळून आला, असे कुंडलकर म्हणाले.
यशवंत देवस्थळी यांचा पाठिंबा सहनिर्माता म्हणून कसा मिळविला याबाबत विचारले असता कुंडलकरांनी सांगितले की, त्यांच्याबद्दल सांगायचे तर ते वर्तमानकाळात जगणारे द्रष्टे व्यक्तिमत्त्व आहे. अर्थतज्ज्ञ असले तरी मराठी साहित्य आणि सिनेमा, संगीत याची त्यांना आवड आहे. चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना, मग कथा-पटकथा इथपासून देवस्थळी यांच्याशी भेट घेतली तेव्हापासून ते चित्रपटाची निर्मिती, संगीताची निर्मिती करण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग आहे हे नमूद करण्याजोगे आहे, असेही कुंडलकर सांगतात. मी आणि अतुल कुलकर्णी आम्ही दोघांनी एकत्रितपणे ‘कॅफे कॅमेरा’ ही निर्मितीसंस्था स्थापन करून त्याअंतर्गत ‘राजवाडे अॅण्ड सन्स’ हा पहिला चित्रपट केला आहे, अशी माहिती कुंडलकर यांनी दिली.
एकत्र कुटुंब म्हणजे नोस्टॅल्जिया मांडायचाय का असे विचारल्यावर ते म्हणाले की, फक्त स्मरणरंजन हाच भाग नाही तर आजही एकत्र कुटुंबं असतात, त्यातील सर्व जण एकत्र राहत असतात असे मात्र नव्हे. एकत्र राहत नसली तरी कुटुंबाचे निर्णय, कुटुंबाचा एकत्रित व्यवसाय याबाबतचे निर्णय एकत्र विचार करून घेणे हा भाग असतो. त्यामुळे आजच्या काळातील एकत्र कुटुंब आणि त्याचे वेगवेगळे पैलू मांडण्याचा प्रयत्न केल्याचे कुंडलकर म्हणाले.
आणखी एक मुद्दा मांडताना त्यांनी सांगितले की मराठी आणि मल्याळम् या दोन भाषांमध्ये आजच्या कथा मांडता येतात, दोन्ही भाषांमधील प्रेक्षक ते स्वीकारतो, नव्हे उचलून धरतो ही बाब निश्चितच अधोरेखित केली पाहिजे. म्हणूनच हा निराळा विषय चित्रपटामधून मांडण्याचे ठरविले, असे कुंडलकरांनी नमूद केले. हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com
फॅमिली सागा
मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांमध्ये सचिन कुंडलकर हे एव्हाना सुस्थापित झालेले नाव म्हणता येईल.
Written by दीपक मराठे
First published on: 02-10-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व आगामी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajwade and sons