बातमी समजल्यावर कितीही गोंधळ उडाला तरी काही गोष्टींचा शांतपणे विचार करणे, आवश्यक ठरते. ती व्यक्ती किती जवळची आहे. आपले संबंध घनिष्ठ असतील तर त्वरित जाणे आवश्यक असते. जाण्यापूर्वी संबंधित व इतरांकडून फोनवर माहिती घ्यावी. जवळचे नातलग, मित्र किंवा शेजारचे असतील तर अन्त्ययात्रेला जाणे आवश्यक असते. तिथे पोहोचल्यावर त्वरित काम करणारे नातेवाईक, मित्र असे लोक कमी असतील तर आपण कृती करावी. दुरून येणारे नातलग, अन्त्यसंस्काराची पूर्वतयारी या गोष्टी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते. अन्त्यसंस्कार संपल्यावर त्या घरी अन्न होणे शक्यच नसते. त्यासाठी हल्ली बाहेरचे अन्न उपलब्ध असते अर्थात परिस्थितीचा अंदाज घेऊन अन्नाची व्यवस्था करण्यात गृहिणी तरबेज असतात. त्यांना मदत करावी.
एका कॅन्सरग्रस्त मध्यमवयीन गृहिणीचे दु:खद निधन झाले. त्यांच्या घरात दु:खाचा आगडोंब उसळला होता. मृतदेह हलवताना शेजारणीच्या लक्षात आले हाताच्या एका बोटात सोन्याची अंगठी तशीच आहे. चटकन तिने अंगठी काढली व त्या गृहिणीच्या मुलीच्या हातात दिली. देताना हे पाहिले की आपली एक मैत्रीण तिथे आहे. ऑफिसमधील कर्मचारी, साहेब यांच्या घरात दुर्घटना घडली तर आपल्याला ते किती ओळखतात याचा विचार करून मदत करावी किंवा भेटीस जावे. समाचाराला-भेटीला जायचे असेल तर पहिले दोन दिवस संपल्यावर जावे म्हणजे घरातील माणसांची संख्या जरा कमी झालेली असते. आपल्याशी बोलायला त्या व्यक्तीला उसंत असते. खूप थकलेल्या जराजर्जर माणसाचे निधन झालेले असल्यास तिथे थोडक्यात भेट द्यावी. बोलणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकावे मात्र आपण शक्यतो काही सांगण्याचा प्रयत्न करू नये. मृत्यू अटळ आहे. बरं झालं, त्यांची सुटका झाली, असे सांगत बसू नये. अशा वेळी असे सत्य न बोललेले बरे. कारण ते समजलेले असतेच.
एकदा एका मेडिकल कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापकांचे निधन झाले. ते अनेक डॉक्टरांचे गुरू होते. शहरात त्यांचे खूप मोठे नाव होते. त्यांच्या मृत्यूनंतर कॉलेजात एक सभा होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोणी तरी सरांचा परिचय व आठवणी सांगितल्या. श्रद्धांजलीसाठी सर्व जण उभे राहिले. त्या वेळी सरांची एक डॉक्टर माजी विद्यार्थिनी माईकसमोर आली आणि तिने वेदातील एक ऋचा म्हटली.
ओम पूर्णमद: पूर्ण मिदं
पूर्णात पूर्ण मुदस्यते।
पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्ण
मेवावशिष्यते॥
शून्यात जाणारे, पंचत्वात विलीन होणारे शरीर, त्याचे यथोचित वर्णन यामध्ये आहे. एक मिनीट स्तब्धता पाळल्यानंतर पुढील सभेचे कामकाज सुरू झाले. दोन तासांनी सभा संपल्यावर अनेकांनी सांगितले, आज श्रद्धांजली खूप परिणामकारक व गंभीर वातावरणात झाली.
ऑफिसमधील माननीय व्यक्तींबद्दल आपल्या मनात आदर असतो. तरीसुद्धा आपण मानसिक दृष्टय़ा त्यांच्यापासून अंतर ठेवून असतो. त्यांच्याशी असलेले नाते जवळच्या मित्रापेक्षा दूरचे असते. अशा व्यक्तीच्या घरी दु:खद घटना घडल्यास आपली उपस्थिती पुरेशी असते. मदतीची गरज नसल्यास तेथून प्रस्थान करणे योग्य ठरते.
मृत्यूनंतरच्या उपचाराबाबत विविध समाजांत रूढी व परंपरांचा खूप पगडा असतो. त्याची माहिती करून घेतल्यास अशा अवघड प्रसंगी वागणे सोपे जाते. मात्र दु:खद प्रसंगी टाळाटाळ करून घाबरून बसणे योग्य नसते कारण आपल्याकडे म्हण आहे- मरण आणि तोरण (शुभ प्रसंग) कधीही टाळू नये. त्यामुळे आपला लोकसंपर्क राहतो.
अशा दु:खद प्रसंगी जाण्याचा अनुभव नसेल व भीती वाटत असेल तर इतर ओळखीच्या व्यक्तींसोबत समाचाराला जावे. सांत्वन करण्यासाठी जाण्यापूर्वी ती व्यक्ती घरी आहे याची फोनवर खात्री करून घ्यावी. भेटणाऱ्यांची खूप गर्दी असेल तर एक-दोन मिनिटांत अर्थपूर्ण शब्दांत आपल्या भावना व्यक्त करून परत यावे. मात्र अशा प्रसंगी काही गोष्टी अवश्य टाळाव्यात-
’ एसेमेस किंवा ट्विटरवर संपर्क साधून दु:खद प्रसंगी शॉर्टकट काढण्याचा प्रयत्न करू नये.
’ मृत व्यक्तीबद्दल सखोल माहिती विचारत बसू नये.
’ आपल्या वयाची सत्तरी पार केल्यानंतर, स्मशानात अन्त्ययात्रेस जाण्याचा आग्रह धरू नये. तेथेही वातावरण व कधी कधी ताटकळत बसण्याचा वयस्कर माणसांना खूप त्रास होतो व त्यामुळे इतरांचे हाल होतात.
विविध समाजगटांत अन्त्यसंस्काराच्या रीती वेगवेगळ्या असतात. एकदा गोव्यातील प्रसिद्ध उद्योगपती मरण पावले. त्यांचे पाच-सहा उद्योग, खाणी असे व्यवसाय असून हजारांवर लोक काम करतात. त्यांच्या कॅथलिक ख्रिश्चन समाजातील पोर्तुगीज रिवाजाप्रमाणे स्मशानात मृतदेह आणल्यावर त्या देहासमोर त्या व्यक्तीच्या समवेत लास्ट टोस्ट घेतात (ळं२३). या प्रथेप्रमाणे सगळेजण ड्रिंक घेतात, मृत व्यक्तीसोबत शेवटचे आनंदाचे, आदराचे क्षण घालवावे ही संकल्पना त्यात आहे. घरातले, नातलग यांनी थोडेसे ड्रिंक घेतले. इतर अनेक लोक, कर्मचारी व इतर समाजातील मंडळी हजर होती. त्यांनी ड्रिंक घ्यायला सुरुवात केली. मृतदेहाला माती देण्यापर्यंत दोन तासांच्या काळात ही मंडळी दूर बसून गप्पा मारू लागली. जुने कर्मचारी आठवणी सांगू लागले. गप्पा रंगल्या. अखेर दफनाचा कार्यक्रम संपला सगळे जण जाऊ लागले. शेवटी दहा-पंधरा जण तिथेच झोपले (भर दुपारी) त्यानंतर-जोरदार पाऊस आला. त्यानंतर पावसात भिजत ती मंडळी हळूहळू डुलत डुलत अंत्येष्टी संपवून आल्याचे समजले.
अन्त्यसंस्कार व समाचाराला गेल्यावर विविध प्रकारची माणसे भेटत असतात, ती बराच काळ लक्षात राहतात, म्हणून व्यावसायिक, दुकानदार व राजकारणी व्यक्ती अन्त्यदर्शनाला आवर्जून जातात. अप्रिय असले तरी अन्त्यदर्शन हेसुद्धा लोकसंपर्काचे खूप मोठे व प्रभावी साधन व संधी आहे असे जाणकार सांगतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा