कमी वेळात, कमी खर्चात दीर्घकाळ वेदना थांबविणारी अग्निकर्म ही आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ चिकित्सा केवळ भयापोटी मागे पडली आहे.
आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ चिकित्सा म्हणजे अग्निकर्म चिकित्सा, असे सुश्रुताचार्यानी वर्णन केलं आहे. कमी वेळात, कमी खर्चात दीर्घकाळ वेदना थांबविणारी ही चिकित्सा केवळ भयापोटी मागे पडली आहे. मी गेली चाळीस वर्षे ही चिकित्सा करीत आहे. हजारो रुग्णांना तिचा उत्तम फायदा झाला आहे. अनेकांच्या शस्त्रक्रिया टळल्या आहेत. तरीही ही चिकित्सा नेमकी काय? याविषयी समाजाच्या मनात भीतीयुक्त कुतूहल असते.
हल्ली व्यायामाचा अभाव, कामाचा ताण, खाण्याचे असंतुलन यामुळे आपल्या शारीरिक तक्रारी विशेषत: सांधेदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. मान, हात, पाय, पाठ, कमर, गुडघे, टाचा या अवयवांत दुखण्याचे खूप वाढले आहे. खराब रस्ते आणि त्यात खाचखळग्यातून प्रवास त्यामुळे शरीराला सतत बसणारे हादरे या गोष्टी शरीराच्या वेदना वाढविण्यास कारणीभूत होतात. अशा वेळी वेदनाशामक गोळय़ा घेऊन काम चालू राहते. पण काही वेळा कोणत्याच उपचाराला शारीरिक वेदना दाद देत नाहीत. असे रुग्ण वेदनेमुळे व्याकूळ झालेले असतात. त्यांना आराम हवा असतो. अशा वेळी त्यांना कोणत्याही उपचाराने आराम हवा असतो. अशा वेळी त्यांना अग्निकर्माविषयी माहिती सांगितली की त्यांना प्रथम भीती वाटते. मग थंड शलाका शरीरावर टेकवून दाखविल्यावर रुग्ण तयार होतात. पहिले एक-दोन डाग घेतल्यावर रुग्णांची भीती नाहीशी होते व ते तीव्र वेदनास्थान दाखवितात. अग्निकर्मामुळे वेदना कमी झाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू दिसते.
अग्निज्वालापासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करतो. कारण एक ठिणगीसुद्धा आगीला कारणीभूत होऊ शकते. या अग्नीच्या शीघ्र गुणाचा उपयोग आयुर्वेदाने चिकित्सेच्या दृष्टीने करून घेतला आहे.
वात, पित्त, कफ हे दोष अग्निकर्माने मानले आहेत. त्यांचे संतुलन बिघडले की, वेदना चालू होतात. किरकोळ वेदना किरकोळ उपायाने कमी होतात. हात अवघडला तर आपण तेथे हात फिरवितो. बरे वाटते. का बरे वाटते, कारण आपण तेथे थोडी उष्णता निर्माण करतो. त्या ठिकाणी तेवढी उष्णता पुरते. पण काही ठिकाणच्या वेदना वेदनाशामक गोळय़ांनाही दात देत नाहीत. तेथे अग्नी झटक्यात काम करतो. तिन्ही दोषांच्या असंतुलनामुळे झालेला अडथळा तीव्र अग्नीच्या संपर्काने लगेच नाहीसा होऊन वाहण्याची क्रिया झटक्यात चालू होते. आपोआप वेदना थांबतात. वात दोष हा शरीराच्या हालचाली चालू बंद करण्याचे काम करतो. वाताचे शमन होण्यासाठी उष्णतेची गरज असते. वात-कफाच्या संयोगाने निर्माण होणाऱ्या वेदना तीव्र असतात. अशा वेदना तीव्र उष्णतेशिवाय कमी होत नाहीत. त्या दोषांचे विलयन (पातळ होणे) करून वहनावस्था आणण्याचे कार्य अग्नी करतो. या अग्निकर्मासाठी चांदी वा सुवर्ण शलाकेचा (रॉड) उपयोग केला जातो. चटका वा डाग हा शब्द भयंकर आहे. पण चिकित्सा भयंकर नाही.
सायटिका, मान, हात, पाय, कमर, गुडघे, टाच वा इतर ठिकाणच्या कोणत्याही वेदना तात्काळ कमी होतात. येताना लंगडत येणारा रुग्ण वेदनेने व्याकूळ झालेला असतो. पण जाताना हसत जातो. असा माझा ४० वर्षांचा अनुभव आहे. या शिवाय ग्रंथामध्ये अनेक विकारांवर अग्निकर्म सांगितले आहे.
अपस्मार, अंडवृद्धी, छातीत दुखणे वगैरेसारख्या बऱ्याच व्याधींवर मी ही चिकित्सा करीत आहे. उचलून आणलेला रुग्ण जाताना स्वत:च्या पायांनी चालत जातो. विद्यार्थ्यांच्या मनात या चिकित्सेविषयी भीती असण्याचे कारण त्यांना ही चिकित्सा बघायलाच मिळत नाही. कॉलेजमध्ये शिकवलीच जात नाही. या चिकित्सेची महती चिकित्सा पाहिल्याशिवाय कळत नाही.
माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये गुडघेदुखीचे रुग्ण जास्ती आढळतात. त्या खालोखाल कमरदुखी, पाठदुखी, सायटिका, अस्थमा याचे रुग्ण आढळतात. गुडघेदुखीचे रुग्ण जास्ती असण्याचे कारण सर्व शरीराचा भार गुडघ्यावरच पडतो. सर्वात जास्त हालचाली पायांच्याच असतात. हालचाली व पडणाऱ्या शारीराचा भार याचा ताण कमी होण्याइतकी विश्रांती गुडघ्यांना मिळत नाही. उभ्याचा ओटा, डायनिंग टेबल, सोफ्यावर बसणे या क्रियांमध्ये मांडी घातलीच जात नाही. मांडी घातल्याशिवाय गुडघ्यांना विश्रांती मिळत नाही. गुडघेदुखी झाली की, मांडी घालू नका, खाली बसू नका अशा वेगवेगळय़ा सल्ल्यांमुळे पायांच्या हालचाली आणखी कमी होतात. त्यामुळे त्या सांध्यात जास्ती कठीणपणा येतो. तो येऊ नये म्हणून माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना मी सांगते सर्व हालचाली हळूहळू करणे गरजेचे आहे. फक्त जास्त ताण देऊ नका. हालचाली करत राहिल्यास संघाताची तीव्रता वाढत नाही.
जिना चढताना एका पायरीवर दोन्ही पाय घेऊन चढणारा रुग्ण पाचव्या मिनिटाला पाठोपाठ जिना चढून जातो. मांडी न घालता येणारा रुग्ण जमिनीवर बसून दाखवितो. कमरेत वाकल्यावर गुडघ्यापर्यंतच जाणारे हात रुग्ण जमिनीपर्यंत नेतात. मानदुखीचा रुग्ण मानेच्या हालचाली अग्निकर्मानंतर सहज करतो. फ्रोजन शोल्डरचा रुग्ण हाताच्या हालचाली लगेच करू शकतो. मनगटातील वेदना, टेनिस एल्बो, यांच्या हालचाली लगेच सुधारतात. श्वास (अस्थमा) लागणाऱ्या रुग्णाला लगेच आराम मिळतो. या लगेच मिळणाऱ्या आरामामुळे रुग्ण खूश होतात.
अग्निकर्मानंतर क्वचित् रुग्णांना थोडा त्रास होतो. पण नंतर फारसा त्रास होत नाही.
हे अग्निकर्म मधुमेही रुग्णांना पण करता येते. त्यांनाही लगेच आराम मिळतो. फक्त त्यांचे डाग बरे होण्यास चार-सहा दिवस जास्ती लागतात. त्यापेक्षा दुसरा उपाय नाही.
ज्याप्रमाणे क्षारसूत्र, पंचकर्माला जगात मान्यता मिळाली आहे तशी अग्निकर्मालाही जगन्मान्यता मिळावी ही इच्छा आहे.
जरी ही चिकित्सा भयानक वाटली तरी या चिकित्सेमुळे अनेक रुग्ण व्याधीमुक्त झाले आहेत. नव्या पिढीने आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास करून कमी वेळात, कमी खर्चात दीर्घकाळ वेदना थांबवणाऱ्या या चिकित्सेचा उपयोग करून समाजाला आरोग्यपूर्ण जीवन मिळावे ही इच्छा.
नोंद : अग्निकर्म चिकित्सा ही विशेषआयुर्वेदिक उपचार पद्धती असून वरील उपचार संदर्भातील या लेखातील माहितीचा वापर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय करू नयेत.