गौरी-गणपतीत या फुलांनी बहरलेली वेल भारतातील राना-वनांत हमखास आढळते. गौरी-गणपती पूजेच्या फुलांत हिला अढळस्थान प्राप्त झाले आहे. याच कारणाने या फुलांना ‘गौरीचे हात’ असेही एक नाव कोकणात प्रचलित आहे. बचनाग आणि खडय़ानाग या नावांनीसुद्धा ही ओळखली जाते. असे म्हणतात की, प्रसूतीचा काळ अपेक्षेबाहेर लांबला गेल्यास प्रसूतिकळा सुरुवात होण्यास कळलावीचा वापर पूर्वी केला जात असे. असे असले तरी या वेलीचे सर्वच भाग खूप विषारी आहेत हे लक्षात ठेवावे. सर्वात विषारी हिची मुळे असतात.
अग्निशिखा वेलीची फुले खूप दिवस टिकून राहतात. फुले एकामागून एक अशी फुलत जातात. अशी बहरलेली वनातील वेल दृष्टीस पडणे म्हणजे किती आनंददायी असते हे अनुभवल्यावरच उमजते. पावसाळ्यातील हिरवागार आसमंत, त्यात हिरव्याकंच वेलीवर चकाकणारे पावसाचे थेंब आणि तरारून उमलेली अग्निशिखा फुले; जणू पृथ्वीवरील नंदनवनच! या वेलीला कसलेही रोग लागत नाहीत. काही फुलपाखरांच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अळ्या दिसताच त्या काढून टाकाव्यात. काही फुलांपासून शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक बिया असतात.
अग्निशिखा वेलीचे शास्त्रीय नाव आहे Goloriosa superba. तिची आणखी एक पोटजात आहे; तिचे नाव आहे Gloriosa superba ‘Rothschildiana’. हिच्या पिवळ्या पाकळ्यांचा मध्यभाग लाल असतो. दोन्ही जातींची अभिवृद्धी बियांपासून किंवा मुळांच्या विभाजनाने करता येते.
नंदन कलबाग – response.lokprabha@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा