नाटय़क्षेत्रात अलीकडेच एका नाटकासाठी करार केला गेला. प्रत्यक्षात काही प्रयोगांनंतर हे नाटक बंद पडलं. तेव्हा निर्मात्याने संबंधितांना पंधरा प्रयोगांचे पैसे दिले. यामुळे नाटय़क्षेत्रात कराराचं वारं वाहू लागण्याची शक्यता आहे का?
काही क्षेत्रांमध्ये करार महत्त्वाचे असतात तर काही क्षेत्रांमध्ये शब्द महत्त्वाचा मानला जातो. तिथे शब्दांवर सारी गणितं आणि हिशेब चालतात. त्यापैकी एक म्हणजे मराठी नाटय़सृष्टी. आतापर्यंत झालेली नाटकं ही मुख्यत्वेकरून शब्द दिल्यामुळेच चालत आली आहेत. रंगभूमीवर जसं शब्दाला महत्त्व तसंच त्याबाहेरही. एखादं नाटक करताना निर्माता, लेखक, दिग्दर्शक, कलाकार सारीच जण शब्दांवर बांधली गेलेली. पण काही दिवसांपूर्वी पूर्णपणे व्यावसायिकीकरण करण्याच्या दृष्टीने एका नाटकाचा करार झाला. ते नाटक म्हणजे ‘तुजसाठी प्रिया रे’. पन्नास प्रयोगांचा हा करार होता. मात्र हे नाटक काही प्रयोगांनंतर बंद पडलं. त्यामुळे निर्मात्याने संबंधित मंडळींशी सल्लामसलत करून त्यांना १५ प्रयोगांचे पैसे दिले आणि नाटय़सृष्टीमध्ये पुन्हा कराराचे वारे वाहू लागले.
नाटय़सृष्टीतला हा पहिला करार नव्हता, पण बऱ्याच दिवसांनी असा करार झाला. याबद्दल अभिनेत्री आणि निर्मात्या मुक्ता बर्वे म्हणतात की, ‘‘नाटकामध्ये करार करणं हे कुणाच्याच सोयीचं नाहीए, ना निर्मात्यांच्या ना कलाकारांच्या. काही वेळेला कलाकार एखादं चागलं काम मिळालं की नाटक सोडतात किंवा काही वेळेला निर्माता ते नाटकं बंद करतात. मी अजूनपर्यंत कधीही नाटक सोडलेलं नाही. त्यामुळे माझ्याबाबतीत कधीच असा काही प्रसंग आला नाही. आता जे मी नाटक करतेय ते माझ्या संस्थेचंच आहे. पण पहिल्यांदा मी अन्य संस्थांमधून काम करायची. तेव्हा नाटकं मिळाल्यावर पहिले सहा महिने त्याला द्यायला हवेत, हे मी मनाशी ठरवायची. करार करणं एक शिस्त म्हणून चांगलं आहे, पण ते वर्क होईल, असं मला वाटत नाही. ’’
मुक्ता बर्वे यांच्या रसिक या संस्थेने ‘छापा काटा’ नावाचं पहिलं नाटकं रंगभूमीवर आणलं होतं. पहिल्यांदा या नाटकात रीमा काम करत होत्या, पण त्यानंतर त्यांची जागा नीना कुलकर्णीनी घेतली. नवीन रिप्लेसमेंट करताना निर्मात्याचा पैसा आणि वेळ दोन्ही गोष्टी वाया जात असतात, याबाबत मुक्ता बर्वे म्हणतात की, ‘‘ निर्माती म्हणून मला विचाराल तर माझ्यासाठी प्रयोग उत्तम होणं, हे सर्वात महत्त्वाचं आहे. जरी त्यामध्ये एक महिना गेला, पैसे गेले तर त्याचा मला फरक नाही पडत, माझ्या बँकेला मात्र पडतो. मला चांगला प्रयोग करण्यात रस आहे. मला वाटतं नाही की यामध्ये कराराने काही फरक पडू शकेल. कारण रीमा यांची तब्येत बरी नसल्याने मला रिप्लेसमेंट करावी लागली. आणि करार केला आहे म्हणून त्यांच्याकडून काम करून घेणं हे मला पटत नाही. कारण ही एक जिवंत कला आहे. त्यांच्यावर मी करारानुसार जबरदस्ती केली आणि कलाकारांनी पाटय़ा टाकायला सुरुवात केली तर नाटक चांगलं होणार नाही. तुम्हाला मी करारानुसार बांधून ठेवलं आणि जर तुम्हाला दुसरीकडून चांगली संधी आली तर तुम्ही पाटय़ा टाकायला सुरुवात करणार आणि त्याचा नाटकावर परिणाम होणार. कलाकाराने आपल्या कामाशी बांधीलकी ठेवायला हवी. त्याला कामामध्ये रस वाटायला हवा. निर्मातेही पैशांचा आव आणून नाटक करू शकत नाही आणि त्यापुढचे प्रयोगही लावू शकत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या व्यक्तींनी एकमेकांचा विचार करायला हवा.’’
नाटक करताना जशी एक बाजू कलाकाराची तशी दुसरी बाजू निर्मात्याचीही असते. काही वेळेला समन्वयाने चांगले प्रयोग होतात, तर काही वेळी बेबनाव झाला तर चांगल्या नाटकावरही पडदा पडतो. कलाकाराने एका वेळेला फक्त माझ्याच नाटकात काम करायला हवं, असं वाटत असतं. सध्याच्या घडीला बऱ्याच नाटकांमध्ये अभिनयाबरोबर लेखन आणि दिग्दर्शन करणारे चिन्मय मांडलेकर म्हणतात की, ‘‘मराठी नाटय़सृष्टीबरोबर ८० टक्के मराठी सिनेसृष्टीमध्येही करार होत नाहीत, फक्त शब्दांवर सारं काही चाललं असतं. पण मला व्यक्तिश: विचाराल तर करार व्हायला हवेत. यामध्ये फक्त मानधनाबाबत गोष्टी नसाव्यात तर प्रयोग कधी होणार, किती होणार, महिन्याभरात किती प्रयोग होणार आहेत या गोष्टींचाही उल्लेख असायला हवा. साधारणत: नाटक करताना त्याचे शंभर प्रयोग होतील, असं आपण धरून चालतो. त्यामुळे जर शंभर प्रयोगांचा करार केला आणि ते नाटक चाललं, तर त्यानंतर तो करार पुन्हा करता येऊ शकतो. त्यामध्ये जर काही मानधनाबबात मुद्दे असतील तर ते कलाकार आणि निर्मात्याने एकत्रित येऊन सामंजस्याने सोडवायला हवेत. पण जर तुम्ही शंभर प्रयोगाचा करार केला आणि नाटक २५ प्रयोग चाललं तर बाकीच्या ७५ प्रयोगांचं मानधन निर्मात्याने द्यावं हा मूर्खपणा असेल. कारण नाटक कोणत्याही निर्मात्याला बंद पाडायचं नसतं, ते कोणालाही आवडत नाही. काही समस्यांमुळे नाटक बंद पडत असतं. त्याचबरोबर व्यावसायिक निर्मात्याच्या बाबतीत असं होताना दिसत नाही.’’
तुम्ही एका वेळेला बरीच कामं करत असता, त्यामुळे या करारांचा तुम्हाला फायदा होईल की तोटा, यावर चिन्मय मांडलेकर यांचं म्हणणं होतं, ‘‘मी एकाच वेळी बरीच कामं करत असलो तरी या कराराचा मला तोटा काहीच होणार नाही. कारण जेव्हा तुम्ही करार करता ते दोघांच्याही संमतीने होत असतो. करारात लिहिलेल्या गोष्टी या दोघांनाही मान्य असतील, तरच त्या करारावर स्वाक्षरी केली जाते. जर मला आणि निर्मात्याला करार मान्य असेल तर त्यामध्ये कुणाचंही नुकसान होणार नाही.’’
बहुतांशी वेळा नाटकातील कलाकारांची निवड दिग्दर्शक करत असतो. त्यामुळे कलाकार बऱ्याचदा या दिग्दर्शकांवर विश्वास ठेवतात आणि त्यानंतर निर्मात्यांशी संवाद साधतात. दिग्दर्शक हा नाटकाचा महत्त्वाचा दुवा असतोच, त्याचबरोबर तो नाटकाची धुराही वाहत असतो. दिग्दर्शकाला नाटकाची रॉयल्टी मिळत असली तरी कराराबाबत त्याचेही मत महत्वाचे ठरते.
नाटकाच्या कराराबाबत दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नवीन मुद्दे मांडले. ते म्हणाले की, ‘‘हे पहिल्यांदाच होतंय असं नाही. यापूर्वी, मोहन वाघांनी कराराचा प्रयोग करून पाहिला होता. मराठी नाटय़सृष्टीमध्ये नाटकाचे करार होताना दिसत नाहीत, पण मी जी इंग्रजी नाटकं केली त्याचे मात्र करार असतात. त्यामध्ये तुमचा प्रयोग दिवसा झाला, रात्री झाला, परदेशात झाला तर किती मानधन मिळेल, हे नमूद केललं असतं. प्रयोगाची संख्या ठरवली की सारा गोंधळ होतो. कारण तो शेवटी प्रयोग आहे, तो प्रेक्षकांना किती पटेल, रुचेल आणि नाटक किती चालेल, हे आपण सांगू शकत नाही. नाटकाच्या प्रयोगांची खात्री देता येत नाही. जर खात्री असेल तर त्यापद्धतीने करार करता येऊ शकतो. निर्माता किती तग धरू शकतो आणि कितीवेळ नाटक चालवू शकतो, हे महत्त्वाचं आहे. करार जर केला तर तो सर्वसमावेशक असायला हवा. समजा नट वाईट वागला किंवा त्याने एखाद्या प्रयोगानंतर रात्रीच्या नाटकाचे मानधन वाढवून मागितलं तर काय करणार? करार हा जुजबी करून चालणार नाही, त्यामध्ये सर्व शक्यतांचा आणि कायदेशीर घटनांचा अभ्यास असायला हवा. तत्त्वत: विचाराल तर व्यावसायिकपणा येण्यासाठी कराराची गरज तंत्रज्ञांसाठी आहे. लेखक आणि दिग्दर्शक यांना रॉयल्टी मिळत असते आणि ते प्रत्येक प्रयोगाला उपस्थित असतातच असं नाही. त्यांना काही वेळेला रॉयल्टी मिळतही नाही, कोणतेच संरक्षण याबाबतीत त्यांना नसते, त्यावेळी अशा करारांची गरज भासते. करार सगळ्यांशीच करायला हवा, पण खरी कराराची गरज ही तंत्रज्ञांना आहे. व्यवसाय म्हणून अधिक घट्ट होण्यासाठी करार करणे ही गोष्ट गरजेची आहे. पण आपल्याकडे हा व्यवसाय विश्वासाने आणि सहकार्याने होत असतो, त्यामुळे आपल्याकडे असे करार होणं अवघड आहे. एकदा सर्व गोष्टींना मान्यता दिली तर अधिक व्यावसायिक होऊ, जगात सर्व व्यवसायामध्ये करार होतात, पण आपल्याकडे होणार नाही. मोहन काकांनी तो प्रकार केला होता, पण अपयशी ठरला. पण तंत्रज्ञांसाठी हा करार व्हायलाच हवा.’’
नाटकासाठी विषय आणि कलाकाराप्रमाणेच निर्माताही महत्वाचा. काही जण नाटय़ निर्मितीला जुगारही म्हणतात. कारण नाटक चाललं तर फायदा नाहीतर लाखो रुपयांचे नुकसान. काही वेळेला कलाकार निर्मात्यांना काही गोष्टींसाठी जबाबदार धरतात. करार करणं किंवा न करणं हा निर्णय मुख्यत्वेकरून निर्मात्यांचा असतो. कारण नाटकाचे गणित त्यांना पक्के माहिती असते. त्यामुळे करार करताना काही धोकेही संभवतात आणि याची त्यांना चांगलीच जाण असते. याबाबत निर्मात्या लता नार्वेकर म्हणाल्या की, ‘‘नाटकाचा करार व्हावा हे मला तत्त्वत: मान्य नाही. यापूर्वीही काही करार करण्याचे प्रयत्न झाले, पण ते यशस्वी ठरले नाही. आम्हा निर्मात्यांना सारे काही पाहावे लागते. कलाकारांबरोबरच तंत्रज्ञ, प्रयोगासाठी तारखा मिळवणं यांपासून ते जाहिरात करणं, हे सारं आम्हाला करावंच लागतं. पण एवढा सगळा पैसा टाकल्यावर नाटक पाच प्रयोगांमध्ये बंद पडलं तर बाकीच्या प्रयोगांचे मानधन का देण्यात यावं. जो प्रयोग आपण केलाच नाही त्याचे पैसे देणं आणि घेणंदेखील मला तत्त्वत: मान्य नाही. करार करताना दोन्ही बाजूंचा विचार व्हायला हवा. करार करताना आम्ही अन्य कामांपेक्षा या नाटकालाच प्राधान्य देऊ, असं कलाकार लिहून देऊ शकतील का? दुसरीकडे निर्मात्याने प्रयोगाला गर्दी नव्हती त्यामुळे मानधन कमी घे, असं सांगू नये. यापूर्वी मोहन वाघांनी करार करण्याचा प्रयत्न केला होता, पण लोकांना ते मान्य झालं नाही.’’
नाटकाच्या क्षेत्रात काही वेळेला पैशांपेक्षा शब्दाला अधिक किंमत दिली जाते. कारण विश्वास करारापेक्षा शब्दांवर अधिक असतो. नाटकांचा इतिहास बघता काही कलाकारांचा निर्मात्यांना तर काही निर्मात्यांचा कलाकाराला त्रास झाला आहे. पण त्यासाठी करार व्हायलाच हवा का? हा प्रश्न आहे. तसंच हा करार करताना त्यामध्ये नेमके कुठले मुद्दे यावेत याबाबतही विविधांगी भू्मिका आहेत. हे करार कितपत प्रॅक्टिकल असतील, करारामुळे कुणाची मुस्कटदाबी होत नाही ना, हेदेखील पाहणं गरजेचं आहे. कारण त्याचा परिणाम नाटकावर नक्कीच होऊ शकतो. नाटक व्यावसायिक असेल तर त्यासाठी करार व्हायला हवा, तसंच एकमेकांच्या शब्दांवर विश्वासही असायला हवा. कारण करार केल्यावर ते फक्त एक काम राहील, कंपनीतल्या कामगारांसारखं हे सारं होऊन जाण्याची भीती आहे. स्वतंत्रपणा किंवा जास्त मोकळीक मिळेलच, हे सांगता येणार नाही. कलाकाराने पाटय़ा टाकायला सुरुवात केली तर नाटय़ाचा आनंद रसिक मायबापांना मिळू शकत नाही. करार केला तरी त्याच्यावर बोट ठेवून तंतोतंत वागणं चुकीचं ठरेल. कारण शेवटी नाटक हे एक काम नाही तर ती एक कला आहे. आपल्याला अधिक व्यावसायिक होण्याची गरज असली तरी कराराबरोबर विश्वास, बांधीलकी असायलाच हवी. नाटकातला जिवंतपणा टिकवण्यासाठी समंजसपणा आणि परिपक्वता महत्त्वाची आहे, ती जर असेल तर त्यापुढे कुठलाही करार फिका पडू शकतो.
प्रसाद लाड