एआयबी या वेबसाइटवरच्या कार्यक्रमातल्या अश्लील शेरेबाजीवर सध्या चर्चा सुरू आहे. पण या सभ्य-असभ्यतेच्या कल्पनांचा विचार करताना मागे वळून पाहिलं तर आपल्या संस्कृतीच्या संदर्भात काय दिसतं?
शिवीगाळ, टिंगलटवाळी, अश्लील, असभ्य बोलणे आदींचा समावेश असलेल्या एका मालिकेने भारतीय संस्कृतीवर घाला घातला आहे म्हटल्यावर संस्कृतीची काळजी कोणालाही वाटेल. याचे कारण म्हणजे आपण तसे सगळेच सुसंस्कृत असतो आणि संस्कृती म्हणजे तर काचेचे भांडे. ज्यांच्या नसानसांत भारतीय सनातन परंपरा वाहात असेल ते येथे संस्कृतीला स्त्रीच्या शीलाचीही उपमा देऊ शकतात. तर हे एकूणच खूपच नाजूक प्रकरण झाले.
पण तरीही आपली ही देदीप्यमान संस्कृती गेली पाच-सहा हजार वर्षे टिकली आहे.
त्याआधी हिंदुस्थानात म्हणे सिंधू संस्कृती होती. ती नामशेष झाली. त्याच्यानंतर आर्याची वेदिक संस्कृती अवतरली. तीच आपली संस्कृती, असे थोर थोर लोक सांगतात.
पण मग मधल्या काळात काळ खूपच बदलला. ऋतू बदलले. हवा बदलली. नवनवे धर्म आले. पंथ आले. जगण्याची साधने बदलली. राहणीमान बदलले. त्या सगळ्याचे काय? आपल्या प्राचीन संस्कृतीत तेही आधीपासूनच होते की काय? की संस्कृतीच बदलली?
प्रश्न मोठा विचित्र आहे.
पण विद्वान मंडळी आपल्याला सांगतील, की संस्कृती म्हणजे काही वरचा साटा नव्हे. संस्कृती म्हणजे नरोटी नव्हे. संस्कृती म्हणजे बाहय़रूप नव्हे. तर संस्कृती म्हणजे समाजाची आंतरिक जीवनमूल्ये. त्यांवर समाजाचा रथ चालतो. तेव्हा तुम्ही शेंडी ठेवता की केसांचा कोंबडा पाडता, धोतर नेसता की जीन्स घालता, वेदात वर्णिलेले पुरोडाश खाता की चायनीज भेळ यांवर काही संस्कृती अवलंबून नसते. ती मूल्यांवर अवलंबून असते.
आपली संस्कृती पाच-सहा हजार वर्षांची आहे म्हटल्यावर आपली मूल्येही तितकीच जुनी म्हणायची. खरेच तसे आहे का?
प्रश्न बुचकळ्यात टाकणारा आहे.
आता त्याचे उत्तर तर हो म्हणूनच द्यावे लागणार, कारण आपण संस्कृतीचे अभिमानी आहोत.
परंतु त्यामुळे वेगळाच पेच निर्माण होतो.
शिवीगाळ, टिंगलटवाळी, अश्लील, असभ्य बोलणे आदी गोष्टी आपल्या संस्कृतीवर घाला घालू शकतात हेच आपल्याला अमान्य करावे लागेल, कारण या गोष्टी तर आपल्या संस्कृतीत होत्याच. पाच-सहा हजार वर्षांपासून होत्या. त्या काही आज एकदम कुठून तरी अवकाशातून पडल्या नाहीत. आक्रमकांच्या संगे खैबर खिंडीतून आल्या नाहीत, की पाश्चात्त्यांच्या आधुनिकतेतून अवतरल्या नाहीत. आपला समाज शिव्या घालणाऱ्यांचा, टवाळखोरांचा, अश्लील, असभ्य बोलणाऱ्यांचा तेव्हाही होता.
त्या संस्कृतीवर घाला घालण्यास उठलेल्या मालिकेचे नाव एआयबी असे आहे. म्हणजे ऐब!
तर असा शिवीगाळ, टिंगलटवाळी, अश्लील, असभ्य बोलणे आदी गोष्टींचा ऐब तर आपल्या संस्कृतीत तेव्हाही होता.
उदाहरण वेदांचे घ्या. पहिला वेद ऋग्वेद. तर त्यात यम आणि यमी या भावंडांचा प्रख्यात संवाद आहे. तो संवाद आजच्या एखाद्या चित्रपटात, नाटकात असता तर? कल्पनाही करवत नाही. संस्कृतिरक्षकांनी आगच लावली असती त्या थेटरांना. एक बहीण एका भावाकडे पुत्रप्राप्तीची मागणी करते हे काही फार संस्कृतीला धरून झाले असे नाही; पण ही गोष्ट ऋग्वेदातील आहे, जी आपली सांस्कृतिक धरोहर आहे, आपला सांस्कृतिक वारसा आहे.
ऋग्वेदानंतर यजुर्वेद पाहा. या वेदाच्या कृष्ण आणि शुक्ल अशा दोन संहिता आहेत. दोन्हींमध्ये अश्वमेध यज्ञ कसा करायचा याची सविस्तर माहिती दिलेली आहे. म्हणजे यज्ञाची प्रक्रिया, फलश्रुती, दंतकथा ही माहिती. हा यज्ञ का करीत? तर साम्राज्य, राष्ट्र, संपत्ती व वीर्यशाली प्रजा प्राप्त व्हावी यासाठी. तर वीर्यशाली प्रजा व्हावी या कामनेच्या सिद्धीसाठी एक नाटक केले जात असे. अश्वमेधातील घोडा मृत होऊन पडला, की तेथे राजपत्न्यांना बोलावून आणीत. त्यांच्यातील जी पट्टराणी ती आपल्या आईला किंवा सवतींना उद्देशून जे काही बोलते, नंतर मग यज्ञाचे ऋत्विज जे काही करतात, ते सगळे खचितच संस्कृतिरक्षकांच्या अश्लील, असभ्य, बीभत्स या शब्दांच्या व्याख्येत चपखल बसणारे आहे. या यज्ञात अश्व आणि स्त्री यांच्या संभोगाची क्रिया प्रत्यक्ष होते की नाही हा भाग वेगळा; पण त्या वेळी (कृष्ण यजुर्वेद संहितेनुसार) राजपत्न्या घोडय़ास जे आवाहन करतात की, तू स्त्रीगणांचा पती आहेस, तू प्रियकरांतला प्रियकर आहेस, तू सुखनिधी आहेस, तेव्हा हे माझ्या वसो, मी तुझ्यापाशी येऊन गर्भ धारण करते. तू मजपाशी येऊन गर्भ घाल. आपण दोघे जण चारी पाय पसरून व पांघरूण घेऊन, या स्वर्गासारख्या सुखकर स्थली निजू. तू रेत:संपन्न आहेस, तू माझ्या ठायी रेत घाल. हे सर्व पाहता हे खूप काही सुसंस्कृत आहे असे कोणीही म्हणणार नाही. यानंतरचे नाटक तर खूपच ऐबदार आहे. (इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या स्फोटक ग्रंथातून ते जिज्ञासूंनी वाचावे.)
बरे हे येथेच संपत नाही. वेदकालापासून इ.स. ५०० पर्यंत वेद-वेदान्त विचारांचा प्रभाव होता. पुढे तंत्रविचार आला. तो इ.स. १२०० पर्यंत वेदविचाराला पर्याय म्हणून उभा असलेला दिसतो. यातला इ.स. ५०० ते ७०० हा दोन शतकांचा काल यातुप्रधान तंत्रविचार प्रभावी असण्याचा काळ मानला जातो. या तंत्रमार्गात पंच मकारांना फार महत्त्व. त्यांतले तीन मकार आहेत मद्य, मांस आणि मैथुन. अश्लीलतेची, बीभत्सतेची शिखरे पादाक्रांत करणारी ही अघोरी विचारधारा. हा आपल्या संस्कृतीचाच भाग होता.
आता या अशा गोष्टींचे उन्नयन करण्याची एक खाशी रीत आपण तयार केलेली आहे. ती पद्धत अशी की, प्राचीन ग्रंथांत असे काही कसेसेच वगैरे उल्लेख दिसले रे दिसले, की त्यांना काही तरी वेगळाच गूढ अर्थ चिकटवून द्यायचा. एकदा अध्यात्माच्या जंजाळात ते नेऊन ठेवले की, सगळी अश्लीलता एकदम भुर्रच होऊन जाते. म्हणजे बघा, आज आपल्याला लिंगपूजा करताना काही तरी वाटते का?
तर मुद्दा असा, की या अशा गोष्टींमध्ये जी मूल्ये आहे ती आजही आपण प्रमाण मानतो का?
आता हेच पाहा, पुढच्या महिन्यात आपण सगळे होळी साजरे करणार आहोत. हा सण त्या एआयबी मालिकेहून काही कमी नाही. होलिकोत्सव, अमंगलाचा नाश वगैरे गोष्टी होळीला चिकटवणे हा उन्नयनाचा भाग झाला. वस्तुत: होळी म्हणजे मदनोत्सव. कार्ल एमिल मॅक्समिलन वेबर हे एक विख्यात समाजशास्त्रज्ञ. त्यांच्या मते मदनोत्सव हा आदिम अवस्थेतील सामान्यजनांचे एक सामुदायिक वर्तन. लैंगिक उन्माद हे त्याचे वैशिष्टय़.
आता आपला शिमगोत्सव पाहा. लैंगिक उन्माद तर त्यात असतोच. रंग बरसे भिगे चुनरिया वगैरे त्याचाच एक भाग. तर हल्ली त्याच्याही उन्नयनाचे प्रयत्न सुरू आहेत; पण जे आहे ते प्राचीन संस्कृतीला धरून आहे की नाही? उत्तर पुन्हा विचित्र आहे.
प्राचीन भारतात होळीच्या दिवशी मानवी किंवा पशुबळी दिला जाई. त्याला जाळले जाई. त्याच्या राखेभोवती सर्व स्त्री-पुरुष मदनोत्सव (ऑर्जी – सामुदायिक संभोग) करीत. त्या प्रथेचे अवशिष्ट रूपच आपण होळीत पाहतो. दारू पिणे, अश्लील चाळे करणे, मौजमजा करणे, शिव्या देणे या सर्व गोष्टी होळीशी निगडित आहेत. (मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती –
डॉ. सुधाकर देशमुख, पद्मगंधा प्रकाशन, पृ. ८४, ८५)
होळीच्या निमित्ताने येथे एक गमतीची गोष्ट सांगितलीच पाहिजे. महाराष्ट्रात होळी हा सण दिवाळीपेक्षाही प्राचीन मानला जातो. त्याचे वर्णन ‘गाहासत्तसई’त येते. तेथे स्त्रिया आणि पुरुष एकमेकांच्या अंगावर होळीच्या दिवशी चिखल उडवीत असत असा उल्लेख आहे. मात्र ‘लीळाचरित्र’, ‘गाहासत्तसई’ किंवा ‘गोविंदप्रभुचरित्र’ या तत्कालीन समाजजीवनावर प्रकाश टाकणाऱ्या एकाही ग्रंथात होळीतील ग्राम्यतेचा उल्लेख नाही. (‘लीळाचरित्रातील समाजदर्शन’, सुमन बेलवलकर, पॉप्युलर प्रकाशन, पृ. १२७)
ती आधी होती. मध्ये नव्हती. नंतर पुन्हा आली, असा याचा अर्थ होतो; पण होळीतील सगळी अश्लीलता, ग्राम्यता, शिवीगाळ हा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे हे तर नक्कीच सांगता येते.
हीच ग्राम्यता, शिवराळपणा येथील लोककलांमध्येही होता. तो संस्कृत काव्यात होता, पेशवाईत भरभराटीस आलेल्या लावण्यांमध्ये होता आणि तमाशांत होता. असभ्य बोलणे, अश्लील बोलणे, तशा विनोदांना हसणे हे चालूच होते. सभ्य समाजात ते काही फार चांगले गणले जात नाही; पण या समाजातही सर्रास शिवीगाळ चालते, अश्लील विनोद व्हॉटसअॅपवरून फॉरवर्ड केले जातात. इंटरनेटवर अश्लील संकेतस्थळे पाहिली जातात. ही संकेतस्थळे म्हणजे हलतेबोलते खजुराओच असे कोणी म्हटले, तर त्याला आपण काय उत्तर देणार? मंदिरात जाताना मनातील कामवासना दूर व्हाव्यात म्हणून मंदिरावर तशी चावट चावट शिल्पे कोरून ठेवली जात, असा एक पडदा त्यांवर टाकला जातो. तो टाकणाऱ्यांचे कौतुक करण्याखेरीज आपण काय करू शकतो?
संस्कृती, सभ्यता यांकडे पाहण्याची नजरही जर आपल्याच संस्कृतीतून आली असती, तर असे पडदे टाकण्याची आवश्यकता भासलीच नसती; पण ही नजर आपण घेतली ती पाश्चात्त्यांकडून. व्हिक्टोरिअन सोवळेपणाच्या कल्पनांतून आपण आपल्या ग्रंथांकडे, शिल्पांकडे, वर्तनाकडे पाहायला लागलो. विचका झाला तो तेथे.
‘संस्कृती खतरे में’ अशी वरचेवर हाक देणाऱ्यांना ना संस्कृती माहीत असते ना खतरा हेच खरे.
संस्कृती ही प्रवाही असते, बदलती असते. आजच्या कल्पना काल नव्हत्या. कालच्या आजवर लादण्यात अर्थ नसतो. हे एकदा लक्षात घेतले, की मग अशा घाल्याची भाषा करण्याची गरजच पडणार नाही.
यावर कोणी असा सवाल करू शकेल, की आपले पूर्वज जे करायचे तेच आपण करायचे का? म्हणजे तसाच अश्वमेध वगैरे..?
तसे करण्याची आवश्यकताच नाही.
ती त्या समाजाची नीतिमूल्ये होती. समाज बदलला तशी ती बदलली. हे लक्षात घेतले म्हणजे असे प्रश्नच येणार नाहीत.
राहता राहिला प्रश्न ऐबसारख्या कार्यक्रमांचा.
तर ज्यांना ते पाहायचे त्यांनी ते न लाजता पाहावेत. ज्यांना ते खराब वाटतात त्यांनी पाहू नयेत. एवढेच.
रवि आमले