हिंदुस्तान मोटर्सने अखेर अॅम्बॅसिडर गाडीच्या उत्पादनाला टाटा करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य टॅक्सी ड्रायव्हपर्यंत सर्वाचीच लाडकी असलेली अॅॅम्बी आता विस्मृतीत गेली असली तरी अजूनही अॅॅम्बॅसिडर गाडी आणि तिची नानाविध रूपे हा तर कलाप्रेमींचा आवडता विषय.. त्यांनी दिलेला अॅॅम्बी आठवणींना उजाळा.
हेतल शुक्ला
आर्टिस्ट, मुंबई</strong>
हेतल शुक्ला हे गेल्या सात वर्षांपासून अॅॅम्बॅसिडर या थीमवर देशात व परदेशात त्यांच्या कलाकृती सादर करत आहेत. त्यात अम्बे-से-डर, पोलार बिअर, मेक मी फेमस या कलाकृतींचा समावेश आहे.
‘‘माझी पोलार बिअर ही अॅॅम्बॅसिडरवरील पहिली कलाकृती सादर झाली ती मुंबईतील काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये. मी त्यावेळी नुकतीच करिअरला सुरुवात केली होती. मला खास अॅम्बॅसिडरचाच ब्रँड लोकांसमोर सादर करायचा होता वगैरे असे नव्हते, परंतु एक स्थानिक स्पर्श असलेली कलाकृती मला सादर करायची होती. त्यामुळे स्वाभाविकपणे अॅॅम्बॅसिडरचा पर्याय माझ्यासमोर होता. आपली स्वत:ची अॅॅम्बॅसिडर असावी अशीही एक सुप्त इच्छा लहानपणी होती, त्यामुळेही असेल कदाचित. त्यामुळे मी जेव्हा माझ्या कलाकृती सादरीकरणासाठी अॅॅम्बॅसिडरची निवड केली त्यावेळी तिच्या माध्यमातून धर्म किंवा कलेवर भाष्य करण्याचे मी ठरवले.
सुबोध गुप्ता
आर्टिस्ट, दिल्ली
सामान्य भारतीयांचे एकच स्वप्न असायचे, अॅॅम्बॅसिडर गाडी दारात असणे. श्रीमंतीचे प्रतीकच होती अॅॅम्बॅसिडर.
‘‘एक आयकॉनिक कार होती अॅॅम्बॅसिडर. आणि सरकारी बाबूंची गाडी म्हणून तिचा म्हणून एक असा दरारा होता, जो सामान्यांना आकर्षित करायचा. एखादी गाय रस्त्यावर उभी किंवा बसली असेल तर ती सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते, अॅॅम्बॅसिडरचेही अगदी अस्सेच होते. मी माझ्या दोन कलाकृतींसाठी तिचा वापर केला. एकदा एव्हरीथिंग इज इनसाड, २००४ वेळी आणि दूत २००३ वेळी. मी अनुक्रमे गाडीचा मागील अर्धा भाग कापला व लाइफ साइज एॅल्युमिनिअम कार तयार करून घेतली होती.
महबूब रहमान
आर्टिस्ट, बांगलादेश
२०१३ मधील इंडिया आर्ट फेअरमध्ये महबूब यांनी रिप्लेसमेंट ही कलाकृती सादर केली होती. तीत अॅॅम्बॅसिडर खूप साऱ्या काळ्या बुटांनी घेरल्याचे व त्यातून ती बाहेर येत असल्याचे दर्शवण्यात आले होते.
‘‘१९८८ मध्ये माझ्या विद्यार्थीदशेत मी कोलकात्यात आलो होतो. आम्ही जेव्हा सिआल्दा रेल्वे स्थानकात पोहोचलो त्यावेळी स्थानकाबाहेर अनेक गाडय़ा आम्हाला उभ्या असलेल्या दिसल्या. त्या सर्व एकसारख्या दिसत होत्या. अर्थातच त्या सर्व अॅॅम्बॅसिडर होत्या. कोलकात्यात दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या हॉटेल रूमच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले तर एका विशिष्ट रस्त्यावर एका रांगेत अॅॅम्बॅसिडर गाडय़ा पार्क केलेल्या मला दिसल्या. तेव्हापासून मी या गाडीच्या प्रेमात पडलो आणि आयुष्यात एकदा तरी अॅॅम्बॅसिडर विकत घ्यायची ही मनीषा बाळगू लागलो. मात्र माझ्या दुर्दैवाने बांगलादेशात अॅॅम्बॅसिडर हा ब्रँडच उपलब्ध नव्हता.
पॉल फर्नाडिस
व्यंगचित्रकार, बंगळुरू
पॉल फर्नाडिस, ६० आणि ७०च्या दशकात बंगळुरूच्या रस्त्यावर धावणाऱ्या अॅॅम्बॅसिडर गाडय़ांची पॉल यांनी व्यंगचित्रे काढली होती. प्रचंड प्रसिद्ध झाली होती ही व्यंगचित्रे.
(सादर आहे भारताची राजदूत.. भारताची सर्वात जास्त लोकप्रिय, त्रिखंडात सगळ्यांनाच आकर्षणारी कार म्हणजे अॅॅम्बॅसिडर कार.. जिला विनोदाने अॅॅम्बॅसिडरही म्हटले जाते.. राष्ट्रपतींपासून ते रस्त्यावरील आम आदमीपर्यंत, सरकारपासून ते हारवाल्यापर्यंत सर्वाची लाडकी अॅॅम्बॅसिडर.. नौदलप्रमुख, लष्करप्रमुख, हवाई दलप्रमुख, पोलीसप्रमुख.. मंत्र्याची अॅॅम्बॅसिडर.. लोकांची अॅॅम्बॅसिडर.. निवडणुकीतली अॅॅम्बॅसिडर.. सगळ्यात आधीची अॅॅम्बॅसिडर सी १९५७.. अॅॅम्बॅसिडरिअल कर्तव्ये.. शिकाऊ चालकाची अॅॅम्बॅसिडर.. अॅॅम्बॅसिडर.. अॅॅम्बिअन्स.. अॅॅम्बिलन्स.. उत्सवातली अॅॅम्बॅसिडर.. टुरिस्ट अॅॅम्बॅसिडर.. फॅन्सी अॅॅम्बॅसिडर.. अॅॅम्बुशिडर..)
‘‘माझ्या काकांकडे त्यावेळी अॅॅम्बॅसिडर होती. मला आणि माझ्या भावाला त्यामुळे त्यांचा फार हेवा वाटायचा. मात्र माझ्या वडिलांकडे जुनी अमेरिकन मॉडेलची कार असल्याने ते अॅॅम्बॅसिडरकडे ढुंकूनही पाहायचे नाहीत. एसयूव्हीचा जमाना त्यावेळी क्षितिजावरही नव्हता, तेव्हापासून अॅॅम्बॅसिडरला मल्टियुटिलिटी व्हॅनचा (एमयूव्ही) दर्जा आपसूकच मिळाला होता. कोणीही, कितीही माणसे या गाडीत बसू शकत असत. अनेकांनी तर यात कायमस्वरूपी डेरा टाकल्याचेही मी पाहिले आहे. मी कालांतराने अॅॅम्बॅसिडर विकत घेतली. परंतु ती माझ्या त्यावेळच्या मारुती कारपेक्षाही चालवायला खूपच जड वाटली. परंतु बालपणीचे एक स्वप्न पूर्ण झाल्याचे आंतरिक समाधान होते, इतकेच.’’
सुनील सेठी
फॅशन डिझाइन कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, दिल्ली
सेठी यांचे अॅॅम्बॅसिडरप्रेम जगजाहीर आहे. अनेक वर्षे अॅॅम्बॅसिडर घेणे व विकणे या व्यवसायानंतर ते अविगो या रेट्रो कारमॉडेलच्या विक्री व्यवसायात स्थिरावले.
‘वरील छायाचित्रातील गाडीचा क्रमांक आहे डीआयओ३. तीन वर्षांपूर्वी मी दिल्लीतील ताज मानसिंग हॉटेलमध्ये एक पार्टी आयोजित केली होती, त्या पार्टीला मी डीआयओ३ हे नाव दिले होते. माझी अॅॅम्बॅसिडर मी हॉटेल परिसरातच ठेवली होती व प्रख्यात व्यंगचित्रकार मनीष तिवारी यांना मी पार्टीला आमंत्रित केले होते. पार्टीत चाललेल्या गमतीजमती माझ्या अॅॅम्बॅसिडरवर चितारण्यास मी मनीष यांना सांगितले होते. माझी मुलगी तनीरा ही त्यांना मदत करत होती. पार्टीला डिझायनर्स तसेच कलाकार असे मिळून ३०० लोक आले होते. आणि हे सर्व सुनील सेठी अलायन्स या माझ्या प्रोजेक्टसाठी आयोजित करण्यात आले होते. माझ्या मुलीला चित्रकला शिकवणारे खेमचंद यांनाही मी अॅम्बॅसिडरवरील ११ कलाकृती भेट दिल्या. माझे आजोबा अॅॅम्बॅसिडर चालवायचे. मी कॉलेजात गेलो ते अॅॅम्बॅसिडरमध्ये बसूनच. खरे तर त्यावेळी ते अॅॅम्बॅसिडरची सुधारित आवृत्ती आणतील अशी माझी अपेक्षा होती.
(एक्स्प्रेस न्यूजलाइनमधून)
अनुवाद : विनय उपासनी