आपल्या देशात काही महत्त्वाच्या नेत्यांवर अमेरिकेने पाळत ठेवल्याचे समोर आल्यावर सरकारने अमेरिकी राजदूताला समज दिली आहे. अमेरिकेचे हे असले प्रकार कधीच खपवून घेता कामा नयेत.

भारत आणि भाजपवर पाळत ठेवण्यासाठी अमेरिकेने आपल्या गुप्तहेर यंत्रणा कामास लावल्या आहेत. त्यांनी हे काम २०१० पासून सुरू केले असल्याचे समोर आले आहे. हाच प्रकार आपण अमेरिकेत करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले असते तर त्यांचा तिळपापड झाला असता. आपल्यावर विविध मार्गे दबाव टाकण्याच्या हालचाली त्यांनी तत्परतेने सुरू केल्या असत्या.
आपल्या सर्वागीण सामर्थ्यांवर प्रचंड गर्व असलेल्या या देशाशी भारताने आवश्यक तेवढेच संबंध ठेवावेत. भारतातील सर्वच क्षेत्रातील हालचालींवर लक्ष ठेवून देशाची सर्व गुपिते आपल्या हाती ठेवून देशाच्या नाडय़ा आपल्याकडे ठेवण्यासाठी अमेरिका जी मेहनत करत आहे त्यासाठीच्या त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरवणे हितावह आहे.
इस्रायलसारखा छोटा देश बलाढय़ अमेरिकेस अजिबात घाबरत नाही. कारण आहे प्रखर राष्ट्रनिष्ठा. म्हणून अमेरिकाही त्यांना दडपण्याचा कधी प्रयत्न करत असल्याचे साधे ऐकिवातही नाही. शत्रूशी कसे रोखठोक वागावे हे त्या छोटय़ा राष्ट्राकडून शिकण्यासारखे आहे.
‘कोणीही यावे आणि टपली मारून जावे’ अशी अवस्था निर्माण होण्यास पोषक वातावरण आपणहून अशा देशांना तयार करून न देणे याकडे लक्ष असलेच पाहिजे. आपल्यापेक्षा कोणी पुढे जाऊ नये आणि कोणी जात असेल तर त्याचे पाय खेचण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात अमेरिका तशी चपळ आहे. संपूर्ण जगावर एक हाती सत्ता ठेवून जगाला आपल्या मुठीत ठेवून त्यांना गुलामाप्रमाणे वागवण्यासाठी हा देश कोणत्याही थरास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम तसेच देशातील अन्य काही व्यक्तींची अमेरिकेने त्यांच्या विमानतळावर चौकशी केली आहे. सर्वच देशांकडे कोणाची तपासणी करायची नाही त्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या नावाची सूची असते. पण त्यास केराची टोपली दाखवत आम्ही भारतीयांना किती पाण्यात पाहतो हे त्यांनी वेळोवेळी दाखवले आहे.
एका बाजूने चीन आपले व्यावसायिक, लष्करी डावपेच टाकत आहे, पाकपुरस्कृत दहशतवाद तर भारतीयांच्या पाचवीलाच पुजलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने अमेरिका देशात कोणी साधे शिंकले तरी आपल्याला कळण्यासाठी आटापिटा करत आहे. महासत्तेचा मुकुट आपल्याच डोक्यावर राहावा यासाठी हा देश शक्य तेवढे जोरकस प्रयत्न करत आहे.
भारतात होणारा जातीय-धार्मिक हिंसाचार आणि त्यास खतपाणी घालणारे जात्यंध नेते या देशाच्या रडारवर असतीलच. कोण किती ताकदवान आहे. शिवाय आपल्याला नेमका कोणत्या धर्मापासून धोका आहे याची सविस्तर माहिती अमेरिकेकडे असेलच. भारतानेही यातून शिकावे की चौफेर नजर कशी ठेवावी. अमेरिकेचे माहिती मिळवण्याचे कौशल्य सुबक असल्याने त्यांच्याशी थेट लढण्याचा कोणताही देश विचारही करणार नाही. कारण त्या देशास जितकी आपल्या देशाबद्दल माहिती नसेल त्याहून कैकपटीने सखोल माहिती अमेरिकाच त्या देशास सांगू शकेल, एवढी त्यांची तयारी आहे.
अमेरिकेने विज्ञानाच्या आधारे वारेमाप प्रगती केली. पण ते तेवढय़ावरच न थांबता त्या आधारे जे काही मिळवत आहेत त्याचा ते पुरेपूर वापर करत आहेत. जगावर आपले नियंत्रण राहावे यासाठी प्रसंगी शत्रू देशावर आक्रमण करून तेथे आपली ताकद प्रस्थापित केली आहे. त्यामुळे या देशाचा वेगळा दबदबा जगात तयार झाला आहे. भारत मात्र फक्त विविध क्षेपणास्त्रांच्या चाचण्याच करतो. आपल्या गुप्तहेर यंत्रणा जी काही माहिती पोलिसांना देतात त्यास गांभीर्याने घेतले जात नाही. कारण जेव्हा दहशतवादी कसाब व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईत रक्तपात घडवला होता त्याचीही माहिती देण्यात आली असल्याचे गुप्तहेर यंत्रणांनीच सांगितले. म्हणजे आपले एक नागरी सुरक्षाविषयक खाते अशा सूचना किती सहजपणे घेते व त्याचे दुष्परिणाम किती महागात पडतात हे त्यांना कधी कळणार ?
शत्रूवर अंमल ठेवायचा असेल तर अमेरिकेप्रमाणे धूर्त रणनीती अवलंबणे निकडीचे आहे. तरच शत्रूविषयक यशस्वी डावपेच आखता येतात. असे झाल्यावर आपण अर्धी लढाई आधीच जिंकतो. गुप्तहेर खाते हे देशाचा कणाच असते. आपले शत्रू-मित्र आपल्याबाबत काय विचार करत आहेत. ते चुटकीसरशी कळते. त्यामुळे आपले खरे मित्र कोण आणि पक्के शत्रू कोण हे लक्षात येते.
गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेची एनएसए ही गुप्तचर संस्था भारतावर पाळत ठेवून असल्याचे उघड झाल्यानंतर सरकारने या हेरगिरीची गंभीर दखल घेत अमेरिकी राजदूतांना समन्स बजावून बोलावून घेतले आणि चांगलेच खडसावताना, भविष्यात असले प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ताकीद दिली. इतरांच्या ताटात काय वाढले आहे हे चोरून पाहणाऱ्या या देशास केंद्राने लगेचच खडसावले ते चांगलेच केले. अन्यथा ते अधिक शेफारले असते.
भारतास काहीही टिवल्याबावल्या करून दाखवल्या तरी चालतात असा समज त्यांच्या मनी रूढ झाला असता. परराष्ट्र धोरण हे नेहमी असेच रोखठोक हवे. तर आणि तरच अन्य देशांच्या मनी आदरयुक्त भीती राहील.

Story img Loader