आपले ईप्सित साध्य करण्यासाठी, सकृद्दर्शनी सरकारवर धाक निर्माण करण्यासाठी राबविली जाणारी आंदोलने हळूहळू लोकांनाच धाकात ठेवण्यासाठी वापरले जाणारे शस्त्रं बनू लागली आहेत.

सर्वप्रथम आपल्याला ‘आंदोलन’ या शब्दाची व्याख्या नव्याने करावी लागेल. किंबहुना, त्याच्या मूळ अर्थाशी सुसंगत राहावे लागेल. कारण आंदोलन या प्रकाराचे आजवर आपण हिडीस आणि भयावह स्वरूप पाहत आलो आहोत. मूठभर कावेबाज धनदांडग्यांच्या स्वार्थासाठी बेकार तरुणांच्या टोळ्या बनवून त्यांच्याद्वारे जनतेला वेठीस धरणे म्हणजे ‘आंदोलन’ असा समज सार्वत्रिकरीत्या दृढ झाला आहे.
या पाश्र्वभूमीवर अलीकडेच लातूर शहरात घडलेली अगदी चकित करणारी बातमी वृत्तपत्रात वाचली. तथाकथित आंदोलकांनी रोखून धरलेल्या बसमधील प्रवाशांनी आंदोलकांचा विरोध करून त्यांच्यावरच प्रतिहल्ला केल्याच्या संदर्भातली ही बातमी, जनमत आता असल्या बेगडी आणि समाजहित नसलेल्या आंदोलनाला भीक घालेनासे झाले आहे हेच दर्शवीत होती. पूर्वी समाजाला ही दांभिकता कळत नव्हती किंवा रुचत नव्हती असे नाही, पण सामान्य माणूस बहुतांश सरळमार्गी असतो. याचा अर्थ तो भेकड असतो असा नव्हे, तर कुटुंबाचा पर्यायाने देशाचा सदस्य या नात्यामुळे स्वत:वर असलेल्या जिम्मेदाऱ्यांचे भान त्याला असल्यामुळे मनात चीड असूनदेखील असल्या प्रकारांकडे तो दुर्लक्ष करायचा व आपली सहनशीलता वाढवायचा प्रयत्न करायचा. आपले ईप्सित साध्य करण्यासाठी, सकृद्दर्शनी सरकारवर धाक निर्माण करण्यासाठी राबविली जाणारी आंदोलने हळूहळू लोकांनाच धाकात ठेवण्यासाठी वापरले जाणारे शस्त्रं बनू लागली आहेत. पण ह्या सरळमाग्र्याची सहनशीलतेची मर्यादा संपू लागली आहे. एकजुटीने लोक झुंडशाहीचा प्रतिकार करू लागले आहेत.
पण प्रतिकार करणारे हेच हात, उद्याची निव्वळ प्रतिक्रियेतून उत्पन्न होणारी नव्या आक्रमकतेची म्हणजेच वेगळया अर्थाने पुन्हा झुंडशाहीची शस्त्रे बनू नयेत, म्हणून या उमटू पाहणाऱ्या जनआंदोलनाला योग्य वळण लावणे प्राप्त आहे. यास्तव विकासासाठी जनआंदोलन या संज्ञेचा व्यापक अर्थाने विचार करून ती प्रत्यक्षात अमलात आणून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत ती व्यक्तिश: रुजविली गेली पाहिजे. यासाठी स्वत:पासून सुरुवात करून अगदी व्रत अंगीकारल्यासारखे कठोर पालन करून, तिचा प्रसार करून जास्तीतजास्त लोकांच्या अंगी हे व्रत बाणवले जावे यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
वास्तविक ही संकल्पना फार गहन वगैरे प्रकारची नसून कळण्यास अत्यंत सोपी, पण वळण्यास कठीण अशा स्वरूपाची आहे. कारण विकासाचे भौतिक आणि नसíगक टप्पे आपण लीलया पार पाडतो. किंबहुना ते सुखेनव पार पडावे यासाठीच आपला सर्व कार्यकारणभाव खर्ची पडतो. पण तितक्याच महत्त्वाच्या मानसिक आणि सामाजिक ह्या टप्प्यांकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो. त्यातल्या मानसिक टप्प्याला न्यूनगंड पाळणे व त्यायोगे निर्माण होणाऱ्या मनमानीला आक्रमकतेचे (आक्रस्ताळपणाचे) खतपाणी किंवा बेफिकिरी वृत्तीस चालना देणे किंवा कायम दडपणाखाली राहायची सवय करून घेणे अशा भलत्याच मार्गाने आपण वाटचाल करायला लावतो. तर सामाजिक विकास हा टप्पा तर आपल्या खिसगणतीतही नाही. शालेय जीवनात समूहाने गायले जाणारे राष्ट्रगीत, यानंतर हा मार्गच आपण बंद करून टाकला आहे.
मी माझ्या वाहनास कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न लावले आहेत. या गोष्टीचे कौतुक मी व हॉर्नविक्रेता सोडून कोणालाही नाही. असल्या हॉर्नचा लोकांना खूप त्रास होतो. अंशत: बहिरेपणाही येऊ शकतो याची जाणीव असूनदेखील याचाही आनंद घेण्यास मी असुर (राक्षस) नाही. म्हणून विकासाची शपथ घेऊन सांगतो की, असले हॉर्न त्वरित काढून नियमात बसणारे सर्वसाधारण क्षमतेचे हॉर्न लावेन.
अभिजित भूमकर, लातूर.

Story img Loader