अंटार्क्टिका म्हणजे सदैव बर्फाच्छादित असलेले पृथ्वीचे दक्षिणेकडील टोक. या खंडाला दुसऱ्यांदा भेट देताना लेखिकेला आलेले अनुभव
हिमखंड, अंटार्क्टिकाहा शब्द ऐकल्यावरच आपल्याला हुडहुडी भरायला लागते. अंटार्क्टिका, अंटार्क्टिकाहे आपण शालेय जीवनात ऐकलेले शब्द. या जागाही तशा सहजासहजी पोहोचण्यासारख्या नसल्याने त्याबाबत बरेच कुतूहल असते. बरेच पर्यटक जमल्यास आयुष्यात एकदा तरी अंटार्क्टिकाची सफर करावी असे म्हणतात. त्याची प्रचिती तिथे गेल्याशिवाय येत नाही. काही ठिकाणे अशी असतात की तेथे परत परत जावेसे वाटते. आमचे तसेच काहीसे झाले. २००५ साली अंटाक्र्टिकाची पहिली सफर, अर्थात तिथल्या उन्हाळ्यात केल्यावर, अगदी हल्लीच परत एकदा हिमखंडाला भेट देण्यासाठी निघालो..
अंटाक्र्टिका म्हणजे भौगोलिकदृष्टय़ा दक्षिण ध्रुव. सदैव बर्फाच्छादित असा पृथ्वीवरील पार दक्षिणेकडील खंड. इथल्या बर्फाची उंचीच आहे दीड ते दोन मीटर इतकी. हा खंड म्हणजे युरोप-अमेरिका एकत्र करूनही आकारमानाने त्यापेक्षा मोठा. उन्हाळ्यात स्कँडिनेव्हीआ, कॅलिफोर्नियापेक्षा प्रकाशित, सहाराच्या रेताड वाळवंटाप्रमाणे बर्फाचे वाळवंट, उन्हाळ्यात – ५ अंश सेल्सिअस तर हिवाळ्यात पारा – ९० अंश सेल्सिअस इतके उतरणारे, बरोबरीनेच दिवस-रात्र काळोखाचे साम्राज्य असण्याचे एकमेव ठिकाण. या ठिकाणी मानवी वस्ती मुळीच नाही. पूर्वी म्हणजे १७- १८ व्या शतकात बऱ्याचशा युरोपिअन देशांमधून कॅप्टन कुक, जेम्स रॉस, वेडल् असे बरेच दर्यावर्दी अतिदक्षिणेकडे भूमीच्या शोधात या अंटाकर्ि्टक वर्तुळात येऊन गेले. काही समुद्र, वॉटर चॅनेल्स वगैरेंना त्यांची रॉस सी, लेमर चॅनेल, वेडल सी अशी नावे दिली आहेत.
कोणत्याही देशाचा येथे राजकीय हक्क नाही. १९५२ च्या करारानुसार सुरुवातीला १२ देशांनी स्वाक्षरी केल्यावर आता ती संख्या ५० वर पोहोचली आहे. या सर्व देशांची फक्त संशोधन केंद्रे इथे आहेत. आपलेही हिमाद्री स्टेशन आहे. पण आपण संशोधन केंद्रांना भेट देऊ शकत नाही. या सागरी भागात कोणत्याही प्रकारच्या निरुपयोगी वस्तू, लष्करी कारवाई, अणुस्फोट अशा कार्यक्रमांना सक्त मनाई आहे.
दक्षिण ध्रुवावर जवळपास भूभाग नसल्याने साऊथ अमेरिकेत केप हॉर्न, चिले येथून मॅजेलान स्ट्रेट व बिगल चॅनेल येथून येणाऱ्या पाण्याला अडथळा नाही. तसेच अटलांटिक व प्रशांत महासागर जिथे मिळतात तिथे पाण्याचा ओघ प्रचंड असतो. हे सर्व पाणी तिथल्या तिथेच गोलाकार फिरत राहते. दोन्ही महासागरांतील पाण्याचे प्रवाह, तापमान, अंडर करंट्स हे सर्व भिन्न प्रकारचे असल्याने या पट्टय़ात सागराचे सदैव थैमान चालूच असते. लहान बोटींचा निभाव लागतच नाही, पण मोठमोठय़ा क्रूझ शिप्सचीही दोलायमान स्थिती असते. अगदी चौथ्या मजल्यापर्यंत, ४० फुटांपर्यंत लाटा उसळत असतात. १६व्या शतकात इंग्लंडचा खलाशी सर फ्रान्सिस ड्रेक याने हा पट्टा यशस्वीरीत्या पार केल्याने त्याला ड्रेक पॅसेज असे नाव दिले आहे.
एखाद्या अम्युझमेंट पार्कमधील रोलर कोस्टरवर बसल्यासारखी दोन दिवस स्थिती असते. येथे प्रवेश करण्यापूर्वी कॅप्टन, गाईड वगैरे मंडळींकडून दरवाजाच्या चौकटीवर हात ठेवू नका, किंवा दरवाजात उभे राहून गप्पा मारणे टाळा, चालताना आधारासाठी रेिलग धरूनच चाला, डायनिंग हॉलमध्ये हातात जेवणाची प्लेट धरून तोल सांभाळण्याची कसरत करू नका, अशा सूचनांचा मारा सदैव चालू असतो. खिडक्यांची शटर्स बंद ठेवावी लागतात, बाहेरील वातावरण डेकवर जाण्यास सक्त मनाई करते.
साऊथ जॉर्जिया येथील ग्रेट व्हिकन व गोल्ड हार्बरच्या भेटीनंतर आमचा अंटार्क्टिक पेनिन्सुलाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. जमिनीपासून दूरवर ह्य प्रशांत महासागरात मध्येच खंद्या वीराप्रमाणे उभ्या असलेल्या श्ॉगरॉकस्वरील स्कूवा पक्ष्यांची कॉलनी पाहायला जायचे होते, पण त्या खवळलेल्या समुद्रात दूरवर उभे राहून आम्हाला श्ॉगरॉक्सचे दर्शन घ्यावे लागले. दूरवर असलो तरीही तिथे होत असलेल्या लाटांचा मारा पाहून कॅप्टनचा निर्णय योग्यच वाटला. ह्य प्रवासात आमचे मित्र व वाटाडे होते तिथले केप पेट्रल्स, जायंट पेट्रल्स, अंटाकर्ि्टक प्रायन्स असे पक्षी. शिप्स जात असताना त्यावर शिजणाऱ्या अन्नपदार्थाच्या वासाने त्यांचे शिपभोवती घुटमळणे जास्त असते. असाच कुठल्या तरी शिपवर लिफ्ट घेऊन आलेला एक छोटासा पक्षी थरथरत नांगराच्या वेटोळ्यात बसला होता. कुतूहलाने पाहत असताना तो बावरलेला जीव लपून बसला. नंतर मात्र दिसला नाही. आम्ही तरी शिपवर होतो, पण भरसमुद्रात कुठेही जमीन नाही, झाडं नाहीत. अशा परिस्थितीत हे पक्षी हजारो मैलांचा प्रवास न थांबता करतात असे म्हटले जाते. आश्चर्यच नाही का?
मजल दरमजल करत आम्ही नेको हार्बर ह्य पेनिन्सुलातील पहिल्या भेटीच्या जागी पोहोचलो. ईप्सित स्थळी येऊन पोहोचल्यामुळे आकाशाला गवसणी घातल्यागत झाले होते. समोर लहानशा बर्फाच्छादित टेकाडावर अर्जेटिना देशाचे स्टेशन होते. तिथल्या नियमानुसार कोणत्याही बेटावर फक्त शंभर प्रवासीच एकावेळी तासभर भेट देऊ शकतात आणि दिवसभरात फक्त दोनच भेटी होऊ शकतात. जाताना आपल्याला आपले वेिलग्टन शूज, कॅमेरा स्टँडची टोके, वॉकिंग स्टिकची टोके हे काही औषधी पाण्यात बूडवून र्निजतुक करूनच जावे लागते. तसेच परत येतानाही हाच कार्यक्रम असतो. कारण तिथले नैसर्गिक वातावरण आपल्यामुळे दूषित होता कामा नये. तसेच पेंग्वीन्सना अजिबात स्पर्श करायचा नाही, खाण्याच्या वस्तू सोडाच, पण पाणीसुद्धा नेता येत नाही. आठवण म्हणून तिथून अगदी क्षुल्लक गोष्टही आणायची नाही की आपली काही वस्तू सोडायची नाही. हे नियम फार काटेकोरपणे पाळले जातात.
या परिसरात किनारा नसल्याने आपले जाणे-येणे झोडियाकमधूनच होत असते. झोडियाक ही हवा भरलेली लहान रबरी नाव असते. एकावेळी त्यात दहा माणसं बसू शकतात. क्रेनच्या साहाय्याने शिपवरून तिला खाली पाण्यात उतरवताना व चढवतानाचा देखावा मजेशीर असतो. जर समुद्र खवळलेला असेल तर झोडियाक बसताना व परत बोटीत चढण्याचे काम मात्र जिकिरीचे असते. तारेवरची कसरत म्हणायला हरकत नाही. रात्रीच्या शांत झोपेनंतर सकाळी उठल्यावर खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याने ताडकन् उठलो. समोर होते बर्फाच्छादित एलिफंट आयलंड. इथे आमची भेट झाली ती चीन स्ट्रॅप पेंग्वीन्सबरोबर. चोचीपासून कानशिलापर्यंत असलेल्या काळ्या रेषेने ते फारच गोंडस दिसतात. संख्येने सॅलीसबरी प्लेन येथील एंपरर पेंग्वीन्सएवढे जरी नसले तरी भरपूर होते. त्यांची लगबग सुरू होतीच. त्यांच्या जाण्याच्या रस्त्यात आपण आलो तर ते थांबतात. आपल्याला न्याहाळतात. ते इतके गोड दिसतात की अगदी त्यांना उचलून घ्यावेसे वाटते. काही ध्यानस्थ तर काही पाण्यात डुबकी मारायला जाणारे. त्यांची शिस्त अगदी वाखाणण्यासारखी असते.
१९१६ साली श्ॉकल्टन बोट निकामी झाल्यामुळे आपल्या २२ सहकाऱ्यांना घेऊन केप व्हॅलेंटाइन ह्य आयलंडवर आले होते. पण तिथे पाण्याचा त्रास होण्याचा संभव असल्याने गोठलेल्या समुद्रावरून स्लेज करून, बोटीच्या फळकुटांवर आलटून पालटून बसत १५, २० मैलांची रपेट करून आले होते. याबरोबरच रॉस आइस शेल्फ पार करून आलेले प्रथम एक्सप्लोरर होते. हलक्याशा उंचवटय़ावर जिथे समुद्राचे पाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी तंबू बांधून राहिले होते. ही जागा होती एलिफंट आयलंडची मागील बाजू. तिथल्या हिवाळ्यात अगदीच नगण्य सामग्रीसह त्यांनी सहा महिने कसे काढले, देवच जाणो. कुणी कुपोषणाने आजारी आणि कशाने त्रस्त. बरोबर आणलेली खाद्यसामग्री संपल्यावर हळूहळू बरोबर आणलेले कुत्रे, वावरणारे पेंग्वीन्स यांच्यावर त्यांनी एकेक दिवस निभावला. आम्ही क्षणभर स्तब्धता पाळून त्यांच्या धाडसाला वंदन केले. ग्रुप लीडर पारदो हा खडकावर बसून ज्या ठिकाणी कॅप्टनची वाट बघत असे, त्या ठिकाणी अर्धपुतळा आहे. सॅलीसबरी प्लेन येथे श्ॉकल्टन ट्रेल, उथले त्यांचे वास्तव्याचे ठिकाण पाहायला मिळाल्याने आम्ही नशीबवान ठरलो असे म्हणायला पाहिजे.
एलिफंट आयलंडप्रमाणे आम्ही डिसेप्शन आयलंड या ठिकाणी ५०० ते १००० फूट उंचीच्या टेकडीवर भटकलो. येथे बर्फ ताजा असेल तर भुसभुशीत असतो, पण जुना असेल तर घट्ट असतो. त्यामुळे चालताना कधी पाय फुटभर आत जातो तर कधी घसरगुंडी. त्यामुळे सावधतेने चालावे लागते. उतरताना मात्र आपण घसरगुंडी करून सटकन खाली येऊ शकतो. अशी गंमत अनुभवत वर पोहोचल्यावर दिसणारा नजारा म्हणजे आपले श्रमपरिहारच. तो निळा अथांग सागर, मध्येच दिसणारे बर्फाचे डोंगर. उंच कपाऱ्यांत असणारी स्कूवा, पेट्रट्स पक्ष्यांची घरटी, पिलांच्या रक्षणार्थ सावध असलेले पक्षी. काय मस्त वाटतं.
या परिसरात कधी आणि कोठे मोठमोठे हिमखंड दिसतील ते सांगता येत नाही. बर्फाचे लहान तुकडे, बर्फाच्या लाद्यांचे दर्शन होत असते. तिथून पुढे आल्यावर आमचा डोळ्यांवर विश्वास बसेना. बोटीपासून २०० मीटर अंतरावर वरून सपाट पण नळकांडय़ासारखा ७०-८० मीटर लांब, दहा मजली उंच असा महाकाय हिमखंड चमचमत होता. इतक्या दुरून पाहतानादेखील मनात टायटॅनिकचा विचार येत होता. खरे तर या भागात येऊन आपण सर्वच ठिकाणी भेट देऊ अशी खात्री नसते. सगळ्याच पर्यटकांनीदेखील हे जरूर लक्षात ठेवले पाहिजे. अंटाकर्ि्टका हे वर्षभरातले सर्वच ऋतू अगदी दहा मिनिटांत अनुभवण्याचे एकमेव ठिकाण. ..क्षणात येई सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे अशी स्थिती. आणि पुढच्याच क्षणी खिडकी आणि डेकवरून ओघळणाऱ्या पाण्याचा बर्फ. गंमतच. असो.
ग्रेव्ह यार्ड ह्य ठिकाणी प्रचंड महाकाय हिमनग, लहानमोठय़ा आइस शेल्स, यांनी आपल्याला वेढलेले असते. ग्रेव्ह यार्डमधून फिरताना अर्थात झोडियाकमधूनच मात्र फारच सावधगिरीने जावे लागते. हाताच्या अंतरावर लहान लहान बर्फाच्या लाद्यांवर लेपर्ड, क्रॅब इटर, एलिफंट सील लवंडलेले असतात. आपण अगदी नशीबवान असलो तर किलर व्हेल्सचा लहानसा ग्रुप सीलची शिकार कशी करतो ते पाहावयास मिळते. हिमनगांमधून झिरपणाऱ्या हिरव्या, निळ्या रंगांच्या छटांनी ते फारच लक्षवेधक ठरतात. हिमनगाचा काही भाग जेव्हा तिथून खाली पाण्यात पडतो, त्यावेळी स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज होतो. त्याच्या आकारमानाप्रमाणे पाण्यात लाट उसळते.
लेमर चॅनल ह्य ठिकाणी समुद्राची चिंचोळी वाट बूथ आयलंड व अंटाकर्ि्टका मुख्य भागाला वेगळी करते. समुद्र अगदी शांत असल्याने तेथील हिमाच्छादित कडय़ांचे पाण्यातले प्रतिबिंब फारच छान दिसते. ते पाहताना एखादे चित्रच समोर असल्यासारखे वाटते. ह्यमुळे ह्य भागाला कोडॅक अॅली ऑफ अंटाकर्ि्टका असे संबोधले जाते. कुदरत का कारनामा बढिया होता है असे म्हणतात ते खोटे नाही. पुढे पॅरेडाईज बे येथे कॅप्टनच्या गरूड नजरेने ब्लू व्हेलची शेपटी टिपली आणि आम्हाला सर्वाना डेकवर यायला सांगितले. लवकरच मादी व पिलू बोटीच्या नजीक आलेच आणि त्यांना कॅमेऱ्यात पकडण्यासाठी आमची सर्वाची धांदलच उडाली. आकाराने जम्बो विमानासारखे असलेले ब्लू व्हेल्स पूर्ण कधी दिसत नाहीत, त्यांचा फक्त पाठीचा कणा व शेपटीच दिसते. एकदा का जबडा उघडला की त्यात २०० ते ३०० टन मासळी मावते असे म्हणतात. ते आले आले म्हणेपर्यंत शेपटी पाण्यात गेलीसुद्धा. आमच्याशी जसा काही लपंडावच सुरू होता. हमे कैसे भूले म्हणून की काय मिंकी व्हेल्स आणि डॉल्फिन्सही हजेरी लावून गेले.
अंटाकर्ि्टका बेटावरही ज्वालामुखी आहे. नुसता वरच नाही तर पाण्याखालीही आहे. हाफ मून बे येथे डिसेप्शन आयलंड ह्य भागात सुप्त ज्वालामुखी असल्याने किनाऱ्यावर अगदी हलकेसे ऊबदार पाणी आहे. थंडगार समुद्रात किनारी असे उबदार पाणी हा विरोधाभासच नाही का? हौशी व धाडसी पर्यटकांना पाहिजे असल्यास पाण्यात डुबकी मारता येते. याची आधीच कल्पना दिलेली असल्यामुळे खरोखरच उडय़ा झाल्या. अर्थात त्या काही मिनिटांसाठीच. त्याबद्दल कॅप्टनकडून नंतर सर्टिफिकेट मिळतं ते हॉट वाइनच्या ग्लासचं. हाफमून बेनंतर मात्र परतीच्या प्रवासाला लागलो. परत एकदा ड्रेकमधून प्रवास करत चार दिवसांनी ऊशवाया येथे पोहोचलो. इतक्या दिवसांच्या सवयीप्रमाणे धक्क्यावर चालताना थोडा वेळ डुलतच चालत होतो. पण लगेच गाडी रुळावर आली. प्रवासाला जाताना सुखरूप नेण्यासाठी व हातीपायी धड आणल्याबद्दल देवाचे आभार मानले. बोटीवरील कर्मचारी वर्ग हसतमुखाने निरोप द्यायला डेकवर होता, त्यांना बाय करून आम्ही सर्वजण आपापल्या वाटेला लागलो.