कोणत्याही आजारावर अँटिबायोटिक्स घ्यावी लागणार असं दिसलं की रुग्णाच्या चेहऱ्यावर तणाव दिसायला लागतो. पण अँटिबायोटिक्सना एक दुसरी आणि चांगली बाजूसुद्धा आहे आणि ती आपल्याला माहीत असायलाच हवी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘‘डॉक्टर, पिंकेशला ताप येतोय चार दिवसांपासून! त्याचा घसा दुखायला लागला तेव्हाच मी नेहमीसारखं ऑगमेन्टिन दिलं त्याला. नेहमी दोन गोळ्यांत बरं वाटतं. ह्यवेळी वाटलं नाही म्हणून समोरच्या डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी अँटिबायॉटिकचं इंजेक्शनसुद्धा दिलं. तरी ताप चढतोच आहे. तुम्ही तर अँटिबायॉटिक्स देत नाही. पण आज रविवारी दुसरे कोणी डॉक्टर्स नसतात. म्हणून नाइलाजाने तुमच्याकडे आणावं लागलं.’’

‘‘नेहमी ऑगमेन्टिन देता?’’

‘‘हो. समोरचे डॉक्टर तेच देतात नेहमी. आम्ही बरं वाटलं की उरलेल्या गोळ्या राखून ठेवतो, अडल्यानडल्यासाठी.’’

ऑगमेन्टिनसारखी अँटिबायॉटिक्स मुख्यत्वे बॅक्टेरियांवर म्हणजे जिवाणूंवर हल्ला करतात. सर्दीपडशासारखे आजार व्हायरस म्हणजे विषाणूंमुळे होतात. घसादुखी, सर्दीपडसं वगैरे व्हायरल आजारांसाठी, अगदी साध्या ब्राँकायटिसलासुद्धा अँटिबायॉटिक्स काही कामाची नसतात. कांजण्या, स्वाइन फ्लू, एड्स वगैरे खास व्हायरल आजारांसाठी वेगळी अँटिव्हायरल औषधं असतात. ताप उतरवणं हेही अँटिबायॉटिक्सचं काम नाही. पण पेशंटना खूश करायला, त्यांना पटकन बरं करायच्या इराद्याने आणि मुख्य म्हणजे अज्ञानामुळे काही डॉक्टर साध्या पडशाला ती औषधं देतात. ते पावसाळ्यात छतातून गळणारी पाण्याची धार थांबवायला तिच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालण्यासारखं आहे. त्याने काहीही साधत नाही, नुकसानही होऊ शकतं. पण बरंच काही केल्याचा फक्त आभास निर्माण होतो. सर्वसामान्य पेशंटना अँटिबायॉटिक म्हणजे जालीम उपाय इतकंच ठाऊक असतं. ते त्या सोपस्काराने भारावून जातात.

याचा अर्थ ‘अँटिबायॉटिक्स’ देऊच नयेत असा नव्हे. ती अत्यंत गुणकारी औषधं आहेत. ती घातक जिवाणूंना मारतात. टायफॉइड, मेनिंजायटिस, टीबी वगैरे आजारांत अँटिबायॉटिक्स न घेणं म्हणजे आत्महत्या करणंच ठरेल.

एकोणिसाव्या शतकातले ३३ टक्के मृत्यू जिवाणूंमुळे फैलावणाऱ्या न्युमोनिया, टीबी, जुलाब आणि डिप्थेरिया या चार आजारांमुळे झाले. त्या काळात दर दहापैकी नऊ मुलं मेनिंजायटिसने मरण पावली! कॉलऱ्याच्या सहा जगद्व्यापी साथींमध्ये एकटय़ा भारतातच सुमारे दोन कोटी माणसं दगावली! प्लेगच्या ‘काळ्या मरणा’ने युरोपच्या इतिहासाचा मार्ग बदलला!

अँटिबायॉटिक्सच्या युगात जिवाणूजन्य साथी आल्याच नाहीत असं नाही. त्यांनी थैमानही घातलं. पण मृत्यूंची संख्या हजारांच्या मर्यादेत राहिली. सध्याही दरवर्षी अंदाजे ५५ कोटी जिवाणूजन्य दुखणी पूर्ण बरी होतात ती केवळ अँटिबायॉटिक्समुळेच! मानवी आरोग्याच्या दृष्टीने बघता अँटिबायॉटिक्सचा शोध हा विसाव्या शतकातला सर्वात महत्त्वाचा शोध म्हणता येईल.

शिवाय अँटिबायॉटिक्सची बहुदुधी गाय आखूडशिंगी नाही. त्यांनाही दुष्परिणाम असतातच. ते ध्यानात ठेवायलाच हवेत. पण तसे ते प्रत्येक औषधाला असतातच याचंही भान राखायला हवं. अगदी पेनिसिलिनसारखी प्राणघातक अ‍ॅलर्जी इतर औषधांमुळेच नव्हे तर शेंगदाण्यांमुळेही येऊ शकते. ‘अँटिबायॉटिक्स गरम पडतात’, ‘त्यांनी थकवा येतो’, ‘त्यांनी बी-कॉम्प्लेक्स कमी होतं’ वगैरे अनेक तक्रारी असतात. अँटिबायॉटिक्स ज्या आजारासाठी द्यावी लागतात त्या आजाराचेही शरीरावर दुष्परिणाम होतात हे सोयीस्करपणे विसरायला होतं. ‘गरम पडणं’, ‘थकवा येणं’ ही लक्षणं त्या आजाराची असतात. त्यांचं खापर अँटिबायॉटिक्सच्या माथ्यावर फोडणं बरोबर नाही. आतडय़ातले जंतू बी-१२ हे जीवनसत्त्व बनवतात. पण त्याचं प्रमाण फार मोठं नसतं. अँटिबायॉटिक्समुळे ते जंतू मेले तरी त्यामुळे बी-कॉम्प्लेक्सची कमतरता होत नाही.

अँटिबायॉटिक्स उपकारकच आहेत. पण आपण त्यांच्याशी मनमानी केली. दुभत्या गाईचं दूध एक दिवस काढलं, चार दिवस काढलंच नाही तर तिचा पान्हा आटणारच. अँटिबायॉटिक्सचंही तसंच झालं. ऑगमेन्टिनने सगळे घातक जिवाणू मरायला ५-७ दिवस तरी लागतात. दोन गोळ्यांनंतर औषध थांबवलं तर वाढणारे, विभाजनाने दुणावणारे सक्रिय जिवाणू मरतात. पण त्यावेळी निष्क्रिय झोपलेल्या जिवाणूंना कसलाच धोका पोचत नाही. पहिल्या फळीत मारले गेलेले स्पर्धक घटले की मागे उरलेले, आधीपासूनच ऑगमेन्टिनशी चार हात करू शकणारे समर्थ जिवाणू झपाटय़ाने फोफावतात. झोपी गेलेले जिवाणू जागे झाले की तेही जखमी वाघासारखे चवताळतात आणि आपल्या डीएनए-धोरणात बदल करत लढाईचे नवे डावपेच शिकून घेतात. इतकंच नव्हे, तर ते उरल्यासुरल्या ऑगमेन्टिनचा फडशा पाडून अधिक बलदंड होतात! जंतूंमध्ये ‘एकमेकां साहाय्य’ करायचा गुणही असतो. आधीपासून समर्थ असलेले जंतू डावपेचांच्या नोंदी असलेल्या डीएनएची अस्त्रं वाटतात. आधी मवाळ असलेले जंतूसुद्धा ती आत्मसात करून होश्शिय्यार बनतात. पुढच्या वेळी ते सुसज्ज जिवाणू ऑगमेन्टिनचा धुव्वा उडवतात!

म्हणजेच ते जिवाणू त्या अँटिबायॉटिकला रेझिस्टंट होतात.

वेगवेगळी अँटिबायॉटिक्स फिरफिरून तशीच अपुऱ्या प्रमाणात दिली गेली, की मल्टि-ड्रग-रेझिस्टंट (टऊफ) ऊर्फ अदम्य जिवाणू जोपासले जातात. १९३०च्या आसपास अँटिबायॉटिक्स वापरात आली. १९४०पासूनच एमडीआर किंवा अदम्य जिवाणूंचा उदय झाला. तेव्हापासून त्यांची ताकद आणि फैलाव वाढतच गेले आहेत. न्यूमोनिया, गळवं वगैरे नेहमीच्या जंतुसंसर्गाला कारणीभूत असणारे स्टॅफायलोकॉकाय नावाचे जंतू असे मल्टी-ड्रग-रेझिस्टंट होऊ शकतात. अँटिबायॉटिक्स घेण्यावरच अवलंबून असलेला, आतडय़ांमध्ये सूज निर्माण करणारा आणि असाध्य अतिसाराने हैराण करून मारणारा भयानक जंतू क्लॉस्ट्रिडियम डिफिसिलेही तसाच अजिंक्य असतो. तशाच अवध्य झालेल्या टीबीच्या जीवघेण्या जंतूंनी तर भारतात धुमाकूळ घातला आहे! अतिसाराचे दिल्लीवाले जिवाणू तर अदम्यतेच्या डीएनए-अस्त्रचं वाणच लुटताहेत. आता कित्येक जंतुसंसर्गाना केवळ एकच अँटिबायॉटिक देऊन भागत नाही. दोन दोन-चार चार जालीम औषधांचा मारा करावा लागतो!

रोज पाच शेर दूध देणाऱ्या कपिलेला टांग्याला जुंपली तर ती लाथही मारेल! सर्दी-पडशासारख्या विषाणूजन्य आजारांत अँटिबायॉटिक्सचं काहीच काम नसतं. साध्या सर्दीतापासाठी ऑगमेन्टिनसारखं प्रभावी अँटिबायॉटिक जुंपलं तर त्याला त्या विषाणूंशी लढता तर येत नाही. त्याला बॅक्टेरिया म्हणजे जिवाणूच मारता येतात. पण अस्त्र एकदा योजलं की त्याचा प्रभाव पडणारच!

आपल्या शरीरात आपल्याला उपकारक असे अनेक जंतू कायमचं ठाण मांडून बसलेले असतात. ते घातक जंतूंशी लढून त्याचे हल्ले परतवून लावतात. आपल्या अन्नातल्या न पचणाऱ्या भागावर काम करून त्याच्यातून जास्तीतजास्त कॅलरीज आपल्याला मिळवून देतात. काही जंतू आपल्या अन्नातला थोडा हिस्सा फस्त करतात. अशा जंतूंना पोटात आश्रय दिला की आपलं वजन सहजासहजी वाढत नाही. अँटिबायॉटिक्सना घातक आणि उपकारक जंतूंमधला फरक कळत नाही. ती सुक्याबरोबर ओलंही जाळतात. मित्रजंतूंचाही नायनाट होतो.

सहा महिन्यांच्या आतल्या मुलांमध्ये जर मित्रजंतू असे नाहीसे झाले तर त्या मुलांच्या प्रतिकारशक्तीला शत्रू कोण, मित्र कोण ते शिकता येत नाही. त्या अडाणीपणामुळे ती कशाशीही उगाचच झुंजते. म्हणून त्या मुलांना पुढल्या आयुष्यात अ‍ॅलर्जी-दमा वगैरे त्रास अधिक प्रमाणात होतात असं डेट्रॉइटमधल्या अभ्यासात दिसून आलं आहे.

उपकारक जंतूंची बचावफळी उद्ध्वस्त झाली की मुख्यत्वे आतडय़ात, क्लॉस्ट्रिडियम डिफिसिलेसारख्या घातक जंतूंना मोकळं कुरण लाभतं. नव्या स्वास्थ्यविनाशी जंतूंच्या चिवट वसाहती आपलं साम्राज्य स्थापतात. त्यांना तिथून हुसकून लावायला साधी अँटिबायॉटिक्स असमर्थ ठरतात.

अन्न फस्त करणारे जंतू नाहीसे होऊन त्यांच्या जागी अन्नातल्या अधिकाधिक कॅलरीज मिळवून देणारे जंतू वस्तीला आले की वेगळाच घोटाळा होतो. आहार-व्यायाम सारं काही तसंच कायम राहिलं तरी जमेचं पारडं जड होतं आणि वजन वाढत जातं. तसा जंतुपालट वयाच्या पहिल्या दोन वर्षांतच झाला तर लठ्ठपणा अक्षरश: पाचवीला पुजला जातो.

अँटिबायॉटिक्सचा तो धष्टपुष्ट करायचा गुण कोंबडय़ा-बकऱ्यांना गलेलठ्ठ करायला वापरला गेला नसता तरच नवल. प्राण्यांना जिवाणूंमुळे होणारे आजार बरे करायलाही अँटिबायॉटिक्स दिली जातातच. शिवाय त्यांचं वजन वाढवायलाही त्यांना त्या औषधांचा चारा भरवला जातो. केएफसीला कोंबडय़ा पुरवणाऱ्या, शिकागोतल्या एका कुक्कुटपालन कंपनीच्या कोंबडय़ांना वेगवेगळी पाच अँटिबायॉटिक्स माफक प्रमाणात चारली जातात. त्या मेतकुटात मानवी आजारांवर इलाज करायला अत्यावश्यक अशी टेट्रासायक्लीन, सिप्रोफ्लॉक्सॅसिन, स्ट्रेप्टोमायसिनसारखी औषधंही असतात. त्यामुळे त्या कंपनीला कुक्कुटपालनासोबत रेझिस्टंट-जंतुपालनाचंही पुण्य लाभतं. ते जंतू त्या प्राण्यांच्या पोटात जोपासले जातात. त्यांच्या विष्ठेतून ते जंतू आणि त्यांचे जनक असलेली ती अँटिबायॉटिक्स मातीत आणि सांडपाण्यात मिसळतात. तिथून पिकांत, पालेभाज्यांत उतरतात. त्यामुळे ती अँटिबायॉटिक्स आणि ते रेझिस्टंट जंतू मांसाहारी-शाकाहारी असे भेदभाव न पाळता साऱ्यांच्या अन्नाशी एकजीव होतात.

आपण घेतो ती अँटिबायॉटिक्ससुद्धा आपल्या शरीरात पूर्णपणे पचवली जात नाहीत. त्यांचाही काही भाग जसाच्या तसा सांडपाण्याला जाऊन मिळतो आणि रेझिस्टंट जंतूंच्या तिथल्या पैदाशीला हातभार लावतो.

आता रेझिस्टंट जंतूंची समस्या सगळ्या जगाला भेडसावते आहे. हॉस्पिटलातल्या आजारांचं कारण ठरणाऱ्या जिवाणूंपैकी ७० टक्के जंतूंपुढे किमान एकतरी अँटिबायॉटिक निष्प्रभ ठरलं आहे. जिवाणूंमुळे होणाऱ्या न्यूमोनियाच्या रुग्णांपैकी २५ टक्के रुग्णांवर पेनिसिलिनची मात्रा चालत नाही आणि त्याशिवायच्या २५ टक्के रुग्णांमध्ये अधिकचं एक अँटिबायॉटिकही कुचकामाचं झालं आहे. जोवर नव्या प्रकारची अँटिबायॉटिक्स शोधून काढली जात होती तोवर ‘जुने जाऊद्या रेझिस्टन्सलागुनि’ म्हणायची मुभा होती. पण रेझिस्टंट जंतू झपाटय़ाने उद्भवतात आणि नवी आणलेली औषधं लवकरच मोडीत निघतात. कंपनीला स्वत:च्या संशोधनाचा खर्चही वसूल करता येत नाही. त्यामुळे १९८०पासून कुठलीही कंपनी नवी अँटिबायॉटिक्स बनवायच्या फंदात पडलेली नाही. नवी रसद थांबल्यामुळे जुनी लढत हातून निसटते आहे.

रेझिस्टंट, जीवघेणे जंतू एकदा तयार झाले की त्यांची लागण कुणालाही होऊ शकते, अगदी इमाने-इतबारे सात दिवस अँटिबायॉटिक घेणाऱ्यालाही! मुंबईच्या बसेस-लोकल्समध्ये शिंका-खोकल्यांतून त्या जीवाणूंचं भरघोस वाटप होतं. हे असंच चालू राहिलं तर आपल्या पिढीच्या हयातीतच कॉलऱ्याची पुन्हा ‘मरिआई’ होईल; प्लेग ‘काळं मरण’ बनून येईल आणि सध्या नामोहरम वाटणारे स्ट्रेप्टोकॉकाय हृदयाला घरं पाडून तिथे त्यांच्या सैन्याचे तळ ठोकतील!

ही लढाई फक्त औषध कंपन्यांची आणि डॉक्टरांची नाही. पिकांना आणि प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या अँटिबायॉटिक्सबद्दल, सांडपाण्याच्या प्रदूषणाबद्दल जगात सगळीकडेच हाकाटी व्हायला हवी. सरकारांनी त्या बाबतीत लक्ष घालायला हवं. अँटिबायॉटिक्सचा वापर कमीत कमी व्हावा म्हणून नव्या, प्रभावी रोगप्रतिबंधक लशींचे शोध लागायला हवेत.

पण त्याशिवाय आपल्याला सर्वानाच त्या लढय़ासाठी डावपेच खेळायचे आहेत. सांसर्गिक रोगनियंत्रणाच्या जागतिक संस्थेने, सीडीसीने ते डावपेच आखून दिलेलेच आहेत. त्यांच्यानुसार वागलं तर जगातल्या कुठल्याही पिंकेशचे डॉक्टर सर्दीपडशाला, फ्लूला ऑगमेन्टिन किंवा साध्या तापाला जालीम अँटिबायॉटिकचं एकच इंजेक्शन तर मुळीच देणार नाहीत. जिवाणूजन्य आजारांनाही नेमकी योग्य तीच अँटिबायॉटिक्स, योग्य त्या प्रमाणात, जरुरीपुरत्या दिवसांसाठी देतील.

पिंकेशही शक्यतो सर्दीपडसं टाळेल. त्यासाठी तो ‘स्वच्छ भारत, निरोगी भारत’ हा मंत्र जपेल; हात स्वच्छ धुतल्याखेरीज ते नाकातोंडाकडे नेणार नाही. सर्दीची कुणकुण लागली की नाकात मिठाच्या पाण्याचे थेंब घालणं, मिठाच्या गुळण्या करणं, गरम पाणी पिणं वगैरे साधे इलाज करून ती वेळीच आटोक्यात आणेल. तशीच गरज लागली आणि डॉक्टरांनी अँटिबायॉटिक्स दिलीच तर ती त्यांनी सांगितलेल्या प्रमाणातच आणि तेवढे सगळे दिवस व्यवस्थित घेईल. टंगळमंगळ करणार नाही की त्यातल्या गोळ्या पुढल्या वेळेसाठी उरवून ठेवणार नाही. डॉक्टरांनी दुसऱ्यांना दिलेल्या गोळ्यांचे स्वत:वर प्रयोग करणार नाही आणि आपल्याला दिलेल्या गोळ्या दुसऱ्यांनाही देणार नाही.

डावपेच तसे सोपेच आहेत; पण ते सतत वापरायला हवेत. तो नव्या युगातल्या जिवतीचा वसा आपल्यातल्या प्रत्येकाला घ्यायला हवा. न उतता, न मातता आपण जर ते व्रत अखंड चालू ठेवलं तर आणि तरच आपल्या मुला-नातवंडांच्या आरोग्याची कहाणी सुफळ आणि परिपूर्ण होईल.