परदेशी चित्रपटांमध्ये प्रामुख्याने ‘रोड मुव्ही’ प्रकारच्या चित्रपटांची परंपरा दिसून येते. आपल्याकडे हिंदीत ‘रोड’ याच नावाचा ‘रोड मुव्ही’ प्रकारातला चित्रपट २००२ साली येऊन गेला. राम गोपाल वर्मा निर्मित आणि रजत मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात विवेक ओबेरॉय आणि अंतरा माळी ही जोडी प्रथमच नायक-नायिकेच्या भूमिकेत झळकली होती. रस्तेमार्गाने एकदा प्रवासाला सुरुवात केली, की ईप्सितस्थळी पोहोचण्यापूर्वी आयुष्यात काय काय मजेदार, भयंकर, घातक, आयुष्य बदलून टाकणारं असं काय काय घडू शकतं याच्या शक्यता ‘रोड मुव्ही’ प्रकारात दाखविल्या जातात. अनोळखी ठिकाणी, अनोळखी रस्त्यांवरून जाणाऱ्या लोकांच्या आयुष्यात काहीही घडू शकते हा पहिला महत्त्वाचा मुद्दा ‘रोड मुव्ही’ चित्रपट प्रकारात गृहीत धरलेला असतो. परदेशातील अनेक रोड मुव्ही प्रकारच्या चित्रपटांमुळे भारतीय प्रेक्षकांनाही याचा काहीसा अंदाज असतोच. ‘रोड’ हा हिंदी चित्रपट ‘रोड मुव्ही’ प्रकारातला पहिलाच चित्रपट होता असे मानायला हरकत नाही. 

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची रुपेरी पडद्यावरची प्रतिमा आणि तिचे आतापर्यंत गाजलेल्या चित्रपटांची कथानके याच्या पलीकडे जाऊन ‘एनएच १०’ या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या चित्रपटाची अनुष्का शर्मा एक निर्मातीसुद्धा आहे. निर्माती म्हणून पुढाकार घेऊन तिने हा चित्रपट बनवायला घेतला. त्यानंतर अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, सुनील लुल्ला, क्रिशिका लुल्ला, इरॉस इंटरनॅशनल अशा अनेक बडे दिग्दर्शक आणि बडय़ा बॅनर्सनी साहाय्यक निर्माते म्हणून या सिनेमात प्रवेश केला.
‘एनएच १०’ म्हणजे नॅशनल हायवे क्रमांक दहा. देशभर राष्ट्रीय महामार्गाचे जाळे मोठय़ा प्रमाणावर आहे. आपल्यासारख्या खंडप्राय देशात शेकडो राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्यापैकी एनएच १० हा मार्ग नवी दिल्ली येथून सुरू होऊन पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेलगतच्या शहरापर्यंत जाणारा आहे. दिल्लीहून हरयाणा राज्यातील बहादुरगड, रोहतक, हिसार, फतेहाबाद, सिरसा या मार्गे जाणारा हा रस्ता पंजाबमधील फजिलका जिल्ह्य़ापर्यंत पाकिस्तानच्या सीमेपर्यंत जातो. चित्रपटात या मार्गावरून जाताना दाखविले जाणार असले तरी त्याचे बरेचसे चित्रीकरण जोधपूरमध्ये झाले आहे.
मीरा आणि अर्जुन हे उच्च मध्यमवर्गीय दाम्पत्य दिल्लीजवळील गुरगाव येथे राहणारे आहे. दोघेही उच्च पगाराची नोकरी मोठय़ा कंपनीत करीत आहेत. एका घटनेमुळे मीराच्या मनावर प्रचंड आघात होतो. त्यातून तिला सावरण्यासाठी अर्जुन तिला एका दीर्घकालीन रोमांचक सहलीला घेऊन निघतो. गुरगावहून रस्तेमार्गाने स्वत:च्या गाडीतून दोघे जण निघतात. वाटेत रात्री एका ढाब्यावर जेवायला थांबतात. तिथे एका तरुणीला काही गुंड पळवून नेत असतात, हाणामारी करीत असतात. ते पाहून अर्जुन हस्तक्षेप करतो. आपण हस्तक्षेप केल्यामुळे पुढे काय घडणार याची पुसटशी कल्पनाही अर्जुन आणि मीराला नसते. इथून पुढच्या प्रवासात एक भयानक संकट मीरा-अर्जुनच्या आयुष्यात येते, त्याने दोघांचे आयुष्य बदलून जाते.
‘रोड मुव्ही’ प्रकारातला चित्रपट असल्यामुळे अर्जुन-मीराच्या प्रवासात विघ्ने येतात, गुंड हल्ला करतात किंवा या पद्धतीचे काही घडते असा अंदाज चित्रपटाच्या ट्रेलरवरून सहजपणे येतो.
अनुष्का शर्माने मीरा ही भूमिका साकारली असून नील भूपालमने अर्जुन ही भूमिका साकारली आहे. ‘मेरी कोम’ या चित्रपटातील मेरी कोमच्या नवऱ्याच्या भूमिकेतील कलावंताने प्रेक्षकांचे आणि बॉलीवूडचेही लक्ष वेधून घेतले होते. दर्शन कुमार या कलावंताचा खरे तर ‘एनएच१०’ हा पहिला बॉलीवूड चित्रपट; परंतु ‘मेरी कोम’ आधी प्रदर्शित झाला. दर्शन कुमार, नील भूपालम आणि अनुष्का शर्मा हे तिघेही प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
आतापर्यंतच्या अनुष्का शर्माने साकारलेल्या भूमिकांपेक्षा सर्वार्थाने निराळ्या छटेची भूमिका ‘एनएच१०’मध्ये तिने साकारली असून ती स्वत:च या चित्रपटाची निर्माती असल्यानेही हा तिच्या कारकीर्दीतला महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे.
या चित्रपटाचे आणखी एक विशेष वैशिष्टय़ म्हणजे दिग्दर्शक नवदीप सिंग यांचा हा तिसरा चित्रपट आहे. ‘मनोरमा सिक्स फिट अंडर’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. ‘फिल्म न्वार’ प्रकारातील चित्रपटानंतरचा १३ मार्च रोजी प्रदर्शित होत असलेला ‘एनएच१०’ हा त्यांचा रोड मुव्ही प्रकारातला थरारपट आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
सुनील नांदगावकर

Story img Loader