आदित्य बिवलकर – response.lokprabha@expressindia.com
स्मार्टफोन क्षेत्रात याआधी कधीच पाहायला न मिळालेले सर्वोत्तम फीचर्सचे मोबाइल आणि इतर गॅजेट्स घेऊन आम्ही लोकांसमोर येत आहोत, असं म्हणत अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी इतर सर्व उत्पादकांना आव्हान दिले आहे.  आयफोन १३, आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्स हे अत्याधुनिक फीचर्स असलेले स्मार्टफोन त्याचबरोबर आयपॅड मिनी आणि नवीन आयफोन वॉच याचबरोबर अपडेट्ससह एक संपूर्ण नवीन रेंज आपल्या मेगा इव्हेंटमधून अ‍ॅपलने ग्राहकांसमोर आणली आहे. अर्थात याची किंमत अधिक असली तरीही सॅमसंग आणि इतर कंपन्यांच्या हाय रेंज सेगमेंटच्या स्पर्धेत अ‍ॅपल या नवीन उत्पादनांमुळे स्वतंत्र स्थान नक्कीच निर्माण करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. जाणून घेऊया याच नवीन उत्पादनांविषयी

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने ही आपली ओळख अ‍ॅपलने तयार केली आहे. कल्पनेपलीकडच्या उत्पादनांची निर्मितीकरून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करणे हे अ‍ॅपलचे सूत्र सुरुवातीपासूनच आहे. स्वतंत्र डिझाइन, वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीची काळजी, मोबाइलचा ट्रेंडी लूक या आणि अशा अनेक फीचर्समुळे किंमत जास्त असूनही ग्राहकांना अ‍ॅपलचे गॅजेट्स भुरळ घालतातच. यासाठी प्रसंगी जास्त पैसे देण्याचीसुद्धा ग्राहकांची तयारी असते. अनेक वापरकर्त्यांसाठी आजही अ‍ॅपल हे स्टाईल आणि स्टेट्स स्टेटमेंट मानले जाते. अशाच वापरकर्त्यांचा विचार करून अ‍ॅपलने आपली नवीन रेंज ग्राहकांसमोर आणली आहे.  केवळ सामान्य ग्राहकच नाही तर व्यावसायिक क्षेत्रातील ग्राहकांनासुद्धा या नवीन गॅजेट्सचा फायदा होणार आहे.

आयफोन १३

‘अ‍ॅपल’ने मंगळवारी नव्या उत्पादनांची घोषणा केली. मुख्य आकर्षण होतं, आयफोन १३. आयफोन १२चं फ्लॅट-एज डिझाइन, डायगोनल ट्विन रिअर कॅमेरा सेटअप, आयपी ६८ रेटिंगसह हा फोन पाच नवीन रंगांत सादर करण्यात आला आहे. यामध्ये गुलाबी, निळा, मिडनाइट, स्टारलाइट आणि लाल या रंगांचा समावेश आहे. आयफोन १३ सीरिजमध्ये अ‍ॅपलचा नवीन ए १५ बायोनिक चिपसेट असेल. हा ६ कोअर सीपीयू आहे ज्यामध्ये दोन हाय परफॉर्मन्स कोअर आणि ४ एफिशियन्सी कोअर आहेत. डिस्प्लेमध्ये १२०० एनआयटी ब्राइटनेस आहे. एक्सडीआर डिस्प्ले युजर्सना यातून उत्तम दृश्याअनुभव मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. आयफोन १३ आणि आयफोन १३ मिनीमध्ये डिस्प्लेचा आकार ६.१ इंच आणि ५.४ इंच इतका आहे. यातील अनेक फीचर्स सध्याच्या कोणत्याच स्मार्टफोनमध्ये उपलब्ध नाहीत आणि कंपनीने याचा उल्लेख वारंवार केला आहे. आयफोन १३ बरोबरच आयफोन १३ मिनी, १३ प्रो आणि १३ प्रो मॅक्स हे फोनसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १३ मिनीमध्ये ५.४ इंच स्क्रीन देण्यात आला आहे. यामध्ये एक लहान नॉच असून, त्यामुळे सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिळेल. हा फोन १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. १३ प्रो मॅक्समध्ये ग्राहकांना एक टीबी स्टोअरेजचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे.

फोर के रेकॉर्डिग आणि प्रोसेसिंग

आयफोन सीरिजमध्ये फोर के प्रोसेसिंग आणि रेकॉर्डिगचा पर्याय देण्यात आला असून तो चित्रपट निर्माते, अ‍ॅनिमेशन तज्ज्ञ आणि ग्राफिक्स क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना उपयुक्त ठरेल. चित्रपटाचे चित्रीकरण आणि संकलनही फोनवर होऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. उत्तम रिफ्रेश रेट आणि प्रो रेज रेकॉर्डिगचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. संकलन करताना प्रत्यक्ष काम कसे दिसेल याचा अनुभव एडिटर्सना मिळू शकेल. जाहिरात क्षेत्रातील ग्राहकांना फिल्ममेकिंग फ्रॉम पॉकेट असा संदेश देऊन आकर्षित करण्यात येत आहे. त्यामुळे एक मोठा वर्ग या फोनकडे वळू शकतो. जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञांनी या फीचरचे स्वागत केले आहे.

नवीन आयपॅड मिनी

आकाराने थोडासा लहान पण अतिरिक्त फीचर्सचा समावेश असलेल्या आयपॅडची ग्राहकांना प्रतीक्षा होती. त्यांच्यासाठी आता एक उत्तम आयपॅड उपलब्ध होणार आहे. याच्या अंतर्गत डिझाइनमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. अधिक स्लिम झाला आहे. आयपॅड सीरिजमध्ये हा स्वस्त आणि मस्त असा पर्याय आहे. आयपॅड मिनीमध्ये टॉप बटन म्हणून टच आयडीसह ८.३ इंच स्क्रीन आहे. मागील आयपॅड मिनीच्या तुलनेत ४० टक्के अधिक वेगवान सीपीयू परफॉर्मन्स देण्याचे आणि जीपीयू कामगिरीमध्ये मोठी उडी घेण्याचे आश्वासन अ‍ॅपलने दिले आहे. हे ए१३ बायोनिक चिपसेटवरदेखील चालते. आयपॅड मिनीमध्ये आता यूएसबी-सी पोर्ट आहे. आपण ते आपल्या कॅमेरा, लॅपटॉप तसेच इतर कोणत्याही डिव्हाइसशी कनेक्ट करू शकतो. तसेच आयपॅड ‘फाइव्ह जी’ला सपोर्ट करते. आयपॅड मिनीचा मागचा कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे.

नवीन वॉच सीरिज

स्मार्ट वॉच सेगमेन्टमध्ये सुरुवातीपासूनच अ‍ॅपलचा स्वतंत्र चाहता वर्ग आहे. डिझाइनची कॉपी करण्याचा अनेकांनी प्रयत्न करूनसुद्धा फिचर्स आणि ट्रेण्डी लुक यामुळे स्मार्ट वॉच सर्वोत्तम ठरते. याचीच आधुनिक आवृत्ती कंपनीने लॉन्च केली आहे.

नवीन वॉच सीरिज ‘७ वॉच’ ओएस ८ च्या अपडेटसह उपलब्ध करण्यात आली आहे. वॉच ओएस ८ ऑटोमॅटिक बाईक राइड डिटेक्शन आणि फॉल डिटेक्शन करेल. हे ई बाईकसाठीही उपयुक्त ठरेल. त्यामुळे दुचाकीस्वारांसाठी हे घडय़ाळ उपयोगी ठरेल. डिझाइनमध्ये बऱ्याच वर्षांनी थोडासा बदल करण्यात आला आहे. त्याचा नवीन रेटिना डिस्प्ले हा वॉच सीरिज ६ पेक्षा २० टक्के मोठा आहे. बॉर्डर ४० टक्के पातळ आहेत आणि वापर सुलभ व्हावा म्हणून मोठी बटने देण्यात आली आहेत. ही सीरिज ३९९ डॉलर्सपासून म्हणजेच २९ हजार ३७९ रुपयांपासून पुढे उपलब्ध आहे.

फाइव्ह जी सपोर्ट

फाइव्ह जी सपोर्ट देणाऱ्या फोन्सच्या स्पर्धेतसुद्धा आता आयफोनने प्रवेश केला आहे. त्यामुळे अतिशय वेगवान कनेक्टिव्हिटीचा अनुभव ग्राहकांना घेता येणार आहे. त्याचबरोबर फाइव्ह जीवरून इतर नेटवर्कवर सहज जाण्याचा पर्यायसुद्धा आहे. नेटवर्कनुसार कनेक्टिव्हिटीसाठीसुद्धा हे फीचर फायद्याचे ठरेल. जगभरात अनेक देशांमध्ये हळूहळू फाइव्ह जी सेवा उपलब्ध होत असताना ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

ग्राहक वाढणार?

युरोप आणि विशेषत: ब्रिटनमध्ये विस्तार करण्याच्या दृष्टीने कंपनीने अलीकडेच एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार पुढील १२ महिन्यांत १० कोटींहून अधिक मोबाइल वापरकर्ते आयफोन खरेदी करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ग्राहकांनी बॅटरीबद्दल अनेक सूचना दिल्या होत्या. ३५ टक्के संभाव्य ग्राहकांना त्यांच्या नवीन आयफोनमध्ये दीर्घकाळ टिकणारी बॅटरी हवी आहे, असे सर्वेक्षणातून समोर आले होते. या ग्राहकांसाठी अ‍ॅपलने मेगा सेफ बॅटरी पॅक आणला केला. कोणत्याही आयफोनला कनेक्ट करण्याचा पर्याय यामध्ये देण्यात आला आहे. याच सर्वेक्षणात ग्राहकांनी चांगला कॅमेरा, नवीन प्रोसेसर अशाही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार कंपनीने सर्वेक्षणातील सर्व मुद्दय़ांवर काम केल्याचे लक्षात येते. सर्वेक्षणामध्ये मोबाइलच्या वाढत्या किमतीबद्दल ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रीमियम फीचर्ससाठी ग्राहकांना जास्त किंमत मोजावीच लागणार आहे. यंदा आपला सर्वात महाग आयफोन कंपनीने लोकांसमोर सादर केला आहे. फीचर्समध्ये सुधारणा झाली असली, तरी या तुलनेत किमतीसुद्धा वाढल्या आहेत. परदेशात याला चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत. भारतीय बाजारपेठेत या नवीन सीरिजला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वाचेच लक्ष असेल.

Story img Loader