‘मायग्रेटिंग हिस्ट्रीज ऑफ मोलीक्युलर आयडेंटिटीज’ या वलय शेंडे या तरुण कलावंताच्या प्रदर्शनातील ही महत्त्वपूर्ण कलाकृती. भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयातील दालनात त्याचे प्रदर्शन सुरू आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे पाहायला आणि भूतकाळातील घटनांचा आढावा घ्यायलाही अनेकदा आताशा वेळ नसतो. मग काळ, काम, वेगाच्या या झपाटय़ात अनेकदा कळेनासे होते की, आपण नेमके कुठे चाललो आहोत. याच चिंतनातून या कलाकृती साकारल्या आहेत.
ज्या गोलाकार धातूरचनेचा वापर करीत ही कलाकृती साकारली आहे ती घन, द्रव आणि वायू या जीवाजन्मासाठी आवश्यक असलेल्या घटकांचा संकेत म्हणून येते. त्या धातूरचनेत आपले स्वत:चे प्रतिबिंबही पाहता येते. तेच इथे कलावंताला अपेक्षित आहे. तो या कलाकृतीचा एक भाग म्हणून रसिकांनाही सहभागी करून घेतानाच अंतर्मुख करतो. मुंबईतील सर ज. जी. कलामहाविद्यालयातून शिल्पकलेचे शिक्षण घेतल्यानंतर वलयने देश—विदेशातील प्रदर्शनांमध्ये अनेक भराऱ्या घेतल्या. झुरिक, लंडन, ऑस्लो, रोम आदी ठिकाणी त्याच्या कलाकृती प्रदर्शित झाल्या असून त्याचे कौतुकही झाले आहे.
वलय शेंडे