आपल्या विषयासंबंधी आपण मातृभाषेत लिहिले नाही तर दुसरे कोण लिहील? आणि लिहून तिची प्रगती होणार असेल तर का लिहू नये?

सुधीर शं. कुलकर्णी 
मागच्या शतकाच्या साठाव्या दशकाच्या सुरुवातीला इंजिनीयिरग कॉलेजमध्ये असताना माझ्या लिखाणाची सुरुवात झाली. डिग्रीनंतर मास्टर्स करण्यासाठी मी १९६६मध्ये अमेरिकेत आलो.
मास्टर्स पूर्ण केल्यावर पूल डिझाइन इंजिनीअरच्या नोकरीनिमित्त ऑल्बनी, न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झालो. मात्र १९८३ मध्ये थोडे स्थिर झाल्यावर, मी परत लेखनास सुरुवात केली. माझ्या पेशाला अनुषंगून म्हणजेच पुलांविषयी लिहिण्याचे प्रयोजन मी केले. या विषयीची प्राथमिक माहिती देणारे माझे पहिले पुस्तक -‘पुलांची प्रगती!’ प्रसिद्ध झाले सन २००७ मध्ये. सन २००९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘जगप्रसिद्ध पुलांच्या कहाण्या’ आणि सन २०१२ मध्ये प्रसिद्ध झालेले ‘कथा जगप्रसिद्ध पुलांच्या..’ या दोन्ही पुस्तकांत जगातील प्रसिद्ध दोन डझन पुलांसबंधी र्सवकष माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.
पुलासारख्या तांत्रिक विषयावर लिहिताना मुख्य अडचण भासते पारिभाषिक – मराठी -पर्यायी शब्दांची! सुमारे ४० वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा अठरावा खंड म्हणून परिभाषा संग्रह प्रसिद्ध केला होता. परंतु तो सामान्य वाचकांपर्यंत पोचवला गेला नाही. यातील इंजिनीअरला ‘अभियंता’ अशासारखे मराठी प्रतिशब्द आज मोठय़ा प्रमाणात (सरकारी कचेऱ्यांखेरीज) प्रचलित नाहीत. बऱ्याच जणांच्या मते तो सरकारी असल्यामुळे किंवा प्रसिद्ध झाल्यावर अनेक प्रथितयश मराठी साहित्यिकांनी त्याची टवाळी करण्यास सुरुवात केल्याने त्याकडे दोन पिढय़ांचे दुर्लक्ष झाले असावे.
हो, मी समजू शकतो, डॉ. रघुवीरांनी ‘रेल्वे सिग्नल’साठी सुचलेला ‘अग्निरथ गमनागमन निर्देशक लोहपट्टीका’ या मालगाडीसारख्या लांबलचक परिभाषक शब्दाचे हसू निश्चित येणार. परंतु त्याचबरोबर वीर सावरकरांनी ‘मेयर’ याला सुचवलेला पर्यायी ‘महापौर’ शब्द, सुरुवातीच्या विरोधाला न जुमानता चपखलपणे मराठीत रूढ झालेला आहे.
या अनुषंगात मला मराठीची कोरियन भाषेशी तुलना कराविशी वाटते. कारण दोन्ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या जवळजवळ सारखी म्हणजे ७.५ कोटी आहे. दक्षिण कोरिया सरकारने भाषांतराचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हातात घेऊन, उच्च शिक्षणासाठी इंग्रजीच्या आधाराची जरुरी नाही हे दाखवून दिले. (जपाननेही तशाच प्रकारचा कार्यक्रम राबवला; परंतु जपानी भाषक मराठीपेक्षा जास्त असल्याने त्यांच्याशी तुलना करत नाही.) तशाच धर्तीवर मराठीसाठी- विशेषत: तंत्रज्ञानासाठी- प्रमाणभूत परिभाषेची जरुरी आहे.
प्रमाणभूत तांत्रिक परिभाषक शब्दांअभावी कधी कधी मनात विचार येतो, मराठी भाषेत पुलांसंबंधी लिहिण्याचा खटाटोप कशाला? आणि कुणासाठी? पण मला आमच्या काही वर्षांपूर्वीच्या चीनच्या सफरीतील एका प्रसंगाची आठवण येते. चेंगचाऊ शहराजवळील शाओलिन मठात आम्ही गेलो होतो. हा मठ भारतीय बौद्ध भिक्षू बोधिधर्माने इ.स. ५२७ मध्ये स्थापन केला होता. तिथल्या आजूबाजूच्या डोंगरात अनेक औषधी वनस्पती उगवतात. ती औषधे उत्पादन करणारा कारखाना बघायला आम्ही गेलो. पर्यटकांना विकण्यासाठी ठेवलेल्या औषधांबद्दल दोन स्थानिक मुली आम्हाला माहिती देत होत्या. त्यांतील एक चिनी म्हणजेच मँडरिन भाषेत तर दुसरी इंग्रजीमध्ये त्याचे भाषांतर करत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मँडरिन बोलणाऱ्या मुलीच्या भाषणात मला एकही इंग्रजी शब्द ऐकू आला नाही. थोडक्यात त्यांनी आपल्या भाषेचा इतका विकास केलेला आहे, की त्यांना संभाषणासाठी इंग्रजी शब्दांच्या कुबडय़ांची गरज लागली नाही.
आपल्या विषयासंबंधी आपण मातृभाषेत लिहिले नाही तर दुसरे कोण लिहील? आणि लिहून तिची प्रगती होणार असेल तर का लिहू नये, या विचाराने मी पुलांविषयी तीन पुस्तके लिहिली. माझ्या अनुभवावरून मराठीमध्ये तंत्रज्ञानासाठी परिभाषेची अतिशय जरुरी आहे आणि त्यासाठी मराठी साहित्य परिषद महामंडळ, महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्रातील विद्यापीठे यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मला वाटते. या प्रमाणभूत परिभाषेसाठी – Technical Terms च्या पर्यायी शब्दांसाठी- मी भाषाशुद्धीचा आग्रह धरत नाही हे लक्षात ठेवावे.
आणि ही परिभाषा निर्माण झाल्यावर तिचा प्रसार करण्यासाठी लेखक, त्यांचे लेखन प्रसिद्ध करण्यासाठी प्रकाशक व ते वाचण्यासाठी वाचक यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आज मुंबई-पुणे-नाशिक या ‘सोनेरी’ त्रिकोणामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्राबल्य आहे. चंद्रपूर ते चंदगड या उर्वरित महाराष्ट्रातही त्याचा हळूहळू उदय होत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा निष्कर्ष असा की, मातृभाषेतून विज्ञान किंवा तंत्रज्ञान शिकवल्यास त्याचे आकलन मुलांना लवकर होते. मराठीतून तंत्रज्ञान शिकण्याची संधी प्राप्त झाल्यावर मराठी माध्यमांच्या शाळा/ कॉलेजेसचा विकास होऊ शकेल. मराठीला विज्ञानभाषा म्हणून मान्यता मिळावी अशी आशा आहे.

पेठे आजोबा…
प्र. अ. जोशी
तशी पेठे आजोबांची आणि माझ्या वडिलांची ओळख सरकारी दूध केंद्रावरची. दूध फक्त सरकारी केंद्रावरच मिळायचं, त्या काळातली. दूध दिवसातून दोन वेळा मिळायचं. सकाळी पाच-साडेपाच वाजता आणि दुपारी दीड-दोनच्या सुमाराला. आबा सकाळीच केंद्रावरून दूध आणत. कधी तरी दुधाची गाडी उशिरानं यायची. मधला वेळ तिथे जमलेल्यांना निवांत गप्पांसाठी असायचा.
अशा गप्पाष्टकातून पेठे आजोबांचा आमच्या कुटुंबाशी आपसूक स्नेह जमला. संध्याछाया भिववणारं पंचाहत्तरी उलटलेलं वय. धोतर आणि पांढऱ्या शर्टावर निळसर रंगाचा कोट. स्पोक्स टाइप उभे असलेले पांढरे केस, दातांची अर्धी पंगत गायब झालेली, तजेलदार कांती, बेतशीर उंची आणि लुकलुकणाऱ्या डोळ्यांबरोबर चेहऱ्यावर सदा असणारं निव्र्याज निरागस हास्य.. म्हणजे आमचे पेठे आजोबा.
जवळपास रोज संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांचं आमच्याकडे येणं ठरलेलं असायचं. बाहेर पहिली दुसरीत शिकणाऱ्या इतर मुलांबरोबरच आमचीही दोन मुलं खेळात दंग असायची. पण पेठे आजोबा आले की रंगलेल्या खेळात थोडासा ब्रेक घेऊन ‘पेठे आजोबा आले, पेठे आजोबा आले’ असं एकसुरात त्यांचं स्वागत आमची मुलं करत, आमच्या घरात ते येईपर्यंत. त्याचं कारणही तसंच होतं. पेठे आजोबा न चुकता येताना छोटी चण्याची पुडी, चण्यामण्या प्रकारातली बोरं, बडिशेपेच्या गोळ्या असा खाऊ आणत. कधी तरी यापेक्षा मोठ्ठा खाऊ घेऊन येण्याचं आश्वासनही देत. आमच्या मुलांचा पेठे आजोबांना लागलेला लळा मुलांबरोबर निर्माण झालेल्या त्यांच्या जवळिकीतून, देहबोलीतून जाणवत असे. पेठे आजोबा आमच्या दोन लहानग्यांतून नातवंडांचं सुख अनुभवीत असत.
३५-४० वर्षांची तुटपुंज्या पगाराची टांकसाळीतली नोकरी इमानेइतबारे संपवून निवृत्त झालेल्या पेठे आजोबांना उमेदीच्या काळात घरची बिकट परिस्थिती आणि भावंडांची जबाबदारी यातून स्वत:च्या आयुष्याबाबत विचार करायला फुरसतच मिळाली नाही. सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त झाल्यानंतर मात्र त्यांच्याच भाच्याने स्वत:च्याच कुटुंबात त्यांना सामावून घेतलं. बिकट परिस्थितीशी झगडलेल्या पेठे आजोबांच्या तोंडून मात्र गत आयुष्याबद्दल विषादाचा वा तक्रारीचा सूर कधीच आला नाही. कुटुंबवत्सल पेठे आजोबांचं नातवंडांच्या प्रेमासाठीचं आसुसलेपण मात्र जाणवत असे.
कदाचित या आसुसलेपणातूनच मोठा खाऊ आणण्याचं आश्वासन पेठे आजोबा आमच्या लहानग्यांना अधूनमधून देत असावेत. मिळणारं पेन्शन सर्वस्वी भाच्याला देऊन आपला भार कमी करण्याचा पेठे आजोबांचा प्रयत्न असे. आयुष्यात जमा केलेली थोडीफार पुंजी उतारवयात आजारपण आलंच तर त्याची तजवीज म्हणून बाजूला ठेवलेली. अशातनंच मोठा खाऊ आणण्याचं त्यांचं आश्वासन बरीच र्वष अपुरं राहिलं असावं.
वयाची सत्त्याऐंशी पार केल्यानंतर अल्पशा आजारानं पेठे आजोबांनी आम्हा सर्वाचा कायमचा निरोप घेतला. त्यानंतर पंधरा एक दिवसांनी अचानक पेठे आजोबांचा भाचा आमच्याकडे आला. एक लिफाफा आणि दोन छोटी पाकिटं आबांच्या पुढे ठेवून म्हणाला, पेठे आजोबांनी आजवर साठवलेल्या पुंजीचं काय करायचं, यासंबंधीचं इच्छापत्र या लिफाफ्यात आहे. आणि उरलेल्या दोन पाकिटांत तुमच्या दोन नातवंडांसाठी ‘मोठा खाऊ’ आणण्यासाठी त्यांच्याच इच्छेप्रमाणे दिलेले काही पैसे आहेत!
जगाचा निरोप घेण्यापूर्वी इच्छापत्र करून पेठे आजोबांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्याची काळजी घेतली होती!

वाचाल तर लिहाल
श्रीनिवास स. डोंगरे

भविष्यातील सर्व पिढय़ांनी तुमची आठवण काढावी, असे जर तुम्हाला वाटत असेल, तर एक पुस्तक लिहा. जे काही वेगळं आपल्याला जाणवलेलं असतं ते इतरांपर्यंत पोहोचवणं, ही माणसाची एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. सुंदर सूर्यास्त मी पाहिला की तो आनंद मी मनात बंदिस्त करू शकत नाही. मी भेटेल त्याला सांगतो. त्याच्या डोळय़ांसमोर उभा करण्याचा प्रयत्न करतो. जी घटना त्यानं प्रत्यक्ष पाहिलेली नाही, त्याची मी त्याला साक्षीदार बनवतो. म्हणजेच माझ्या अनुभवात त्याला सामील करून घेतो. म्हणजेच- एकाचा अनुभव असतो तो अनेकांचा होतो, हेच लिहिण्याचे समाधान, म्हणजे प्रेरणा.
संत रामदास सांगतात-
जे जे आपणास ठावे।
ते ते इतरां सांगावे
शहाणे करून सोडावे।
सकल जन
तसेच एखादे पुस्तक किंवा मासिक वाचल्यावर प्रतिक्रिया कळवणे, लिहिणे हा वेळेचा अपव्यय नसून वाङ्मयीन संस्कृती जोपासण्यासाठी एक सहज शक्य, पण अतिशय उपयुक्त असे योगदान आहे. डॉ. विजया राजाध्यक्ष साहित्य संमेलनातील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणतात- ‘लेखकाला वाचकांचा प्रतिसाद मनापासून हवा असतो. वाचकालाही सहभागात आनंद असतो. वाचकाने लेखकाला रसिकवृत्तीने दिलेली दाद असते.
आपल्याला आवडतं ते लिहीत राहायचं, इतरांना ते आवडलं तर तो बोनस समजायचा. एखादी गोष्ट लिहिण्यास न जमणे म्हणजे अपयश नाही, एखादे वेळी आपण वाक्यरचना करताना किंवा दीर्घ-ऱ्हस्व चुकलो तर याचा अर्थ आपण मूर्ख आहोत असा होत नाही. विचार आणि तयारी यांचा जेव्हा समन्वय होतो तेव्हाच लिखाण होतं व ते आपल्याला साथ देतं. ‘फारसा’, ‘बहुधा’ आणि ‘सहसा’ हे शब्द आपल्या मनाचा खुलेपणा अधोरेखित करतात.
पण, परंतु, मात्र, अर्थात, कदाचित, असेल, वाटते हे शब्द एखादा लेख लिहिताना कितीदा येतात व आपण ते कसे वापरतो, त्यावरून विषय गोल गोल फिरत राहून लिखाण भरकटत जाते.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला विविध शास्त्रे, राजकारण, तत्त्वज्ञान, गणित, कला यावरची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. या पुस्तकांचा आधार अनेकदा इंग्रजी पुस्तके होता, कारण अनेक महत्त्वाचे ग्रंथ त्या भाषेत स्वतंत्रपणे किंवा अनुवादित स्वरूपात उपलब्ध होते. नंतर हा प्रवाह थोडा आटल्यासारखा झाला. गेल्या २०-२५ वर्षांत मराठी पुस्तकांचा वाचक वाढला आहे. पुस्तकांची संख्या वाढली आणि ई-बुकसारखी माध्यमे उपलब्ध झाली. हे सर्व वाचकांनाही बहुआयामी बनवतील, त्यांना पण आपले विचार कागदावर मांडण्याची स्फूर्ती येईल.

‘वाचक लेखक’ या सदरासाठी लेख पाठवताना मेल अथवा पाकिटावर ‘वाचक लेखक सदरासाठी’ असे स्पष्टपणे नमूद करावे. आमचा पत्ता: लोकप्रभा प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० फॅक्स : २७६३३००८ Email – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader