अनेक मुले आपल्या आई-वडिलांची अपरंपार सेवा करतात आणि एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवतात. आईवडिलांसाठी श्रावणबाळ होणारेही अनेक आहेत. पण आपले कोणतेही रक्ताचे नाते नसताना केवळ माणुसकीच्या सर्वोच्च नात्याचे बंध मनात ठेवून काम करणारे मात्र या भूतलावर विरळा आहेत. त्यात आता केईएम रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम केलेल्या सर्वाचाच एकत्रित समावेश करावा लागेल. आयुष्यावर ओढवलेल्या दुर्दैवी घटनेनंतर गेली तब्बल ४२ वर्षे कोमात राहिलेल्या अरुणा शानबाग यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांचे हे गेल्या ४२ वर्षांचे आयुष्य सुसह्य़ करण्याचे काम केईएमच्या परिचारिकांनी केले. त्यांच्या मनाचा बांध अरुणाच्या निधनानंतर फुटला असेल..
परिचारिकांच्या बदल्या होत असतात, त्या निवृत्त होतात आणि नवीन परिचारिकाही येतात. गेल्या ४२ वर्षांत अशा असंख्य जणी येऊन गेल्या असतील. पण वॉर्ड क्रमांक चारमध्ये निपचित पडून राहिलेल्या अरुणाचा सांभाळ करण्यात यांच्यापैकी कुणीही कोणतीही कमतरता ठेवली नाही. अरुणाचे त्यांच्याशी असलेले माणुसकीचे सर्वोच्च नाते त्यांनी पुढच्या पिढीकडेही नेमके पोहोचवले, हेच यातून दिसते. एखादी गोष्ट खूप आतून, मनापासून केली की, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यात काहीच कमी पडत नाही. याचा आदर्श वस्तुपाठच केईएममधील या परिचारिकांनी घालून दिला आहे. अरुणावरील प्रसंग आणि नंतरचे तिचे आयुष्य ही अतिशय दुर्दैवी बाब असली, तरी तिच्यासाठी झटणाऱ्या परिचारिकांनी घेतलेली काळजी ही अतुलनीय सेवेचा परमबिंदूच ठरावी. गेली ४२ वर्षे अरुणा पाठीवर झोपून होती पण तिच्या पाठीला कधीही जखमा (बेड सोअर्स) झाल्या नाहीत. हे एकच उदाहरण केईएमच्या समस्त परिचारिकांनी केलेल्या सेवेचा परमबिंदू स्पष्ट करण्यास पुरेसे ठरावे.
कुणाचेही, कोणीही काहीही फुकट न करण्याच्या या आजच्या जमान्यामध्ये केईएमच्या परिचारिकांनी घालून दिलेला हा आदर्श अपवादात्मक आहे. आजूबाजूच्या परिस्थितीची कोणतीही जाणीव न राहिलेल्या अरुणाला त्यांनी काहीच कमी पडू दिले नाही. अगदी तिचा पन्नासावा वाढदिवसही त्या परिचारिकांनी तेवढय़ाच उत्साहात साजरा केला. तिच्या कुटुंबातील कुणीही या काळात तिच्यासोबत नव्हते. अशा वेळेस केईएममधील परिचारिकाच तिचे कुटुंब झाल्या. सर्वात महत्त्वाचे आहे ते गेल्या ४२ वर्षांमध्ये इथे आलेल्या व निवृत्त झालेल्या परिचारिकांच्या तीन पिढय़ांमधील सातत्य. ते केवळ वाखाणण्याजोगेच आहे. नवीन पिढीच्या बाबतीत एरव्ही तक्रारी केल्या जातात. पण परिचारिकांच्या नव्या पिढीनेही आईप्रमाणेच तिची काळजी घेतली.
पिंकी विराणी यांनी दयामरणासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली त्यावेळेस मात्र या परिचारिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. सर्वोच्च न्यायालयातील निकालाआधी संपूर्ण केईएम तणावाखाली होते आणि दयामरणाविरोधात निकाल आल्यानंतर केईएममध्ये सणासारखा आनंद साजरा झाला. परिचारिकांना इंग्रजीत सिस्टर अशी हाक मारतात. त्यांनी त्यांचे भगिनीप्रेम अरुणाच्या बाबतीत प्रत्यक्षात दाखवून दिले. कायम रुग्णशय्येवर निपचित पडलेल्या त्या अरुणासाठीच हे सारे काही सुरू होते. परिचारिकांनी जीवापाड जपलेल्या माणुसकीच्या नात्याने रक्ताच्या नात्यावरही मात केली!
माणुसकीचे हे एव्हरेस्ट उभे करणाऱ्या केईएमच्या समस्त परिचारिकांना आणि त्यांच्या सेवाभावी वृत्तीला अभिवादन !
विनायक परब