दृष्टी स्वच्छ झाली की, कलेतील नवे नवे आविष्कार गरसमज निर्माण करणार नाहीत. ‘हे आहे’ हा अनुभवही सौंदर्याचे दर्शन होईल. वारी कशी झाली पंढरीची?
काय सांगावी, पंढरीच्या दर्शनाची गर्दी!
चंद्रभागेच्या केवळ गजबजलेल्या पात्रांची, लक्षावधी भक्तांची
अनेक शतकं हेच दृश्य!
प्रत्येकाची मुद्रा आसावलेली,
आर्त, दुखी आणि सुखी
सगळेच जमलेले, दमलेले.
पण कशा करता?
पंढरीच्या दर्शनाला,
दु:खहर्ता म्हणून त्यांच्याकडे बघणारे.
मनात शंका आली माझ्या,
की या सर्वाना दर्शन झालंय काय?
जीवनाची दर्शन भूक शमली काय?
.दर्शनात अपेक्षा नसतात,
आपल्या अपेक्षा असतात
म्हणून कदाचित आपण
सारख्या वाऱ्या करीत असतो.
..भारतात अनेक ठिकाणी
मोठमोठी लेणी आहेत
भव्य मंदिरे आहेत,
कलावंतांनी आपले प्राण ओतलेत.
त्यांचं नावही शिल्लक ठेवलेलं नाही.
ठेवलं ते सौंदर्य आणि भव्यता.
आपण काय बघतो,
तर जैन लेणी, बुद्ध लेणी,
कार्ला, भाज्या अशी विभागणी करतो.
म्हणूनच कदाचित त्या भव्यतेची
सौंदर्यानुभूती येऊ शकत नाही.
जगातही अशा अनेक भव्य वास्तू
शिल्प, चित्रकला यांची गर्दी असली तरी
माणूस या दिव्य दर्शनाला
वंचित झाला असावा
असं वाटतं त्यातल्या त्यात.
..ज्या प्रकाशामुळे रंगांची अनुभूती येते
तो प्रकाश महत्त्वाचा आहे आणि
या प्रकाशाचं दर्शन म्हणजे महामुद्रा.
असं दर्शन तेव्हाच होईल जेव्हा
आपल्या दृष्टीला अनेक जन्मांची
जी सवय लागली आहे;
आपल्या आवडीनिवडीच्या धुक्यांची
ती पुढे,
ती दृष्टी जोवर स्वच्छ होत नाही
तोवर मलिनताच दृष्टीला दिसणार
निखळ पाहणं असंभवनीय
..दृष्टी स्वच्छ झाली की,
कलेतील नवे नवे आविष्कार
गरसमज निर्माण करणार नाहीत.
आवड निवड
या द्वंद्वात अडकणार नाहीत.
‘हे आहे’ हा अनुभवही
सौंदर्याचे दर्शन होईल.
निखळ पाहणं द्वंद्वातीत
हीच कलेची अनुभूती.
महामुद्रा होय.
नामा म्हणे ‘पाहता सुकुमार सावळा, लवू विसरला डोळा’
शब्दांतून शब्द जन्माला येतात
आता, निशब्द
हेच दर्शन!
-चित्रकार शंकर पळशीकर
दर्शन म्हणजे केवळ दिसणं नव्हे. दिसणं आणि पाहणं यात फरक आहे. दिसणं ही झाली नसíगक कृती. पण पाहण्यामध्ये समावेशकता आहे. पाहणं ही रसिकांनी ठरवून केलेली कृती असते. पण मग विचार मनात येतो, भारतीय तत्त्वज्ञानाच्या सहा शाखांना षड्दर्शने का म्हणतात? उत्पत्तीशास्त्राच्या आधारे शब्दाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस हळूहळू उकल होत जाते. दर्शन या मूळ शब्दामध्ये केवळ पाहण्याच्या पलीकडचं द्रष्टेपणही अपेक्षित आहे. म्हणून तत्त्वज्ञानाच्या त्या शाखांना दर्शनशास्त्र म्हटलं जातं. या दर्शनामध्ये शोध, उकल आणि द्रष्टेपण सारं काही आहे आणि सर्वात महत्त्वाची आहे ती सौंदर्यानुभूती.
यंदाच्या वर्षी या सौंदर्यानुभूतीचा, दर्शनाचा शोध घ्यावा असा विचार मनात येणं त्याचवेळेस प्रख्यात चित्रकार आणि विख्यात चित्रकारांचे महागुरू असलेल्या तत्त्वज्ञ चित्रकार शंकर पळशीकर यांच्या जन्मशताब्दीचा योग जुळून येणं हाच यंदाचा सुयोग!
मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कलादालनामध्ये (एनजीएमए) पळशीकर सरांच्या चित्रांचे सिंहावलोकनात्मक प्रदर्शन सुरू आहे. तिथे पुन्हा एकदा दर्शन हा शब्द नव्हे तर विचार सामोरा आला. त्या पाठोपाठ पळशीकर सरांनी लिहिलेली महामुद्रा ही कविता! ती कविता नव्हे तर ते तत्त्वज्ञान आहे, सौंदर्याचं. सौंदर्यानुभूतीचा मार्गच पळशीकर सर सहज सांगून जातात.
आजवर आपण खूप प्रख्यात चित्रकार पाहिलेले असतात, त्यांच्या कलाकृती पाहिलेल्या असतात. त्यात तय्यब मेहता असतात, अकबर पदमसीही असतात तर कधी प्रभाकर कोलते. काही हयात नसलेल्या आणि हयात असलेल्याही कलाकारांशी झालेला संवाद आठवत राहतो आणि त्या त्या वेळेस या मान्यवरांकडून पळशीकर सरांविषयी व्यक्त झालेला आदर, त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला आलेला आकार, विचारांना मिळालेली दिशा हे सारं काही ऐकलेलं असतं. पण त्यांची चित्रं एकत्रित पाहण्याचा योग मात्र येत नाही. एखाद-दुसऱ्या प्रदर्शनात एखादं चित्रच नजरेला पडलेलं असतं. त्या चित्रामधली झलक पाहून मग अधिक आस लागून राहते. तोपर्यंत सरांबाबतचे एकूणच मनात असलेलं तेजोवलय वाढलेलं असतं. पण दर्शनाची इच्छा अपूर्ण राहते. मग कुठे तरी कुणकुण सरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने येणाऱ्या प्रदर्शनाची.. आणि थेट आपण पळशीकर सरांच्या चित्रांसमोरच उभे असतो.
या चित्रप्रदर्शनात पळशीकर सर उलगडत जातात ते त्यांच्या कवितांमधून, लिखाणांमधून आणि चित्रांमधूनही. मग हे व्यक्तिमत्त्व असं आगळंवेगळं का आणि कसं घडलं, या प्रश्नाचाही उलगडा होत जातो. बॉम्बे स्कूलच्या प्रोग्रेसिव्ह आर्टस्टि ग्रुपने त्यांना नेतृत्व करण्याविषयी विनवले. त्यात होते हुसेन, रझा, सुझा, बाकरे, गाडे, आरा आदी बिनीचे शिलेदार. पण सरांनी ते नाकारलं आणि केवळ शिक्षक राहणं पसंत केलं. असं का, याचं उत्तर त्यांच्या तत्त्वज्ञ असण्यातून मिळतं. त्यांना केवळ बिनीचे शिलेदार होऊन राहायचं नव्हतं, त्यांना वाटायचं होतं बरंच काही, तत्त्वज्ञानापासून सौंदर्यानुभूतीपर्यंत. ते म्हणायचे, ‘‘सामूहिक चळवळीचा कलावंतांना लाभ होऊ शकतो, परंतु त्यामुळे कलेची किती प्रगती होईल, याची खात्री देता येत नाही” त्यांना जे काम करायचं होतं ते त्यांनी चोख बजावलं, हे प्रदर्शनाला दुरून येणाऱ्या कलावंत, रसिकांकडे पाहून जाणवतं. कारण एनजीएमएमध्ये प्रवेश करणाऱ्याच्या मनात पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला आल्यासारखे भाव असतात. दर्शनच आहे हे, प्रदर्शन नव्हे!
पळशीकर सरांची गाजलेली चित्रं तर या प्रदर्शनात आहेतच, पण त्यांची प्रयोगशील चित्रंही आहेत. खरं तर त्यांचे प्रत्येक चित्र नवा प्रयोग घेऊन जन्माला आलं. मग ते सिनर्स डिव्हाइन असो किंवा वन विदाऊट सेकंड, माया, प्रेस्टिज, डान्स वुइथ स्नेक किंवा मग विष्णुदास भावे अथवा मिस केसारखे व्यक्तिचित्र असो. भारतीय आणि पाश्चात्त्य शैलीची त्यांनी केवळ सांगडच घातली नाही तर त्यात स्वतच्या पद्धतीने नवोन्वेषण करत नवीन शैली विकसित केली, ज्यावर त्यांची स्वतचीच छाप होती. मग छाप रंगलेपनापासून ते त्यातील प्रतिमा- प्रतीकांचा वापर, चित्रण पद्धती, शैली सर्वच बाबतीत वेगळी होती. अपारदर्शक जलरंगाचा वेगळा वापर हे तर त्यांचे वाखाणण्याजोगे कौशल्य. त्यातून चित्र उलटे करून त्यावर मागच्या बाजूने कवडी घासत त्याला वेगळा पोत देण्याचा त्यांनी साधलेला आगळा प्रयत्न हे तर कलेतिहासातील महत्त्वाचे उदाहरण आहे. त्यामुळे इतर चित्रकारांच्या चित्रांमध्ये पोत असतो तर पळशीकर सरांच्या चित्राला त्यांच्या शैलीमुळे कांती प्राप्त होते. हे सारे या प्रस्तुत प्रदर्शनात पाहाता आणि अनुभवता येईल. शिवाय सरांनी वापरलेली अवजारे, चित्रकलेचे ब्रश आदी सारे काही इथे ठेवलेले आहे, ज्याला त्यांचा परीसस्पर्श झाला आहे. त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वाचाच हा ‘भरून पावल्याचा’ अनुभव तसा सार्वत्रिक म्हणायला हवा.
प्रत्येक चित्रकाराची स्वतची अशी एक विचारांची बठक असते. सरांसारख्या व्यक्तिमत्त्वाला बठक असते ती तत्त्वज्ञानाची. हे तत्त्वज्ञान मग चित्रांमधून, त्यांच्या चित्रविचारांमधून पुढे येतं, प्रसार पावतं. कधी विद्यार्थ्यांच्या मार्फत तर कधी कलाकृतीच्या माध्यमातून. सत्यकथेसारख्या वैचारिक नियतकालिकाचं त्यांनी केलेलं आणि प्रदर्शनात मांडलेलं खूपच बोलकं आहे. खरं तर त्यावर लिहिलेली ती एक कविताच आहे, सत्याच्या शोधात. सत्याच्या शोधात केलेले वेगवेगळे प्रयत्न कथा वाचण्यापासून ते आणखीही काही. मग शब्द येतात, काळा कभिन्न पत्थर, वाट अडवून उभा, काहीच दिसत नाही, धड उजेड ना अंधार. पत्थर हलला, बोलला, ‘‘काय शोधतोयस तू? सत्याच्या शोधात मी ही इथे विश्रांती घेत आहे.” ‘‘काय सापडलं तुला?” तो म्हणाला, तू सापडलास हे काही कमी नाही!
पळशीकर सरांचा हा शोध त्यांच्या प्रयोगशील चित्रांमधून सतत जाणवत राहातो. ते नादाचा शोध घेतात, दृश्यरूपात. हे तर अवघड असंच काम. त्यांचं शीर्षकच होतं नाद आणि रंग. ते सांगायचे, ‘‘रूप, रंग, अवकाश आणि पोत हे चित्रकारासाठी मूलभूत घटक आहेत. हे सर्व घटक डोळ्याला आणि मनाला सुखावणारा नाद निर्माण करतात. अवकाशाशिवाय नादाची, नादाशिवाय रूपाची, रूपाशिवाय रंग-पोताची कल्पना करता येणं शक्य नाही. या उलट रंग- पोताकडून अवकाशाच्या दिशेने प्रवास करणारी बौद्धिक जाण नक्कीच शांततेत आवाज अनुभवू शकते. ती जाणच कुठल्याही काळाची खऱ्या अर्थाने सांस्कृतिक श्रीमंती आहे” सरांची स्वतची जाण दृश्यकलांव्यतिरिक्त साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान यामध्ये त्यांना असलेल्या रुचीवर परितृप्त झाली. व्यवस्थित पाहिले तर या सर्व चित्रांमधून एक प्रकाशाचा शोध पहायला मिळतो. या प्रदर्शनातील ‘इ इज इक्वल टू एमसी स्क्वेअर’ हे चित्र तर पाहायलाच हवे. ऊर्जेच्या समीकरणाचे हे दृश्यरूप पाहिल्यानंतर अनेक बिनीचे चित्रकार म्हणाले होते, असे काम आपल्या हातून एकदा तरी व्हायला हवे. हुसेनने एका प्रदर्शनात सुलेखनाचे काही प्रयोग केले होते. अरिवद हाटेंना घेऊन सर त्या प्रदर्शनाला गेले होते. हुसेनचे सर्वत्र कौतुक सुरू असतानाच जवळ येऊन हुसेन म्हणाला, पळसीकर हे तो आपने पहेलेही किया है, हम तो अभी कोशीश कर रहे है! खरं तर शंकर पळशीकर किती ग्रेट होते हे सांगण्यासाठी हुसेनचे शब्द वापरण्याची गरज नाही, पण तरीही हा किस्सा सांगितल्याशिवाय राहवत नाही. सरांनी उत्तरायुष्यात केलेली तंत्र ही चित्रमालिकाही पाहण्यासारखी आहे. त्याच्या धार्मिक तंत्रमार्गातील तंत्राशी काहीही संबंध नाही. हा शोध आहे, एका तत्त्वाचा.
खरं तर पौष हा तसा भाकडमास मानला जातो. कोणतेही शुभ कार्य या काळात करू नये असे म्हणतात. पण धर्मशास्त्राने या काळात पुण्यकर्म मात्र भरपूर करावीत, असे सांगून ठेवले आहे. मृत्यूपूर्वी एक चांगले पुण्यकर्म आपल्या गाठीशी असावे, असे वाटत असेल तर ऐन पौषात चित्रपंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन एनजीएमएमध्ये येऊन घ्यायलाच हवे! हा अनुभव घेतलात तर ‘दर्शन’ मात्रे मन कामना पुरती’ म्हणजे नेमके काय याची अनुभूती घेता येईल!
प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते आणि अरविंद हाटे यांच्या प्रयत्नांतून साकारलेले हे प्रदर्शन ३१ जानेवारीपर्यंत सोमवार वगळता दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रसिकांना पाहता येईल.