शिशिरातली पानगळ संपायला लागली की निसर्गाला वेध लागतात ते प्रेमोत्सवाचे. अंगावर लाल लेणं मिरवणारा पांगारा आणि प्रेमाचा आदर्श असलेला सारस पक्षी या उत्सवाचेच प्रतीक आहेत.

नुकत्याच केलेल्या जंगल निसर्ग भ्रमंतीनंतर सहजच इंदिरा संतांची पानगळ कविता आठवली. किती सहजसुंदरपणे इंदिराबाईंनी जात्या शिशिराचं वर्णन केलंय. ‘आला शिशीर संपत पानगळ सरली, ऋतुराजाची चाहुल झाडावेलींना लागली..’. अगदी खरंय. जागोजागी करडय़ा शुष्क रंगाची जाणीव तीव्र होत असतानाच काटेसावर आणि पळसाने उधळलेला लाल रंग निसर्गात येऊ घातलेल्या प्रेमोत्सवाचेच प्रतीक वाटावं. जसे आपले न्यू इयर सेलिब्रेशन्सचे फंडे बहुचर्चित असतात, तसेच फेब्रुवारीतल्या सेंट व्हॅलेंटाईन डे या प्रेमदिवसाचे फंडे बहुचर्चित असतात. आपल्याकडे फेब्रुवारीचा दुसरा आठवडा जणू प्रेममय होऊन गेलेला असतो. निसर्गातसुद्धा येऊ घातलेल्या वसंताची चाहूल लागलेली असतेच. लाल काटेसावर नि गुलाबी कांचन पूर्ण फुलून जणू काही वसंताच्या आगमनाला तयारच असतात.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी

मी माझ्या मनाला मांजर म्हणते. जसं मांजराला प्रत्येक उघडय़ा भांडय़ात डोकवायची सवय असते तसंच काहीसं माझ्या मनाचं निसर्गाकडे बघताना होतं. आसमंतात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीत डोकावून पाहायचं नी त्या घडामोडींच्या कडय़ा जुळवायचा चाळा हे मनमांजर अव्याहतपणे करत असतं. अर्थात निसर्गाचं न्यू इयर सेलिब्रेशन जवळ आल्याची खूण आसमंतात जागोजागी जाणवत असताना मनाचं मांजर गप्प कसं बसेल? ‘कसा करत असेल आसमंत नवीन वर्षांचं स्वागत?’ आपल्यासारखं ‘इलू इलू’ म्हणण्यासाठी त्यालाही वेगवेगळे प्रयोग करावेसे वाटतात का? अशा भरपूर प्रश्नांच्या गुंडय़ांबरोबर या मनमांजराने माझ्या मेंदूला कामाला लावलं.

आसमंतात सहज एक चक्कर मारली तर त्याच्या अंगावर अस्ताव्यस्त पसरलेला मळकट रंग नजरेला जाणवत असतानाच मध्येच कुठे तरी लाल लेणं मिरवणारं हिरवं गोंदण नजरेस पडतं. जवळ जाऊन पाहावं तर हे हिरवं गोंदण चक्क परिचयाचं निघतं. पळसाच्या फॅबेसी कुटुंबातला अजून एक लालभाई सदस्य म्हणून ओळखला जाणारा पांगारा याच काळात हळूहळू फुलायला सुरुवात करतो. एरिथ्रिना व्हॅरिएगाटा या वनस्पतिशास्त्रीय नावाने ओळखला जाणारा पांगारा साधारण १५ मीटर्सची उंची सहज गाठतो. पळसाच्याच कुटुंबातला असल्याने यालाही पानं तीनच असतात. पण ही पानं पळसाच्या पानांपेक्षा पातळ असतात. पानझडी सदरात मोडणाऱ्या या पांगाऱ्याचं वैशिष्टय़ म्हणजे याला चक्क काटे असतात. हे काटे याच्या सालीपासून बनलेले असतात. झाड जवळून निरखलं तर हे काटे सहज दिसून येतात. बाकी झाडाची ठेवण बघायला गेलं तर सरळ उंच वाढणार असतं. जसजसं पांगारा मोठा होत जातो, तसतसा त्याच्या बुंध्याचा काटेरीपणा कमी होतो. पांगाऱ्याची फुलं म्हणजे एक मजेशीर प्रकार असतो. साधारण सात-आठ सेमी लांबीची ही फुलं चक्क नळीसारखी असतात. उमलताना ही फुलं घोळक्यात खालून वर अशी उमलत जातात. या लालभडक चित्ताकर्षक फुलांमधला पुष्परस पिण्यासाठी पांगाऱ्यावर किडे, मधमाशा आणि भुंग्यांचा रसप्राशन मेळावा भरतो. आणि हो, या भाऊगर्दीत पक्षीही असतातच. या रसपान मेळाव्याने अर्थातच परागप्रक्रियेला चालना मिळते हे सांगायला नकोच. पांगाऱ्याची शेंग साधारण १५ सेमी लांब असते ज्यात तीन-चार बिया असतात. मला आठवतंय, लहानपणी आम्ही चिंचोक्यांच्या जोडीला पांगाऱ्याच्या बिया घासून एकमेकांना चटके द्यायचो. हे देखणं झाड शंभर टक्के भारतीय आहे. लाकूडकामात उपयोगी, गुरांना चारा, घरगुती जळण आणि आयुर्वेदात उत्तम उपयोगी असलेलं बहुगुणी पांगाऱ्याचे उपयोग हल्लीच्या झटपटच्या जमान्यात आपण विसरत चाललोय.

माझ्या ताज्या निसर्गभ्रमंतीमधे मला एक खूप घाबरवणारी चीज पाहायला मिळाली. शिशिराचे प्रताप पाहत असतानाच, मला एका सुकू घातलेल्या वेलीवर शेंगांचे अर्धवट सुकलेले घोसच्या घोस लटकताना दिसले. जवळ जाऊन खात्री पटवली की त्याच त्या! खाजकुईरीच्या शेंगा! पूर्वाश्रमीचे अनुभव आठवून लगेच शेंगेपासून लांब झाले. खाज कुईरी सगळ्यांना ऐकून माहीत असते, पण बहुतेकांनी तिला पाहिलंच नसतं. बेंगाल बिन्स किंवा वेल्वेट बिन्स म्हणून परिचित असलेली खाजकुईरी वेल वनस्पतिशास्त्राला मुकुना प्रुरिएन्स म्हणून ज्ञात आहे. या वेलीच्या नावातच तिचा दरारा सामावलाय. ही वार्षकि वेल पूर्ण वाढते तेव्हा साधारण दहा ते पंधरा मीटर्सची लांबी सहज पार करते. आपल्याला खाजकुईरी म्हणजे निव्वळ खाज असंच माहीत असतं. शतप्रतिशत भारतीय असलेल्या वेलीच्या शेंगा आकर्षक दिसतात, पण महात्रासदायक असतात. पावसाळ्यानंतर या वेलीला गुलाबी जांभळ्या रंगाची घंटेसारखी फुलं येतात. या फुलातूनच वेलीच्या शेंगा येतात. पूर्ण वाढीची खाजकुईरी शेंग साधारण पाच ते पंधरा सेमी लांब होते. एका शेंगेत चार ते सहा बिया असतात. तुकतुकीत करडय़ा बिस्किटी रंगात हिरवट छटा असलेल्या या शेंगा आठ दहाच्या घोसात वेलीवरून लोंबकळताना दिसतात. या शेंगांच्या तुकतुकी चकाकीमुळेच यांना वेल्वेल्ट बिन्स असं नाव मिळालंय. शेंगेच्या आतली बी मात्र काळी असते. ह्य़ा तुकतुकीत रंगाला कारणीभूत असते ती शेंगेवरची केसाळ लव. ह्य़ा लवीला स्पर्श झाला की प्रचंड खाज येते. खाजकुईरी म्हटल्याबरोबर लगेच जीवघेणी खाज आठवते. पण तसं नाहीए. आयुर्वेदात औषधी गुणर्धमासाठी वापरली जाणारी ही शेंग मातीतल्या नायट्रोजनच्या प्रमाणावर ताबा ठेवून मातीचा कस वाढवते. शरीराला जास्तीची पोषण मूल्ये देणाऱ्या अनेक हेल्थ सप्लिमेंटसमध्ये या बियांचा अर्क वापरतात. पाíकन्सनच्या उपचारासाठी आयुर्वेदात खाजकुईरीचा वापर केला जातो. या जोडीला कोलेस्टेरॉलने रक्तातली साखर ताब्यात ठेवायलाही खाजकुईरीच्या बियांचा वापर केला जातो. भटक्यांची, निसर्ग
अभ्यासकांची या शेंगांशी कधीतरी भेटगाठ होतेच नि ती भेट कायम स्मरणात राहते. विनोदाचा भाग सोडल्यास, असे काही झाल्यास जवळच पडलेलं गुरांचं शेण आणि माती खाजऱ्या भागावर लावायची. घाण वाटली तरी हा सर्वोत्तम उपाय आहे हे विसरू नका.
या निसर्ग गप्पांमध्ये, निसर्गातली अनुभवलेली नवलाई सांगत असतानाच मनमांजर मला आठवण करून देतंय ते निसर्गातल्या इलू इलू ची. येऊ घातलेला वसंत जणू सर्जनाचा काळ. निसर्गाचं चक्र आपल्या चक्रापेक्षा वेगळं सुरू असतं. आपण आधी नवीन वर्ष साजरं करतो आणि मग ते ठरावीक प्रेमदिवस. निसर्गात मात्र असं नसतं. निसर्गात अमुक एक दिवस ठरवून तो साजरा केला जात नाही. निसर्गातलं प्रेम व्यक्त करणं हे बहुतांश वेळेस निव्वळ प्रजोत्पत्तीसाठीच असतं. पशुपक्ष्यांचे प्यार के फंडे प्रत्येक हंगामात नव्या जोडीदाराबरोबर अमलात आणले जातात. आपल्यासारख्या जन्मोजन्मीच्या, आयुष्यभराच्या आणाभाका निसर्गात कुठलाच जीव घेत नाही. प्रत्येक हंगामात ‘नवा भिडू नवं राज्य’ या धर्तीवर निसर्गातले पशुपक्षी प्रेम व्यक्त करत असतात. अर्थात नियमाला अपवाद असतातच. याच उक्तीला धरून, निसर्गात आजन्म प्रेम पाळणाऱ्या क्रौंच पक्ष्याकडे अपवाद म्हणून पाहता येतं. भारतीय समाज मनाला रामायण माहीत नाही असं होणं शक्यच नाही. रामायणातला सुपरिचीत क्रौंच हा ग्रुइडी कुटुंबातला ‘द सारस क्रौंच’ नावाने ओळखला जाणारा सदस्य आपल्याकडे थंडीत भेट देणाऱ्या हिवाळी पाहुण्यांपकी एक. जगभर पंधरा तर भारतात सहा जातीचे क्रौंच पक्षी आढळतात. या सहापकी चार जाती हिवाळ्यात भारतात येतात. साधारण क्रौंच पक्ष्यांच्या बहुतेक जातींमध्ये पिसांचा रंग पांढरट किंवा करडा असतो. मात्र आपल्याकडे प्रामुख्याने दिसणारा सारस क्रौंच त्याचे लांबसडक पाय नि लाल डोक्यामुळे लक्षात राहतो. उडू शकणारा जगातील सर्वात उंच पक्षी असं बिरुद मिरवणारा सारस ताठ उभा रहिल्यावर साधारण पावणे दोन मीटरची उंची गाठतो. अर्थात उडू शकत असला तरीही याचा बहुतांश वेळ जमिनीवरच जातो. घरटी बांधणे, खाणे, आराम करणे यासाठी सारस जमिनीवरच असतात. दलदलीच्या पाणथळ जागा हे यांचं आवडतं निवासस्थान. तिथे असलेले बेडूक, मासे, किडे आणि लहानसहान सरपटणारे जीव यांचा आवडता आहार. याच आहाराच्या जोडीला भरल्या शेतात जेव्हा हे घुसून पिकाची नासाडी करतात तेव्हा शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडतात.

सारस पक्षी अतिशय सावध म्हणून ओळखले जातात. धोक्याची चाहूल लागल्यावर एक विशिष्ट आवाज काढून ते एकमेकांना सावध करतात. हा आवाज जणू काही तुतारी सारखाच वाटतो, अगदी खणखणीत. ही खणखणीत तुतारी सहज दोन-तीन किलोमीटर्सच्या अंतरावर ऐकायला येते. या अशाच खणखणीत आवाजात हे प्रेमी एकमेकांसाठी जी प्रेमगीतं गातात ती अगदी सॉल्लीडच असतात. साधारण फेब्रुवारी-मार्च महिन्यात, तिसऱ्या-चौथ्या वर्षांत पदार्पण करून वयात आलेले सारस आपल्यासाठी जोडीदार शोधतात. जोडीदार मिळाल्यावर नर आणि मादी मीलनगीत गातात. नर खालच्या तर मादी वरच्या पट्टीत ही मीलनगीतं गातात. या गाण्याच्या लकबीवरूनच नर-मादी फरक कळतो, इतके हे पक्षी सारखे दिसतात. या गीतानंतर हे पक्षी त्यांचं जगप्रसिद्ध नृत्य करतात. या नृत्यात नर-मादी ज्या पद्धतीने एकमेकांबरोबर पंख पसरून डौलाने विहरतात, उसळून उसळून एकमेकांवर उडय़ा मारतात ते बघण्यासारखं असतं. आयुष्यभराची जोडी जुळवलेले हे सारस पक्षी, मागल्या वेळेचं घरटं नीट करतात. मग मादी त्यातच एखाद दोन अंडी घालते. हे सारस नुसते आदर्श प्रेमिकच नसतात तर आदर्श पालकसुद्धा असतात. अंडय़ाची काळजी घेण्याचं काम दोघेही मिळून करतात. महिनाभरात अंडय़ातून बाहेर आलेल्या पिल्लाचं पालनपोषण जोडीनेच केलं जातं. वयात येईपर्यंत म्हणजे वयाच्या तीन ते चार वर्षांपर्यंत हे पिल्लू त्याच्या पालकांबरोबरच राहातं. मात्र नंतरच्या विणीच्या वेळेस पालक त्याला हाकलून देतात. याच दरम्यान जोडीतला एक साथीदार दगावला, तर दुसरा पक्षी आजन्म एकटा राहतो. दुसऱ्या जोडीदाराबरोबर तो कधीच जोडी जुळवत नाही. ही आहे सारस पक्ष्याची जगप्रसिद्ध लाइफ टाइम कमिटमेंट! दिवसेंदिवस अवैध शिकार, निवासाच्या कमी होत जाणाऱ्या जागा या धोक्यांसोबतच, या कमिटमेंटमुळेही सारस पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चाललीय. नामशेष होण्याकडे वाटचाल करणाऱ्या सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या क्रौंच फाऊंडेशनच्या आकडेवारीनुसार भारतात जेमतेम १५ हजार सारस उरले आहेत. जसं कबूतर शांततेचं चिन्ह समजलं जातं, तसंच सारस पक्षी प्रेमाचं प्रतीक समजलं जातं.

माझ्या मनमांजराला मी सांगून टाकलंय की माझ्यासाठी सारसच प्रेमाचा सरस आदर्श आहे. आता आपापला प्रेमाचा फंडा ठरवताना या सारसाला विसरू नका.

(छायाचित्र सौजन्य:  सारस, पांगारा – अभिजित आवळसकर, खाजकुईरी – अनिरुद्ध देशिंगकर)
रुपाली पारखे-देशिंगकर
response.lokprabha@expressindia.com