शिशिराने विरक्त करून टाकलेल्या सृष्टीला ज्या सृजनकाळाची आस लागलेली तो काळ, अर्थात वसंत ऋतू. तो सुरू झाल्याची द्वाही आसमंतात फिरायला सुरुवात झाली आहे.

मागच्या आठवडय़ात जंगलवारी करून येत असताना, गाडीच्या ड्रायव्हरने मराठी गाणी लावली होती. बरीचशी अनोळखी नि कंटाळवाणी गाणी ऐकून झाल्यावर अचानक, ‘हृदयी वसंत फुलताना’ अशी परिचित गाण्याची ओळ कानावर आली. ती ऐकल्यावर पटकन हसू आलं. सध्याच्या आसमंताला हे गाणं अगदी चपखल लागू होत होतं, असं पटकन वाटून गेलं. आपल्या दैनंदिन धावपळीत हळुवार कूस पालटणारे ऋतू आपण पाहून न पाहिल्यासारखं करत असतो. मात्र काही ऋतू असे असतात की, त्यांचं आगमन अगदी हवंहवंसं वाटतं कारण त्या काळात निसर्ग अगदी भरभरून संपदा उधळत असतो. शिशिराने विरक्त करून टाकलेल्या सृष्टीला ज्या सर्जनकाळाची आस लागलेली तो काळ, अर्थात वसंत सुरू झाल्याची द्वाही आसमंतात फिरायला सुरुवात झालेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वसंत पंचमीने वसंताच्या आगमनावर शिक्कामोर्तब केलेलं आहेच. भारतीय ऋतुचक्राप्रमाणे आपल्याकडे शिशिर हा शेवटचा ऋतू तर वसंत पहिला ऋतू समजला जातो. म्हणजेच निसर्गाचं नववर्ष सुरू झालं.

The Hindu Lunisolar Calendar information in marathi
काळाचे गणित : बिनमहिन्यांचं वर्ष!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार

‘जुने जाऊ द्या, मरणालागी’ हे गीत निसर्गाने गाऊन झाल्यावर परिसरात बहुतेक झाडं सर्वसंगपरित्याग केल्याप्रमाणे मोकळी दिसत असताना काही झाडं मात्र आपला हिरवटपणा अजिबात सोडत नाहीत. बहुतांश शहरांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी ठरावीक झाडांना प्राधान्य दिलं जातं. जी झाडं पटकन वाढतात अशी झाडं लावण्यात येतात. त्यातली काही झाडं देशी असतात, तर काही चक्क विदेशी. शिशिराच्या पाश्र्वभूमीवर, सातवीण ऊर्फसप्तपर्णी नावाचं हिरवं गोंदण अगदी ठळकपणे नजरेत भरतं. झाडाच्या नावातच ज्याचं वैशिष्टय़ सामावलंय असं देखणं झाड आसमंतात सहज नजरेस पडतं. ‘अल्स्टोनिया स्कॉलरिस’ अशा वनस्पतीशास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या या झाडाचं प्रजातिनाम स्कॉटिश वनस्पतीशास्त्रज्ञ चार्लस अल्सटन याच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ केलं गेलंय. पूर्वीच्या काळात शाळेत वापरत असलेल्या पाटय़ा, लिखाणाचे फळे हे याच सातवीण वृक्षाच्या लाकडापासून बनवले जायचे म्हणूनच शाळेशी संबंधित स्कॉलरिस हे नाव प्रचलित झालं. पंचवीस-तीस मीटर्सची उंची सहज गाठणारं हे झाड आपल्या सात पानांमुळेसुद्धा ओळखलं जातं. अर्थात अनेक ठिकाणी ही पानं पाच किंवा आठाच्या संख्येतही दिसतात. सातवीण सरत्या पावसाळ्यापासून फुलायला सुरुवात करते, ते अगदी वसंतापर्यंत हे फुलणं सुरू असतं. चटकन नजरेस न पडणारी आणि अतिशय उग्र वासाची ही फुलं संध्याकाळी उमलतात. थोडा वेळ मधुर वाटणारा हा गोडसर वास सतत येत राहिल्यावर डोकं दुखवणारा गुळचीट वाटायला लागतो. नको वाटणारा हा वासच जणू सातविणीच्या फुलाचं वैशिष्टय़ म्हणता येऊ शकतं. आपल्या रातराणीसारखेच पांढऱ्या नाजूक फुलांचे घोसच्या घोस हे झाड मोठं झाल्यावर मिरवतं. अशा नाजूक एखाद सेंमी आकाराच्या फुलांमधून पुढे अगदी चवळीच्या शेंगेसारख्या दिसणाऱ्या साधारण पन्नास सेंमी लांबीच्या फ ळशेंगा येतात. या खर तर शेंगा नसतात. प्रचलित भाषेत त्यांना शेंगा म्हणण्यात येतं खरं. सातविणीचं वैशिष्टय़ म्हणजे एका फुलापासून दोन फळशेंगा तयार होतात. शिशिर संपला की हजारोंच्या संख्येमध्ये लोंबकळणाऱ्या फळशेंगा सुकायला सुरुवात होते. सुकल्यावर या फळशेंगांमुळे अगदी आइनस्टाइन हेअर स्टाइल केल्याप्रमाणे झाडावर पांढऱ्या झिपऱ्या दिसायला लागतात. थेट शेवरीसारख्याच या झाडाच्या बिया पाठीवर पॅराशूट घेऊन लांबलांब उडून पडतात.

सहज वहन होऊन रुजणारं नि फुलणारं, सातविणीसारखं देखणं हिरवंगार झाड शतप्रतिशत भारतीय आहे. यामुळेच आयुर्वेदाला याचे अनेक आजारांवर उपयोग ज्ञात आहेत. मलेरिया, अतिसार, अपचन, चर्मरोग यांवरील उपचारांसाठी या झाडाचे विविध भाग वापरले जातात. हलक्या लाकूड कामासाठी याच्या लाकडाचा वापर केला जातो. असं बहुगुणी, देखणं झाड आसपास दिसलं तर जवळ जाऊन पाहायला विसरू नका.

सातविणीच्या सात पानांत आणि उग्र फुलवासात मन रमत असतानाच घ्राणेंद्रियाला जाणीव झाली ती अद्भुत घमघमाटाची. अंगावर हर्षांने उठलेल्या शहाऱ्याने सांगितलं की, किंग इज कमिंग! अर्थात हु इज किंग हे सांगायला नकोच. आसमंतात ठिकठिकाणी फुललेला मोहोर आम्रफलाच्या आगमनाचे पडघम वाजवताना दिसतोय. आंब्याबद्दल काय लिहावं राव? लिहावं तितकं कमीच आहे. मॅग्नीफेरा वर्गात मोडणारं हे झाड माहीत नसेल अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही हे नक्की. भारत, पाकिस्तान, फिलिपिन्स या देशांचं राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याच्या झाडाचे उपयोग फळ खाण्याव्यतिरिक्त आपल्याला फारसे माहीतच नसतात. हाडांची घनता वाढवण्यासाठी आंब्याचे गुणधर्म उपयोगी पडतात. शरीराची सूज उतरण्यासाठी, जळजळ कमी होण्यासाठी, पचन सुधारण्यासाठीही आंब्याच्या झाडाचा वापर केला जातो. रक्तातली साखर ताब्यात ठेवण्यासाठी आंब्याची पानं उपयोगी पडतात हे आपण माहीतच करून घेत नाही. वर्षांतून दोनच महिने खायला मिळतं म्हणून ते फळ जीव की प्राण. या जोडीलाच आता लक्षात ठेवू या की, अतिसार, दातदुखी, त्वचारोग अशा दुखण्यांवर आंब्याची पानं उपयोगी आहेत. आंबा म्हटलं की आपल्याला हापूस आठवतो, पण हापूसखेरीज अनेक जातीचे आंबे आपल्या देशात आहेत. जंगलांमध्ये जागोजागी माकडांनी खाऊन टाकलेल्या गोटी आंबा किंवा रानआंब्याची चव मोठी मजेशीर असते. जेमतेम मुठीत मावेल एवढय़ा आकाराची ही आम्रफलं प्राण्यांच्या क्षुधाशांतीसाठी उत्तम असतातच, पण जमिनीवर अनंत उपकार करत असतात. जमिनीची धूप आपल्या केशमुळांनी हे झाडं होऊ देत नाहीत. भर उन्हाळ्यात, निसर्गात भटकताना, घनदाट जंगलात, दुपारी रानआंब्याच्या सावलीत दमल्यावर लागणारी डुलकी  एकदा तरी अनुभवावी अशीच असते. आंब्याचं लाकूड मोठय़ा कामांसाठी वापरलं जात नाही. कारण ते उत्तम समजलं जात नाही. कमी प्रतीच्या कामचलाऊ गोष्टींसाठी या लाकडाचा वापर होतो. निसर्गात फार थोडय़ा झाडांना वनदेवतेने शतायुषी भव असा आशीर्वाद दिलाय. आम्रवृक्ष त्या मोजक्यांपकी एक आहे.

या वसंताबरोबर, आंब्याबरोबर आपली काही समीकरणं पक्की झालेली असतात. वसंताच्या आगमनाबरोबर आम्रवनात कोकिळा गाते ही घोकंमपट्टी आपण पिढय़ान्पिढय़ा आपण करत आलोय. भारतीय साहित्य, संगीत, चित्रपट आदींमध्ये मोराखालोखाल लोकप्रिय पक्षी म्हणजे कोकिळा म्हणता येऊ शकते. कुकुलिडी कुटुंबाचा सदस्य असलेली कोकीळ ‘गाते’ असं आपण सहज म्हणतो. पिढय़ान्पिढय़ा आपल्याकडे हा गरसमज सुखाने नांदतोय. खरंतर मादी कोकिळा अजिबात गात नाही, ती कर्कश स्वरात ओरडते नि गातो तो नर कोकीळ! वसंतात नराचं ‘कुहू कुहू’ सुरू होतं नि आपण म्हणतो, ती गाते! आपल्याला कोकिळा माहीत असते, पण ती दिसते कशी हे अनेकांना माहीतच नसतं. साधारण नर कावळ्याशी साम्य असणाऱ्या या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी जमीन-अस्मानाएवढे वेगवेगळे दिसतात. नर काळा कुळकुळीत रंगाचा तर मादी अगदी गडद काळपट तपकिरी रंगावर पांढरे मातकट ठिपके असलेली असते. कोकिळेचे डोळे भडक लाल रंगाचे असतात आणि शेपटीही चांगली लांब असते.

कुकुलिडी कुटुंबाच्या बहुतेक सदस्यांचं वैशिष्टय़ म्हणजे हे पक्षी शक्यतो माणसाळत नाहीत आणि अतिशय लाजाळू असतात. कोकीळही याला अपवाद नाहीच. शक्यतो मनुष्य संपर्कात न येता फळबागा, शेतीचे भाग, माळरानं इथं वास्तव्य करणारा हा पक्षी लहानसहान किडे, अळ्या, सुरवंट, विविध फळं तर खातोच; पण अनेकदा इतर लहान पक्ष्यांची अंडीही चोरून खातो. कोकीळ पामची फळं खाण्यात पटाईत आहेच, पण याच जोडीला एका झाडाच्या बिया वहन करण्यात याचा मुख्य सहभाग असतो. चंदनाच्या बिया याच्या विष्ठेतून रुजतात याची नोंद दक्षिणेकडे झाली आहे हे खास. मी स्वत: या पक्ष्याला अनेकदा माझ्या घराजवळ सोनचाफ्याच्या पिकलेल्या फळांवर ताव मारताना पाहिलंय.

कोकीळ पक्षी आपल्या पिल्लांचं संगोपन करत नाहीत. यामुळेच घरटं बांधणंही त्यांना गरजेचं वाटत नाही. याचाच परिणाम म्हणजे, त्यांना सामाजिक व कौटुंबिक जीवन असं नसतंच. नर आणि मादी फक्त मीलनाच्या काळात एकत्र येतात अन्यथा ते एकेकटेच राहाणं पसंत करतात. साधारण सप्टेंबर ते फेब्रुवारी  यांच्या विणीचा हंगाम समजला जातो. कोकीळ अतिशय हुशार पक्षी म्हणून ओळखला जातो. कावळ्याची अंडी घातलेली घरटी हेरून मादी कोकीळ त्यात एकच अंडं घालते. यासाठी नर कोकीळ कावळ्याचं लक्ष वेधून घेतो व इकडे ही बया आपला कार्यभाग साधून घेते. मादी कोकीळ स्वतचं अंडं कावळ्याच्या घरटय़ात घालण्याअगोदर त्याचं एक अंडं घरटय़ातून काढून टाकते. कोकिळेचं हे अंडं साधारण १२ ते १५ दिवसांत उबून त्यातून पिल्लू बाहेर येतं. हे पिल्लू सुरुवातीच्या काळात हुबेहूब कावळ्याच्या आवाजात ओरडतं ज्यामुळे कावळीण फसते. साधारण महिनाभरात हे पिल्लू स्वतंत्र होऊन घरटय़ाबाहेर उडून जातं. पूर्वीच्या काळी पाळलेल्या कोकिळींचं आयुष्य साधारण १५ वष्रे असल्याची नोंद आहे. हल्ली असे प्रयोग केल्याचं ऐकिवात नाहीये.

आपल्यासाठी वर्षभर खिजगणतीत नसणारा हा पक्षी दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये महत्त्वाचा समजला जातो. पॉन्डिचेरी राज्याचा पक्षी असलेला कोकीळ आता आसमंतात गायला लागणार आहे. आता यापुढे तरी कोकिळा गात होती, असं तुम्ही नक्कीच म्हणणार नाही याची मला खात्री आहेच. आसमंत आता नव्या नवलाईने फुलून निघणार आहे. निसर्गात सर्जन सोहळा सुरू झालाय. जाते जाते म्हणताना रेंगाळलेली थंडी, घाटमाथ्यावरची निरव शांतता, खोल दरीत कोवळ्या सूर्यकिरणांबरोबर रेंगाळणारं धुकं नि त्या सोनसळी उन्हात शेकणारा आसमंत सांगतोय, ‘हॅप्पी न्यू इयर फेलोज’. सर्वाना आसमंतातून वसंतागमनाच्या खूप खूप शुभेच्छा!
रुपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader