आपल्या सहज दृष्टीस पडणारा आसमंतातला घटक म्हणजे उंबराचं झाड. कल्पवृक्ष मानल्या जाणाऱ्या उंबराला आपल्याकडे धार्मिक महत्त्व आहे. आसमंतातला लक्ष वेधून घेणारा आणखी एक घटक म्हणजे सुगरण पक्षी. कवयित्री बहिणाबाईंनी त्याला अजरामर केलंय.

आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांची मांदियाळी लोटलेली.. ‘विठ्ठल विठ्ठल’ आनंदघोषाच्या ऊर्जेने आसमंत भारलेला असताना निरूपणांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या माऊलीच्या कथांमध्ये जणू अवघ्या विश्वाच्या व्यथाच विसरल्या जातात. अशाच कीर्तनांमध्ये सांगितली जाणारी कथा म्हणजे माऊलींच्या समाधीवर असणाऱ्या अजानवृक्षाची. माऊली समाधिस्थ होऊन शेकडो र्वष झाली पण आपल्या जोडीने या वृक्षाला जणू अढळपद देऊन गेली. विश्वाला ज्ञानेश्वरीची भेट देणाऱ्या ज्ञानराज माऊलींनी समाधिस्थ होताना हातातील भिक्षुदंड विवराच्या मुखावर रोवून समाधी घेतली. पुढे याच दंडाला पालवी फुटली आणि बोरॅजिनेसी कुटुंबातल्या या वृक्षाला अजानवृक्ष म्हणून ओळखलं जाऊ लागलं. बोलीभाषेत ‘दातरंग’ म्हणून ओळखलं जाणारं हे झाड ‘एहरेशिया लेव्हीस’ या वनस्पतीशास्त्रीय नावाने ओळखलं जातं. शंभर टक्के भारतीय असलेल्या या झाडाच्या प्रजातीचं नामकरण जर्मन वनस्पतीतज्ज्ञ जॉर्ज एहरेट याच्या सन्मानार्थ केलं गेलंय. शिवालिक पर्वत, अरवली पर्वत आणि सह्यद्रीच्या पर्वत रांगांमध्ये आढळणारं हे झुडुपवजा झाड जेमतेम पाच-सहा मीटर्सची उंची गाठतं, वेडंवाकडं वाढणारं हे पानझडी झाड पिवळट राखाडी सालीमुळे नजरेत भरतं. सर्व स्थानिक वनराईप्रमाणेच अजानवृक्ष हिवाळ्यात पानं गाळून वसंतात पांढऱ्या लहान फुलांनी फुलतो. या फुलांना मंद गंध असतो. यातूनच उन्हाळ्यात गोलाकार गुळगुळीत फळं धरली जातात. घोसात येणारी ही वाटाण्याच्या आकारची फळं सुरुवातीस हिरवी असतात. पिकायला सुरुवात झाल्यावर केशरी होऊन शेवटी काळी होऊन पिकून खाली पडतात. खारी आणि पक्ष्यांना ही बेचव फळं आवडीने खाताना पहिलं गेलंय.

ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीशी निगडित असल्याने अजानवृक्षाला आपल्याकडे धार्मिक महत्त्व लाभलंय. याच्या मजबूत लाकडाचा अन्यत्र उपयोग घराच्या बांधकामासाठी केला जातो. तसं टिकाऊ समजलं जाणारं हे लाकूड अनेक दैनंदिन गोष्टींसाठी वापरलं जातं. म्हणतात ना? देशी वृक्ष लावण्यासाठी सोपे असतात व त्यांचं संवर्धन केल्यास उत्तम वाढतात. म्हणूनच, अजानवृक्षातळी विसावलेल्या ज्ञानराज माऊलींच्या आत्मिक सन्निध्याचा आनंद मिळवायला एकतरी अजानवृक्ष लावायला हवाच नाही का?

तिकडे अजानवृक्षाची नाळ ज्ञानदेवांशी जोडली गेलीय नि इकडे अजून असाच एक वृक्ष जनमानसात पूज्य बनलाय. बहुतांश दत्त मंदिरांच्या परिसरात आढळणारा उंबर ऊर्फ औदुंबर कुठेही दिसला की मन लगेच श्रीदत्तप्रभूंकडे धाव घेतं. शंभर टक्के भारतीय असलेला हा वृक्ष माहीत नसलेली व्यक्ती विरळाच. मोरेसी कुटुंबातलं ‘फायकस रेसिमोसा’ हे झाड आपण औदुंबर किंवा उंबर नावाने ओळखतो. शतकानुशतकं या झाडाची आणि श्रद्धाळू मनाची नाळ जुळली आहे.

‘जळात पाय सोडून बसलेला औदुंबर’ असो किंवा ‘जग हे बंदीशाला’ या गाण्यातला किडे-मकोडे बाळगणारा औदुंबर असो किंवा अगदी ‘उंबराचं फूल झाला आहेस’ असं उल्लेखून घेणारा उंबर असो, या झाडाभोवती शास्त्रीय माहितीपेक्षा कल्पनाविलासच जास्त गुंफले गेले आहेत. आजन्म सदापर्णी राहणारं हे झाड जनजीवनाशी विविध प्रकारे जोडलं गेलय. पंधरा मीटर्सपर्यंतची उंची सहज गाठणारं औदुंबर स्थनिक वृक्षसंपदा आणि जैव साखळीचा उत्कृष्ट नमुना म्हणता येऊ शकतो. उंबराचं फूल म्हणजे अतिशय दुर्मीळ गोष्ट असा एक समज आपल्याकडे पक्का झालाय. पण वस्तुस्थिती अशी आहे की, उंबराचं फूल वेगळं असं काही नसतंच. उंबराला जी फळं येतात ती वास्तविक फुलंच असतात. या अनेक फुलांच्या गुच्छावर एक पातळ आवरण असतं. या आवरणाने झाकलेल्या गुच्छाला आपण उंबराचं फळ म्हणत असतो! फायकस कुळातल्या वड,  पिंपळ, उंबरासारख्या सदस्यांना परागीभवन करणारा स्वतचा ‘फ्लाय व्हास्प’ म्हणजेच माशीसदृश कीटक असतो. उंबराची स्वतची एक व्हास्प आहे जी परागभवनाची प्रक्रिया करते. या आवरणाने झाकलेल्या फुलांचं परागीभवन होण्यासाठी त्यांच्या देठाजवळ एक लहानसं भोक असतं. या भोकातून फ्लाय व्हास्प हा कीटक आत शिरतो आणि तिथेच मीलन करून अंडी घालतो. म्हणूनच, अनेकदा उंबर उघडून पाहिल्यावर आत अळ्या दिसून येतात. निसर्गातली ही अद्भुत जीव साखळी इथे सहज दिसून येते. या कीटकाला उंबराखेरीज जगता येत नाही आणि उंबराचं परागीभवन या कीटकाखेरीज होत नाही.

दीर्घायुषी उंबराचं झाड म्हणजे जणू कल्पवृक्षच म्हणावं असं असतं. कधी याची पानं जवळून पहिली तर त्यावर अनेकदा लालसर हिरवट गाठी दिसतात. या गाठींच्या आत एक कीटक लहानाचा मोठा होत असतो. पूर्ण वाढीचा कीटक, ही गाठ फोडून बाहेर येतो. उंबराची फळं खाऊन पक्ष्यांच्या हजारो पिढय़ा सुखेनव नांदल्या आहेत. या उंबराच्या बिया, पक्ष्यांच्या पोटात जाऊन विष्ठेमाग्रे पडतात तेव्हाच रुजायला तयार होतात, हेही  समृद्ध स्थानिक जीव साखळीचं प्रतीकच आहे. जंगलात, ही फळं खाऊन क्षुधाशांती करणारे प्राणी कमी नाहीत. मला आठवतय, वासोटय़ाच्या जंगलात आम्ही हरवलो होतो, तेव्हा याच उंबरांनी आमची भूक भागवली होती. शंभर टक्के भारतीय असलेल्या या झाडाचा आयुर्वेदात मोठय़ा प्रमाणात वापर केला गेलाय. उंबर आणि त्याचे आयुर्वेदिक वापर यावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो, मात्र मी आयुर्वेदाचा अभ्यास केला नसल्याने त्याबद्दल लिहिणे उचित होणार नाही. उंबराचा चिक, फळं, पानं, मुळं, साल, लाकूड अशा सर्व भागांचा उपयोग आपल्याला ज्ञात आहे. उंबर जिथे उगवतं तिथे हमखास पाणी लागतं असा अनुभव सवार्ंना आहे. मला जंगल भटकंतीदरम्यान भेटलेल्या अनेक अदिवासी मित्रमंडळींनी त्यांच्याकडे असलेल्या पूर्वीच्या एका चालीरीतीबद्दल सांगितलंय. पूर्वी एका पाडय़ातून दुसऱ्या अदिवासी पाडय़ात मुलगी लग्न करून पाठवताना माहेरचे पाहायचे की त्या पाडय़ात उंबराचं भरलं झाड आहे ना? जर सासूने सुनेला घराबाहेर काढलं तर काही काळ तरी आपली लेक ही उंबरं खाईल नि उपाशी राहणार नाही हा या मागचा उद्देश असायचा. ऐकल्यावर मन भरून आलं होतं. पूर्वी दररोज असलेला आपला आणि उंबराचा संबंध कमी व्हायला लागलाय कारण हल्लीच्या आधुनिक घरांना उंबरठाच नसतो. हा उंबरठा कायम लाकडाचा असायचा आणि ते लाकूड या उंबराचंच असायचं. या लाकडाला कीड लागत नाही, ते कुजत नाही आणि तुटत नाही म्हणून दारासाठी, उंबऱ्यासाठी वापरलं जायचं. असं हे उंबर नि त्याचा उंबरठा.. अप्रत्यक्षरीत्या कुठेतरी आपल्या घरटय़ाशी जोडलेला.

उंबराच्या आणि आपल्या घरटय़ाच्या गप्पा मारत असताना माझ्या कॉलनीच्या उंबरठय़ावर असलेल्या शेतोडीतून पक्ष्यांचे भांडण्याचे, कलकलाटाचे आवाज कानावर आले. जवळ जाऊन पाहिलं तर दिसलं की सुगरण पक्षी मंडळ घरटी बनवून जोडी जुळवण्याच्या गडबडीत दिसलं. आजूबाजूने जाणाऱ्या लोकांना या दृश्याने काय वाटलं असेल हे माहीत नाही, पण माझं मन मात्र थेट शाळेच्या मराठीच्या पुस्तकात चक्कर मारून आलं. शाळेत सातवीत असताना शिकलेली बहिणाबाईंची जगप्रसिद्ध कविता ‘खोपा’ आठवली. अशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या ह्य बहिणाबाईचं निरीक्षण किती अचूक नी जबरदस्त होतं हे सुगरणीला घरटं बनवताना पहिल्यावर जाणवतं.

अरे खोप्यामधी खोपा,

सुगरणीचा चांगला,

देखा पिलासाठी

तिने झोका झाडाले टांगला!

लोक या ओळीतला काव्यात्मक साधेपणा पाहात असताना, माझ्यासारखे अभ्यासक मात्र त्यातल्या शास्त्रीय गोष्टीकडे पाहतात. या कवितेतली सुगरण म्हणजेच इंडियन बाया पक्षीण पक्की ढालगज असते, ती कधीच खोपा म्हणजे घरटं बांधत नाही. हे काम ती नर सुगरण पक्ष्यावर ढकलून देते. साधारण पावसाळा ऋतू हा सुगरण म्हणजेच बाया पक्ष्याच्या प्रजननाचा हंगाम समजला जातो. पाणवठय़ाच्या जवळ काटेरी उंच झाडांवर नर बाया पक्षी घरटी बनवायला सुरू करतात. वरून निमुळतं आणि मध्यभागी गोलाकार आकाराची दोन-चार घरटी हे नर अर्धी बनवून ठेवतात. मग आपल्या पंखांनी फर्टर्र फर्टर्र आवाज काढून ते मादीला बोलावतात. या  ‘बाया’ येतात, अध्र्या बनलेल्या घराचं इन्स्पेक्शन करतात, घर पसंत पडलं तर त्या नराबरोबर जोडी जमवतात. एकदा का बयेने होकार दिला की, हा नर पसंत पडलेलं घरटं पूर्ण करायच्या मागे लागतो. ही घरटी बनवायला साधारण साठ सेमी लांबीचे ओल्या गवताचे दोरे नर ओढून काढून आणतात. साधारण दीड-दोन फूट लांबीचं एक घर बनवायला बाया नराला साधारण पाऊण महिना लागतो नि यासाठी तो साधारण पाचशे खेपा मारतो. घराचं विणकाम करायला नर स्वतच्या चोचीचा वापर करतो. या घरटय़ाचा मध्यभाग फुगीर असतो जिथे अंडीपिल्ली राहतात. वाऱ्याने हे हलकं घर हलून पिल्लं खाली पडू नयेत म्हणून नर आपल्या चोचीने चिखलाचे बारीक बारीक गोळे करून विणलेल्या घराच्या आतून लावतात. या वजनाने घरटं वजनदार बनतं. किती विचार करतात ना? पक्षी निरीक्षकांनी नोंदी केल्या आहेत की सुगरण नर दक्षिण-पश्चिमेच्या दिशेने घरटी करतात म्हणजे मॉन्सून परतीचा त्रास घरटय़ाला होत नाही. निसर्गाने दिलेली चतुरबुद्धी नर घरटी बनवताना वापरतात. नेहमी काटेरी झाडं, पामच्या झाडावर किंवा पाणवठय़ावर ही घरटी बनवली जातात. अशाने भक्षकांचा त्रास घरटय़ास होत नाही. तरुण नवथर नर पाणथळीच्या जागी घरटी बनवायचा सराव करतात. सरावाने सफाईदारपणे बनवलेल्या घरात मादी दोन ते चार पांढरट रंगाची अंडी घालते. ही अंडी घातल्यावर साधारण अठरा दिवसानंतर त्यातून पिल्ले बाहेर येतात. मग सुरू होते मादी सुगरणीचं काम. ही पिल्लांच्या खानपानाकडे लक्ष देते, नर बाया पक्षी क्वचितच पिल्लांना भरवतो.

एकदा घर बनवून पिल्लांना जन्म दिल्यावर हे नर बाया पक्षी आपली आधीची अर्धवट सोडलेली घरटी पूर्ण करून पुन्हा तेच ‘एक बंगला बने न्यारा’ गीत गात नवीन माद्यांच्या मागे लागतात. इकडे या ढालगज सुगरणीही काही कमी नसतात. एकाच्या घरात दुसऱ्याची पिल्लं असाही मजेशीर प्रकार त्या करतात.. बहिणाबाईंनी हे कदाचित पाहूनच कवितेच्या ओळींत लिहून ठेवलंय,

‘सुगरीन सुगरीन

अशी माझी रे चतुर,

तिले जन्माचा संगाती

मिये गण्यागंप्या नर’

क्या बात है बाई, मान लिया आप को! एवढं मोठं सत्य लिहायला किती दीर्घ निरीक्षण केलं असेल त्यांनी?  कित्तीतरी लोकांनी खोपा पहिलेला असतो पण हा पक्षी पाहिलेला नसतो. प्लोसीडी कुटुंबातला सदस्य असलेला हा पक्षी आपल्या चिमणीसारखाच दिसतो. राखाडी भुरकट रंगाच्या या पक्ष्याचं तोंड काळं नि डोकं पिवळ्या रंगाचं असतं हाच काय तो फरक! अर्थात हा पिवळा रंग प्रजननाच्या काळात गडद होतो. बाकी तशीच भुरकट लहान म्हणजे आखूड टोकदार नि जाड चोच, तसेच लहान मातकट रंगाचे मजबूत पाय अगदी चिऊताईच जणू. याच लहानशा चोचीने हा पक्षी एवढं सुंदर घरटं बनवतो. घरटं बनवायला लागणारी ऊर्जा आणण्यासाठी हे खातात काय? लहान किडे, धान्य, फळं नि गवताच्या बियांच्या जोडीला कधीमधी फुलपाखरं, बेडकाची लहान पिल्लं, लहानसहान पालीही खातात बाया पक्षी. या पक्ष्याला घरटं विणताना बघणं म्हणजे अगदी चित्ताकर्षक असतं. साधारण तीस-चाळीस पक्ष्यांचा थवा एकत्र मिळून एक निवासी गृहसंकुल बनवतात. पित्याने मेहेनतीने विणलेल्या या सुबक बंगल्यात त्याची पिल्लं खूप दिवस राहात नाहीत. जेमतेम अठरा दिवसच इथे राहून ती भुर्र उडून जातात. बरं, भुर्र उडून जातात म्हणजे खूप दूर वगरे अजिबात नाही, तर दोन-तीन किमीच्याच परिसरात राहतात. म्हणजे एवढय़ा कमी काळासाठी ही सगळी विणविण नि जन्माचा शीण. गंमत म्हणजे सुगरण पक्ष्याने सोडून दिलेल्या घरटय़ात बऱ्याच वेळेस मुनिया पक्षी नांदतात.

या सगळ्या जन्मसोहोळ्यासाठी नर पक्षी किती कष्ट घेतो. बहिणाबाईंनी त्यांच्या बारीक नजरेने कवितेत नोंदवलंय की

खोपा ईनला ईनला,

जसा गिलक्याचा कोसा,

पाखराची कारागिरी

जरा देख रे मानसा!

खरंच, हल्लीच्या उंच गगनचुंबी इमारती बांधताना कित्ती काळजी घेतली जाते. या घरात कितीतरी र्वष राहायचंय म्हणून मजबुती, सोयी अशा अनेक गोष्टी पाहातो. काय काय नवीन बांधकाम पद्धती निघाल्यात आधुनिक म्हणता म्हणता. पण जे बहिणाबाईंनी जाताजाता सांगितलंय ते कधीही विचार करण्यासारखंच आहे, नाही का?

‘तिची उलूशीच चोच

तेच दात तेच ओठ

तुला देले रे देवाने

दोन हात दहा बोटं’

या दोन हातांचा काय काय वापर आपण करू शकतो हे आपल्यालाच माहीत. आता दिवाणखान्यात, खिडकीला लटकवण्यासाठी सुगरणीचा खोपा आणायचा विचार कराल, तेव्हा आसमंतातली ही चक्कर जरूर आठवा.
रुपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com