आसाम आणि मेघालय या दोन्ही राज्यांना जसा निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे तसाच पौराणिक कथांचा, स्थापत्यकलेचा वारसादेखील आहे. मात्र शासनाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच सकारात्मक नसल्याचं दिसून येतं.

lp57संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही आसामच्या सोनितपूर जिल्ह्यतील तेजपूरला पोहोचलो. सहाच्या सुमारास अग्निगडावरील प्रवेश बंद करण्यात येतो, त्यामुळे आम्ही हॉटेलवर न जाता प्रथम अग्निगड पाहावा, असे सर्वानुमते ठरले. गाडीने अग्निगडावर पोहोचलो तेव्हा अंधार पडत आलेला होता. ब्रह्मपुत्रेच्या तीरावरच्या टेकडीवरील अग्निगड म्हणजे तेजपूरमधील एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. अनेक फुलझाडांनी सुशोभित झालेलं. डोंगरमाथ्याच्या सपाटीवर मधोमध एका उंच स्तंभावर आपले राष्ट्रचिन्ह म्हणजेच अशोकस्तंभाची लक्षवेधक प्रतिकृती दिसते. त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या शिल्पात उषा व चित्रलेखाच्या मूर्ती दिसतात. तेजपूरबाबत अशी आख्यायिका सांगण्यात येते की, पौराणिक कथेतील बाणासुराची कन्या उषा हिला आपण सुंदर तरुणासोबत रममाण झाल्याचे स्वप्न पडले. सकाळी तिचा म्लान चेहरा पाहून सखी चित्रलेखाने तिला त्याबाबत विचारले तेव्हा तिने स्वप्नातील हकिगत सांगून त्या स्वप्नातील तरुणाला शोधून घेऊन येण्यास तिला सांगितले. आपल्या योग-सामर्थ्यांच्या बळावर शोणितपूरहून म्हणजेच तेजपूरहून चित्रलेखा द्वारकेस आली व तिने उषाच्या स्वप्नातील त्या सुंदर तरुणास अनिरुद्धास म्हणजेच श्रीकृष्णाच्या नातवास आपल्या ताब्यात घेतले आणि उषेसमोर हजर केले. अनिरुद्ध आणि उषा हे गांधर्व पद्धतीने विवाह करून एकत्र राहू लागले. हे श्रीकृष्णाला कळल्यानंतर श्रीकृष्ण व बाणासुर यांचे युद्ध झाले. त्यात बाणासुराची सर्व सेना मारली गेली. बाणमाता कोटरा व रुद्र यांच्या विनंतीवरून बाणासुरास जीवदान मिळाले. त्यानंतर बाणासुराने आपली कन्या उषा हिचा विवाह समारंभपूर्वक अनिरुद्ध याच्याबरोबर लावून दिला. उषा-अनिरुद्ध यांच्या अमर प्रेमकहाणीने हे तेजपूर प्रसिद्ध झाले. उषा-अनिरुद्धच्या प्रेमकहाणीचा इतिहास या अग्निगडावर मांडला आहे.
उषा, चित्रलेखा यांचे पुतळे, बेडूक तसेच शंकराचेही सुंदर शिल्प या ठिकाणी पाहावयास मिळते. याच अग्निगडावर खास बांधलेल्या टॉवरवरून भणाणणाऱ्या वाऱ्यात उभे राहून ब्रह्मपुत्रेचा प्रचंड विस्तार नजरेच्या टप्प्यात येतो. आम्ही तेथून ब्रह्मपुत्रा नदीचे विस्तीर्ण पात्र डोळ्यात साठवून घेतले.
आम्ही ज्या वेळी या अग्निगडावर आलो, त्या वेळी संध्याकाळचे साडेपाच वाजून गेलेले असल्याने अंधार पडलेला होता. परंतु अग्निगडावर करण्यात आलेल्या रोषणाईने अग्निगड न्हाऊन निघाला होता. चाफ्याच्या फुलांच्या सुगंधाने आसमंतही व्यापले होते.
डाव्या हाताच्या अंगाने अग्निगडाला वळसा घालत आम्ही खाली उतरू लागलो आणि काही अंतर पार करताच डाव्या बाजूला असलेल्या शिवाच्या ध्यानमग्न शिल्पाने आमचे लक्ष वेधून घेतले. शिवाला वंदन करून, अग्निगडाला वळसा घालून, आम्ही खाली आलो. आम्हाला खाली आलेले पाहताच त्या ठिकाणी असलेल्या मूर्ती विक्रेत्यांची गडबड सुरू झाली. ‘बिस टकामें कोईभी मूर्ती लेलो, बिस टका, बिस टका,’ म्हणून ते आमचे लक्ष वेधून घेऊ पाहत होते. आता थंडीचा जोर वाढत चालला होता, दिवसभरच्या प्रवासामुळे अंग आंबून आले होते, त्यामुळे आम्ही सरळ हॉटेलमध्ये जाणे पसंत केले.

Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई

lp58या प्रदेशात मुशाफिरी करताना मात्र एक गोष्ट जाणवली म्हणजे या ठिकाणची भूमी ही सुजलाम् सुफलाम् आहे. मुबलक पाण्यामुळे बारमाही बागायती पिके येतात. केळी, सुपारी, पोफळी व बांबूची वने तसेच राईची पिवळी धमक फुले असलेली शेतीही आपले ध्यान आकर्षून घेते. नेत्रसुखद असे हिरव्यागार शेतीचे दृश्य महामार्गाने प्रवास करताना आपल्या डोळ्यास निश्चितच समाधान देऊन जाते. मेघालय आणि आसाम ही जरी शेजारील राज्ये असली तरीही या ठिकाणी एक फरक प्रकर्षांने जाणवतो. तो म्हणजे, शिलॉँग हे संपूर्णपणे टेकडय़ावर असलेले शहर आहे. तर तेजपूर हा पंजाब, चंदिगडप्रमाणे, सपाट मैदानी प्रदेश आहे. शिलाँगमधील ठेंगणी ठुसकी प्रजा व तिथल्या सुंदर मुली तेजपूरमध्ये दिसून येत नाहीत. या भौगोलिक प्रदेशातील असे फरक आपणास पदोपदी जाणवत राहतात. तसेच या ठिकाणी सायकल रिक्षा चालविणारा अत्यंत गरीब असा वर्गही मोठय़ा प्रमाणावर दिसून येतो. दोन्ही राज्ये मात्र दहशतवादाच्या प्रभावाखाली असल्याने लष्कराचा वावर हेच काय ते दोघातील साम्य.

lp59विचारांच्या तंद्रीत हॉटेलवर आलो. सरळ ताणून दिली. उद्या सकाळी बामुनी हिल्सवरील मंदिर पाहून तवांगच्या दिशेने कूच करायचे होते. सकाळी नऊच्या सुमारास तवांगला जाण्यासाठी आम्ही तेजपूर सोडले. आजचा मुक्काम सुमारे २०० कि.मी. वरील दिरांग गावी होणार होता. त्यापूर्वी तेजपूरमधील ब्रह्मपुत्रा नदीच्या तीरावर असलेले बामुनी हिल्सवरील मंदिर आम्हाला पाहायचे होते. हॉटेलमधून निघून सुमारे दहा मिनिटांतच आम्ही बामुनी हिल्स म्हणून चुकून तिथल्याच एका छोटय़ा टेकडीवर असलेल्या भैरवी मंदिरात पोहोचलो. या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या चढून जाव्या लागतात. या टेकडीवर विस्तीर्ण अशी वटवृक्षांची वृक्षराजी आहे. या ठिकाणी हे छोटेसे भैरवी म्हणजेच दुर्गामातेचे मंदिर आहे. दर्शनासाठी मंदिर अद्याप उघडलेले नसल्याने आम्हाला दुर्गामातेचे दर्शन घेता आले नाही. या दुर्गामातेच्या दर्शनासाठी बाणासुराची कन्या नेहमी येत असल्याची आख्यायिका आहे.
मंदिराच्या डाव्या बाजूला नदीच्या पात्राकडे आलो तोच, आमच्या समोर बॅ बॅ करत काही बकऱ्या आल्या. अगदी ठेंगण्या ठुसक्या. महाराष्ट्रात किंवा इतर प्रांतांतील बकऱ्या या बकऱ्यांपेक्षा उंचीच्या असतात. परंतु येथल्या बकऱ्यांची उंची फारच कमी होती. कहर म्हणजे इथल्या बकऱ्यांना बोकडाप्रमाणे दाढी होती. बोकड बकऱ्याप्रमाणे भासत होते आणि बकरी बोकडाप्रमाणे. हे सारे पाहून आमची मात्र चांगलीच करमणूक झाली. या बकऱ्यांसोबत आम्ही फोटोसेशनही केले, त्यांनीही फोटोसाठी आम्हाला मस्तपैकी पोझ दिल्या.
त्यानंतर बामुनी हिल्स गाठायचे होते. इ.स. १० ते १२ व्या शतकातील ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरचे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून गणले गेलेले भगवान विष्णूंचे पंचायतन मंदिर एका टेकडीवर आहे. गेटवर कोणीही पहारेकरी नव्हता. फक्त पुरातत्त्व खात्याचा एक बोर्ड मात्र लक्ष वेधून घेत, जणू आमचीच वाट पाहत उभा होता. गेटमधून आत शिरताच समोरचे दृश्य पाहून आम्हाला धक्काच बसला. कारण, त्या ब्रह्मपुत्रेच्या काठावर असणाऱ्या टेकडीवरील विष्णूच्या पंचायतन मंदिर समूहाचे नुसतेच भग्नावशेष आमच्या समोर विखुरलेले होते. या ठिकाणी भारतीय पुरातत्त्व खात्याच्या लावलेल्या माहिती फलकानुसार, बामुनी टेकडीवरील सर्वात उंच जागी विष्णूचे मंदिर असावे व त्याच्या चारही बाजूला लहान मंदिराची निर्मिती झाली असावी. तसेच या ठिकाणी असलेल्या मुख्य मंदिराच्या कीर्ती स्तंभावर विष्णूचे दहा अवतार असल्याचे माहिती फलकावर नमूद करण्यात आलेले होते. खरे तर या मंदिरांचा निर्माण काळ इ.स. १० ते १२ व्या शतकापर्यंत मागे जातो. तद्नंतरच्या मुस्लीम राजवटीच्या काळात या मंदिराचा विध्वंस केला गेला असण्याचीही शक्यता आहे. येथील पुरातत्त्व खात्याच्या माहिती फलकावर मंदिराचे भग्नावशेष असल्याचा उल्लेख आहे. परंतु मंदिर कशामुळे भग्न झाले याबद्दल काहीच माहिती मिळत नाही. गुगलवर शोधण्याचाही मी प्रयत्न केला. परंतु तेथेही निराशाच पदरी पडली.
ज्या-ज्या वेळी मी बामुनी हिल्स असे टाईप करायचो त्या-त्या वेळी त्या विभागातील हॉटेल संगणकाच्या पडद्यावर डौलाने उभी असलेली दिसायची. बामुनी हिल्सवरील मंदिराबाबत अगदी त्रोटकच माहिती समोर यायची. आज या ठिकाणी अस्तित्वात असलेले मंदिराचे भग्नावशेष पाहता आपल्या सरकारची तसेच पुरातत्त्व खात्याची इतिहासाप्रति असलेली अनास्थाच दिसून येते.
काहींच्या म्हणण्यानुसार ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे हे मंदिर उद्ध्वस्त झाले आहे, तर काहींच्या म्हणण्यानुसार परकीय आक्रमणात हे मंदिर जमीनदोस्त झाले. काहीही असो, पण या टेकडीच्या माथ्यावरील हे मंदिर कधीकाळी या टेकडीची शान असेल. या मंदिरात कधीकाळी अखंड घंटानाद होत असेल, धूप अगरबत्तीच्या सुंगधाने इथला आसमंत व्यापला असेल, या मंदिराच्या सान्निध्यात आल्यावर कित्येकांच्या आयुष्याचे सोने झाले असेल. पण आज या मंदिराची अवस्था पाहिली तर काय दिसते, तर जागोजागी मंदिराच्या विखुरलेल्या शिळा आणि त्याचे भग्नावशेष, उन्हातान्हात पडून असेलेले. हे पुरातन मंदिर या भूतलावरील किंवा देशाच्या एका राज्यातील नुसते मंदिर नसून या देशाची सौंदर्यस्थळ आहेत. या देशाचा अध्यात्माचा आत्मा आहेत. ही सौंदर्यस्थळे, हा अध्यात्माचा आत्मा, या घडीला जपणे आवश्यक आहे, त्याचे जतन होणे आवश्यक आहे. परंतु, आपल्या देशातील पुरातत्त्व खात्याला त्याच्याशी काही देणे-घेणे नसावे. म्हणूनच, प्राचीन अशा या मंदिराकडे, ना येथील शासनाचे लक्ष आहे, ना पुरातत्त्व खात्याचे.
हे सारे भग्नावशेष पाहताना प्रश्न पडतो, या मंदिरातील भगवान विष्णूची मूर्ती कोठे असेल? त्या मूर्तींचे काय झाले असेल? याबद्दल कोणालाही काहीही सांगता येत नाही. मी कर्नाटकातील हळेबिडू मंदिरे, मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरे, केरळातील पद्मनाभन तसेच इतर अनेक पुरातन मंदिरे पाहिली आहेत. पण इतिहासाबाबत इतकी अनास्था क्वचितच कुठल्या राज्यात दिसून येत असेल. आम्ही त्या माहिती फलकाकडून उजव्या हाताच्या बाजूने तसेच वर निघालो आणि मुख्य मंदिराच्या जागेपाशी येऊन पोहोचलो. इथपर्यंत पोहोचायच्या पायवाटेच्या दुतर्फाही मंदिराच्या शिल्पांचे भग्नावशेष विखुरलेल्या अवस्थेत पडल्याचे दिसून आले. मुख्य मंदिराच्या जागेवर तर एकावर एक रचून ठेवलेले मंदिराचे वेगवेगळे भाग/शिल्प दिसून आले. त्यात आम्हाला कीर्ती स्तंभाचा अर्धवट तुटलेला भाग दिसला. त्यावर भगवान विष्णूचे पाच अवतार दिसून आले. भगवान विष्णूच्या राहिलेल्या पाच अवताराचा कीर्ती स्तंभाचा उर्वरित भाग कदाचित त्या ढिगाऱ्याखाली असावा. अशा प्रकारे मुख्य मंदिराच्या जागी तसेच त्या मंदिराच्या पाठीमागे, तसेच संपूर्ण टेकडीवर, अनेक भग्नावशेष ऊन-पावसाचा मारा झेलत आजही पडलेले दिसून येतात. हे सारे भग्नावशेष पाहून आम्ही विषण्ण मनाने खाली येऊ लागलो तसे आम्हाला उजव्या बाजूला एक अर्धवट खोदकाम दिसले. तेथेही एकावर एक रचलेल्या मंदिराचे अवशेष दिसून आले. हे खोदकाम अर्धवट स्थितीत आजही तसेच पडून आहे. जणू पुरातत्त्व खात्याच्या तीव्र (?) इच्छाशक्तीचेच येथे दफन झाल्याचे दिसून येते.
काही जुनाट वृक्ष आजही त्या ठिकाणी पहारा देत मंदिराच्या रक्षकाची भूमिका बजावताना दिसतात. कोणी मानव प्राणी त्याचे रक्षण करताना दिसत नाही. उघडय़ावर पडलेल्या शेकडो सुंदर शिल्पाकृती जणू काळाच्या ओघात लुप्त होण्याचीच वाट पाहत असाव्यात असेच वाटत राहते. आपण ते सारे आत्मीयतेने न्याहाळतो, त्याच्या भव्यतेची कल्पना करतो, काही क्षण मनात हळहळतो, सभोवार नजर फिरवतो, ब्रह्मपुत्रेच्या विशाल पात्राशेजारी जणू हे मंदिर ब्रह्मपुत्रेच्या रूपाने अश्रू ढाळत असल्याचाच भास आपणास होत राहतो आणि आपण विषण्ण मनाने माघारी फिरतो.
आम्ही खाली आलो तेव्हा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या दुकानासमोर एक आठ-दहा वर्षांंची चुणचुणीत चिमुरडी बसलेली होती. आम्हा साऱ्यांना पाहताच तिने आम्हाला विचारले, ‘‘आप कहाँसे आये हो?’’ आमच्यापैकी एकाने उत्तर दिले, ‘‘मुंबईसे आये है.’’ चटकन् ती चिमुरडी उत्तरली, ‘‘मुझे दीपिका को मिलना है, बडम्ी होकर मैं एक दिन हवाईजहाज से दीपिका को मिलने के लिये मुंबई आऊंगी.’’ एवढीशी चिमुरडी, पण तिची इच्छाशक्ती इतकी दांडगी की ती मोठी होऊन दीपिकाला भेटायला मुंबईला येणार.
मनात आले, या चिमुरडीची इच्छाशक्ती इतकी दांडगी आहे तर या बामुनी हिल्सवरच्या मंदिराचे पुनर्निर्माण करण्याची इच्छाशक्ती इथले सरकार का दाखवू शकत नाही? पण निव्वळ राजकारणात मग्न असणाऱ्या इथल्या सरकारकडून अशा अपेक्षा का आणि कशाकरिता कराव्यात?