भाजपाचा विजयरथ दौडतोच आहे. हा वारू रोखायचा कसा हा प्रश्न सर्वच विरोधकांच्या मनात आहे. मात्र ही वेगवान दौडच दरखेपेस विरोधकांना भुईसपाट करत पुढे जाते आहे. नेमके काय चुकते आहे, याची कल्पना अद्याप विरोधकांना आलेली नाही. मात्र उत्तर काय असू शकते याची चुणूक आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये देण्याचे काम केले आहे. भाजपा आणि आम आदमी पार्टी या दोघांच्याही यशामध्ये काही बाबी समान आहेत. पैकी पहिली आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोन्हीही पक्ष आठवडय़ाचे सातही दिवस २४ तास राजकारण करणारे आहेत. गेल्या खेपेस पंजाबमध्ये मिळालेल्या २० जागांवर समाधान न मानता ‘आप’ने तिथले समाजकारण सुरूच ठेवले आणि निवडणुकांच्या निमित्ताने राजकारण ढवळून काढले. ‘आप’च्या पंजाबातील सत्तासंपादनामागे नवी दिल्लीतील कर्तृत्वाची पुण्याई आहे. मोहल्ला क्लिनिक, सामान्यांसाठी रुग्णालये आणि उत्तम शाळा हे ‘आप’चे देणे असून तेच आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी पंजाबला दिले. शिवाय इतरही आश्वासने दिली. मात्र केजरीवाल यांची सध्याची प्रतिमा तरी आश्वासने पूर्ण करणारा, गरीबांसाठी झटणारा आणि त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहोचवणारा राजकीय नेता अशी आहे. हेच समीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशाच्या बाबतीत योगी आदित्यनाथ यांना लागू आहे. व्यवस्थेमध्ये सर्वात तळाशी असलेल्या नागरिकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचेल हे त्यांनी कटाक्षाने पाहिले. परिणामी कोविडकाळात स्थलांतरितांचे हालच उत्तर प्रदेशात अधिक झाले शिवाय आरोग्य व्यवस्थेचाही बोजवारा उडालेला होता. पण याच कोविडकाळात मोफत मिळालेले रेशन मात्र मतदारांना लक्षात राहिले. भाजपाच्या पाच वर्षांच्या सत्तेपूर्वी ‘गुंडपुंडा’चे राज्य असा उत्तर प्रदेशचा परिचय होता. गुंडांवर ठेवलेले नियंत्रण आणि वचक (बुलडोझर हे त्याचेच प्रतिक), महिलांना मिळालेली सुरक्षा हे मुद्दे योगींविरोधातील सर्व मुद्दय़ांपेक्षा महत्त्वाचे आणि निर्णायक ठरले. याच मुद्दय़ांनी त्यांना उत्तर प्रदेशची सत्ता सलग दुसऱ्यांदा मिळवून देण्याचा अनोखा विक्रमही केला. भ्रष्टाचाराला विरोध आणि स्वच्छ प्रशासन या मुद्दय़ावर तर २०१४ साली मोदींना बहुमताच्या बळावर सत्ता हाती आली. आजही एकवेळ भाजपावर विश्वास नाही मात्र मोदींवर १०० टक्के विश्वास ठेवणारे अनेक मतदार आहे. मोदींनी त्यांची ही प्रतिमा परोपरीने जपली आणि जनतेसमोर राहील याची काळजीही घेतली. विकासपुरुष हे बिरूद मिरवण्याबरोबरच तो विकास प्रत्यक्षात नजरेलाही दिसेल हेही काटेकोरपणे पाहिले. मग ते काशी विश्वनाथ कॉरिडोरचे काम असो अथवा द्रुतगती महामार्गाचे बांधकाम किती उच्च प्रतीचे आहे हे दाखविणारी त्याच महामार्गावर उतरणारी लढाऊ विमाने असोत. कामे पूर्ण केली आहेत, हे मतदारांना दिसणे महत्त्वाचे असते. कार्यालयामध्ये केवळ चांगले काम करणे केवळ महत्त्वाचे नसते तर आपण चांगले काम करतो आहोत हे आपली बढती हाती असलेल्या बॉसला अर्थात वरिष्ठांना कळणे जसे महत्त्वाचे तसेच मतदारांना कळणेही! या सर्व गोष्टी भाजपा आणि आप यांनी काटेकोरपणे पाळल्या. आता या विजयानंतर चर्चा सुरू आहे ती राष्ट्रीय स्तरावर वेगळा चांगला पर्याय म्हणून समोर आलेल्या आम आदमी पार्टीची. त्यामुळे आता अरिवद केजरीवाल हे विरोधकांच्या एकजुटीचे नेतृत्व करणार का, हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. तर आपच्या कार्यकर्त्यांनी तशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र राजकीय गणिते एवढी सोपी आणि सरळ कधीच नसतात. मात्र या निवडणुकांनी एक गोष्ट सिद्ध केली ती म्हणजे आप हा भाजपा पर्याय नसेल कदाचित; पण काँग्रेसला मात्र तो पर्याय ठरू शकतो, एवढे निश्चित!

vinayak.parab@expressindia.com