मेष तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामे आहेत ती सप्ताहाच्या सुरुवातीलाच करा. जनसंपर्क, पत्रव्यवहार वगैरे गोष्टींमध्ये अविचार उपयोगी पडणार नाही. व्यापार-उद्योगात कोणाला कसलेच आश्वासन देऊ नका. नोकरीमध्ये घाई-गडबडीत वरिष्ठ तुमच्याकडून एखादे आश्वासन घेतील. त्यामुळे कामाचा ताण वाढेल. हितशत्रूंच्या कारवायांकडे नजर असू दे. घरामध्ये जोडीदाराच्या स्वास्थ्याकडे लक्ष ठेवा. तरुणांनी विवाहाचे निर्णय पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय घेऊ नयेत. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या बातमीवर विश्वास ठेवू नये.

वृषभ एखादे काम जेव्हा तुम्ही हातामध्ये घेता किंवा त्याचा श्रीगणेशा करता त्यापूर्वी बरेच विचारमंथन आणि नियोजन करण्यासाठी वेळ घेता, पण योग्य वेळ आल्याशिवाय त्याची वाच्यता तुम्ही करत नाही. आता मात्र तुमचे बेत तुम्ही इतरांना उघडपणे बोलून दाखवाल. व्यापार-उद्योगात कामाचा विस्तार करण्याचा संकल्प असेल. त्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक आणि इतर नियोजन झालेले असेल. पण आयत्या वेळी त्यात फेरफार होतील. घरामध्ये तुमची हुकूमशाही तुम्ही गाजवल्यामुळे इतरांना राग येईल.

मिथुन राश्याधिपती बुध दशमस्थानात प्रवेश करणार आहे. तो तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्मी निर्माण करणार आहे. दशमस्थानातील रवी प्लुटोशी केंद्रयोग आणि मंगळाशी प्रतियोग करेल. व्यवसाय-उद्योगामध्ये नवीन अर्थिक वर्षांकरता काही बेत तुम्ही यापूर्वीच आखून ठेवले असतील. त्याची कार्यवाही करण्याची तुम्हाला घाई असेल. नोकरीमध्ये कामाच्या स्वरूपामध्ये आणि कदाचित तुमच्या कार्यक्षेत्राच्या स्थळामध्ये बदल होऊ शकेल. घरातील जबाबदारी पार पाडण्यात तुम्ही गर्क राहाल.

कर्क बुध राशीच्या भाग्यस्थानामध्ये येणार आहे. रवी तेथेच आहे. याच स्थानात रवी हर्षल युती होईल. रवीचा प्लुटोशी केंद्रयोग आणि मंगळाशी प्रतियोग होणार आहे. तुमची रास ही चररास मानली जाते. म्हणजेच एका स्थितीमध्ये तुम्ही जास्त काळ राहू शकत नाही. काही काळ गेल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये बदल हवा असतो. याची प्रचीती तुमच्या निर्णयातून आणि कृतीतून येईल. नोकरीमधल्या एखाद्या बेचव कामातून तुम्ही तुमची सुटका करून घ्याल. घरामध्ये वाढणारे खर्च नियंत्रणामध्ये आणण्यासाठी ठोस उपाय कराल.

सिंह बुध राशीच्या अष्टमस्थानात प्रवेश करेल. त्यापूर्वी त्याचा शनीशी त्रिकोण होईल. रवी हर्षलशी युती, प्लुटोशी केंद्रयोग आणि मंगळाशी प्रतियोग करणार आहे. कळतं पण वळत नाही अशी तुमची स्थिती असेल. सर्व कामे व्यवस्थितपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडायची असे तुम्ही ठरवाल, पण आयत्या वेळेला तुम्हाला त्याचा विसर पडेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रामध्ये आजूबाजूच्या व्यक्ती काय बोलतात याला महत्त्व न देता सत्य परिस्थितीची माहिती मिळवा. प्रकृतीकडे लक्ष ठेवा.

कन्या राश्याधिपती बुध सप्तमस्थानात प्रवेश करणार आहे. त्यापूर्वी त्याचा शनीशी त्रिकोण होईल. तेथेच असलेला रवी हर्षलाशी युती, प्लुटोशी केंद्रयोग आणि मंगळाशी प्रतियोग करेल. हे सर्व ग्रहमान म्हणजे मोठय़ा बदलांची नांदी आहे. विशेष म्हणजे प्रयत्न करूनही तुम्ही त्यांना थांबवू शकणार नाही आणि शेवटी कालाय तस्मै नम:। असे उद्गार तुमच्या तोंडून ऐकायला मिळतील. व्यापार-उद्योगामध्ये पैशाची आवक मौल्यवान वाटेल. नोकरीमध्ये पाटय़ा टाकण्याचा विचार मनात येईल. विद्यार्थ्यांनी मन स्थिर ठेवावे.

तूळ रवी हर्षलाची युती षष्ठस्थानात होईल. बुध तेथेच प्रवेश करणार आहे. रवीचा प्लुटोशी केंद्रयोग आणि मंगळाशी प्रतियोग होईल. ग्रहमान खडतर आहे, त्यामुळे तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुमच्या हातून थोडी जरी चूक झाली तर त्याला माफी नाही. कारखानदारांनी नवीन मशिनरी खरेदी करण्यापूर्वी बाजारातील तंत्रज्ञानावर लक्ष ठेवावे. हातातील पैसे जपून वापरावेत. नोकरीमध्ये तुमचे काम बिनचूक करा. घरामध्ये नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या वागण्या-बोलण्याचा विचार करू नका.

वृश्चिक रवी हर्षलाशी युती पंचमस्थानात होईल. त्यानंतर रवी प्लुटोशी केंद्रयोग आणि मंगळाशी प्रतियोग करेल. बुध चतुर्थस्थानात येईल. त्याचा शनीशी त्रिकोण होईल. ज्या बदलांची किंवा संक्रमणाची नांदी यापूर्वीच झाली होती त्याची चिन्हे आता प्रकर्षांने दिसू लागतील. व्यापार-उद्योगामध्ये तुमच्या कल्पनाशक्तीला आणि कृतिशीलतेला भरपूर वाव असेल. परंतु त्याची कार्यवाही करणे तितकेसे सोप नसेल. नोकरीमध्ये वरिष्ठ वेगळीच जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. ती पद्धती समजायला वेळ लागेल.

धनू रवी प्लुटोशी केंद्रयोग आणि मंगळाशी प्रतियोग करणार आहे. बुधाचा शनीशी त्रिकोणयोग होईल. कोणत्याही नवीन कामाविषयी तुम्हाला जबरदस्त आकर्षण असते. पण बऱ्याच वेळेला तुमची परिस्थिती तेरडय़ाचा रंग तीन दिवस अशी होते. एवढी खबरदारी घेतली तर सर्वकाही ठीक असेल. व्यापार-उद्योगामध्ये हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. कारखानदारांनी मोठी गुंतवणूक घाईने करू नये. नोकरीमध्ये चालू असलेल्या काम कदाचित गुंतागुंतीचे असेल. विद्यार्थ्यांनी अतिसाहस करु नये.

मकर मंगळ हर्षलाशी प्रतियोग आणि प्लुटोशी केंद्रयोग करणार आहे. बुध राशीच्या तृतीय-स्थानात प्रवेश करेल. त्याचा शनीशी त्रिकोण होईल. प्रगतीकरता सतत धडपड करणारी तुमची रास आहे. नवीन आर्थिक वर्षांकरता काही महत्त्वाकांक्षी योजना तुम्ही यापूर्वी आखून ठेवलेल्या असतील. तर त्याला आता मुहूर्त लाभेल. हे सर्व खर्चीक असेल. त्यामुळे पैशाची सोय करावी लागेल. संस्थेच्या गरजा आणि वरिष्ठांच्या सूचना बदलत राहिल्यामुळे कोणत्या कामाला महत्त्व द्यायचे याविषयी मनात साशंकता असेल.

कुंभ धनस्थानातील रवी हर्षलाशी युती, मंगळाशी प्रतियोग आणि प्लुटोशी केंद्रयोग करणार आहे. राशीतील बुध शनीशी त्रिकोण करून नंतर लगेचच धनस्थानात प्रवेश करेल. हे ग्रहमान तुम्हाला थोडेसे कोडय़ात टाकणारे आहे. जे काम चालू आहे त्यामध्ये काहीतरी बदल व्हावा अशी तुमची तीव्र भावना असेल. व्यापार-उद्योगात ज्या नवीन योजना साकार करायच्या आहेत त्याविषयी निष्णात व्यक्तीशी सल्लामसलत करा. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींशी तात्त्विक प्रश्नांवरून मतभेद होतील. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेला धाडस करू नये.

मीन बुध आता तुमच्याच राशीत प्रवेश करेल. रवीचा हर्षलशी युतीयोग, प्लुटोशी केंद्रयोग आणि मंगळाशी प्रतियोग होणार आहे. बुध आणि शनीमध्ये त्रिकोण होईल. स्वभावात तुम्ही चंचल आहात. एखादी गोष्ट तुम्ही ठरविता आणि काही दिवस त्याचा पिच्छाही पुरवता. नंतर क्षुल्लक कारणावरून त्यामध्ये बदल करता. व्यापार-उद्योगामध्ये भागीदारी किंवा मैत्रीकराराचे प्रस्ताव तुमच्यापुढे ठेवले जातील. परंतु त्याचा नीट अभ्यास केल्याशिवाय त्याला संमती देऊ नका.