01vijayमेष सर्व ग्रहमान तुम्हाला अनुकूल असल्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळीच ईर्षां निर्माण होईल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामातून पसे हाती पडल्यामुळे तुमचे मनोधर्य वाढेल. महत्त्वाची कागदपत्रे किंवा माहिती उपलब्ध झाल्याने व्यवसायातील अडून राहिलेली कामे पूर्ण करू शकाल. नोकरीमध्ये तुमच्या आवडीच्या कामामध्ये तुम्हाला सहभागी करून घेतल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. घरामधला माहोल उत्साहवर्धक असेल. मुलांच्या प्रश्नात तुम्ही धाडसाने एखादा तोडगा शोधून काढाल.

वृषभ ग्रहमान तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला पूरक असल्यामुळे तुमच्या अनेक सुप्त इच्छांना वाव मिळणार आहे. व्यापार-उद्योगात बरेच दिवस ज्या संधीची वाट बघत होतात ती संधी समोर दिसू लागल्यामुळे तुमची अहोरात्र मेहनत करण्याची तयारी असेल. नोकरीमध्ये एखादे काम मनामध्ये आले की ते हाताखालच्या व्यक्तींनी ताबडतोब पूर्ण करायला हवे, असा तुमचा आग्रह असेल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये प्रत्येक निर्णयात आपला पुढाकार असला पाहिजे असा तुमचा आग्रह असेल. त्याचा इतरांना थोडा त्रास होईल.

मिथुन एखादे मोठे उद्दिष्ट तुमच्यापुढे असेल. ते साध्य करण्याकरिता बरेच कष्ट घेण्याची तयारी ठेवा. व्यापार-उद्योगामधे हातातोंडाशी आलेली काही महत्त्वाची कामे तांत्रिक कारणांमुळे किंवा कायदेशीर अडचणींमुळे अडकून पडलेली असतील तर त्यावर मार्ग निघेल. नोकरीमध्ये एखाद्या लांबवलेल्या कामामध्ये तुम्ही थोडीशी बंडखोरी कराल. त्यामध्ये वरिष्ठ तुमच्या अटी मान्य करतील. घरामध्ये पूर्वी ठरलेले एखादे शुभकार्य पार पडेल. नवीन जागा खरेदी करण्याचा निर्णय सर्वानुमते निश्चित केला जाईल.

कर्क जी संधी तुमच्यापुढे आहे त्याचा ताबडतोब उपयोग करून घ्या. व्यवसाय-उद्योगात हाती घ्याल ते तडीस न्याल असा एकंदर तुमचा बाणा असेल. तुमचे एखादे स्वप्न साकार करण्याकरिता तुम्हाला बराच वेळ आणि पसे खर्च करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी खास कामगिरीनिमित्त वरिष्ठ आणि तुमची संस्था तुम्हाला विशेष अधिकार प्रदान करेल. नवीन नोकरीचे काम ताबडतोब करा. घरामध्ये तुमचा सल्ला आणि सक्रिय मदत याचे महत्त्व इतरांना सुरुवातीला पटणार नाहीत.

सिंह ज्या कामात अडचणी किंवा बरेच अडथळे आहेत अशाच कामावर लक्ष केंद्रित करून तुम्ही त्यावर बाजी माराल. व्यवसाय-उद्योगात प्रतिस्पध्र्याच्या एक पाऊल पुढे जाल. मोठय़ा प्रोजेक्टला भांडवल मिळविण्याकरिता प्रयत्न कराल. नोकरीमध्ये कामाच्या स्वरूपात बदल झाल्यामुळे तुमची गरसोय तर दूर होईलच, शिवाय जादा सवलती मिळण्याची शक्यता निर्माण हाईल. घरामध्ये ‘मी म्हणेन ती पूर्व दिशा’ या तुमच्या वृत्तीला खतपाणी मिळेल. प्रतिष्ठा वाढविणारे एखादे चांगले कार्य संपन्न होईल.

कन्या एकेकाळी ज्या प्रश्नांनी तुम्हाला गोंधळात टाकलेले होते ते प्रश्न हातात घेऊन त्याचा फडशा पाडायचा तुम्ही ठरवाल. व्यवसाय-उद्योगात गिऱ्हाईकांची ये-जा चांगली असल्यामुळे भरपूर काम करावेसे वाटेल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक मशिनरी खरेदी करण्याचा संकल्प कराल. नोकरीमध्ये महत्त्वाच्या कामगिरीकरिता तुमची निवड झाल्यामुळे तुम्हाला जादा अधिकार प्रदान केले जातील. अपेक्षित जागी बदली होईल. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. इतरांना तुमचा आदर वाटेल.

तूळ तुमच्यापुढे कोणतेही प्रश्न असले तरी त्याची काळजी करू नका. कारण ग्रहमान आता हळूहळू सुधारणार आहे. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात ज्या समस्यांनी तुम्हाला पूर्वी हुलकावणी दिली होती त्या संधी पुन्हा एकदा नव्या रूपात क्षितिजावर दिसू लागतील. नोकरीमध्ये संस्थेमध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू होण्याची नांदी होईल. वरिष्ठ त्यामध्ये तुम्हाला मोठय़ा विश्वासाने सहभगी करून घेतील. बेकार व्यक्तींना एखादे काम मिळेल. घरामधल्या समस्येवर सर्व जण बसून एखादा तोडगा शोधून काढतील.

वृश्चिक मनामध्ये तुम्ही अनेक बेत ठरवाल. ते साकार करण्याकरिता तुम्ही सर्वार्थाने सिद्ध झालेले असाल. व्यापार-उद्योगात तुमचे हितचिंतक आणि सभोवतालच्या व्यक्ती तुम्हाला मदत करायला तयार असतील, पंरतु आíथक प्रश्नात कोणतेच साहाय्य करू शकणार नाहीत. नोकरीमध्ये चालू असलेल्या कामात बराच वेळ जाईल. त्याव्यतिरिक्त वरिष्ठांनी नवीन कामे तुमच्यावर सोपवल्याने तुम्ही कोडय़ात पडाल.  घरामध्ये तुमचा कारभार नीटनेटका असतो, पण इतरांनी तसे न वागल्याने तुम्हाला राग येईल.

धनू एखाद्या कामाला अचानक चांगली कलाटणी मिळाल्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा नव्या दमाने काम करायला सुरुवात कराल. व्यापार-उद्योगामध्ये विनाकारण लांबलेली कामे तुम्हाला ‘धक्का स्टार्ट’ या पद्धतीने हाताळावी लागतील. काही नवीन हितसंबंध प्रस्थापित होण्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरीमधल्या कामात फेरफार करून पाहिजे असतील तर तशी मागणी वरिष्ठांपुढे ठेवा. एखादे किचकट काम संपल्याने बरे वाटेल. घरामध्ये तुमच्या जमून राहिलेल्या भावनांना मोकळी वाट मिळाल्यामुळे बरे वाटेल.

मकर भरपूर काम करून त्याचे श्रेय ताबडतोब मिळवण्याकरिता तुम्ही प्रयत्नशाल राहाल. व्यापार-उद्योगात सर्व काही चांगले असून स्पर्धक आपल्यापुढे जातील या भीतीने तुम्ही तुमचा पवित्रा बदलून टाकाल. नोकरीमध्ये विशेष कामगिरीकरिता तुमची निवड झाली असेल तर तुमचे कष्ट प्रमाणाबाहेर वाढतील पण त्यामध्येही तुम्ही एक वेगळा आनंद अनुभवाल. तुमच्या कामामुळे वरिष्ठ खूश होतील. घरामध्ये एखादी महत्त्वाची बातमी कळल्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्यावरच केंद्रित होईल.

कुंभ एखाद्या घरगुती प्रश्नात बराच विचार करून किंवा एखादी शक्कल लढवून तुम्ही मार्ग शोधण्याचा प्रयत्न कराल. व्यापार-उद्योगात काही कारणाने मरगळ आली असेल तर ती घालविण्या-करिता एखादे आव्हानात्मक काम हाती घ्याल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी तुमची कामाची पद्धत जर बदलली असेल तर त्यातले मर्म तुम्हाला कळाल्यामुळे वेग यायला सुरुवात होईल. नवीन नोकरीच्या कामाला गती मिळेल. घरामध्ये इतर वेळेला शांत असणारे इतर तुम्ही एखाद्या प्रश्नात खडबडून जागे व्हाल. विचारापेक्षा कृतीवर भर द्या.

मीन महत्त्वाच्या कामासंबंधी बोलणी शेवटच्या टप्प्यात येऊन अर्धवट राहिली असतील तर त्याला आता वेग मिळेल. व्यवसाय-उद्योगात एका महत्त्वाच्या संक्रमणाच्या टप्प्यावर आपण आलो आहोत, याची तुम्हाला जाणीव होईल. जी संधी तुमच्यापुढे आहे त्याचा तातडीने फायदा उठवाल. नोकरीमध्ये एखाद्या महत्त्वाच्या आणि जोखमीच्या जागेवर बदली होण्याची शक्यता निर्माण हाईल. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या बाबतीत जर काही चिंता असेल, तर त्यात चांगला मार्ग निघू शकेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader