01vijayमेष प्रश्न कोणताही असो, त्याला न डगमगता तुम्ही मोठय़ा हिमतीने एखादा मार्ग शोधून काढता. व्यापार-उद्योगात जे आपल्याजवळ नाही त्याचा विचार करत न बसता, जे आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा उठविता येईल, याचा विचार कराल. नोकरीमध्ये तुमच्या कल्पक बुद्धीचा आणि कार्यक्षमतेचा एखादे अवघड काम पूर्ण करायला उपयोग होईल. नवीन नोकरीच्या कामात यशाविषयी खात्री वाटू लागेल. घरामध्ये जी गोष्ट इतरांना जमली नाही ती हातात घेऊन तुम्ही स्वकष्टाने पार पाडाल. 

वृषभ ज्या कामामध्ये काही मुद्दय़ांवरून अडथळे आले होते ते संपुष्टात आणण्याकरिता तुम्ही केलेले प्रयत्न आता चांगले फळ देऊ लागतील. व्यवसाय-उद्योगात एखाद्या नवीन करारासंबंधी बोलणी झाली असतील तर त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचा मूड बघून तुमची एखादी मागणी त्यांच्यापुढे ठेवायला हरकत नाही. नवीन नोकरीत थोडीशी तडजोड करावी लागेल. घरामध्ये एखादी गोष्ट सुरुवातीला तुम्ही शांतपणे समजून सांगाल, पण त्यांनी ती ऐकली नाही तर रौद्र रूप धारण कराल.

मिथुन सर्व ग्रहमान ‘मानले तर समाधान’ अशी परिस्थिती दर्शविणारे आहे. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन सावध ठेवा. व्यापार-उद्योगात जे काम तुम्ही करत आहात त्यामध्ये काही तरी वेगळे करण्याची गरज निर्माण होईल. कदाचित बाजारातील चढ-उतार आणि प्रतिस्पध्र्याच्या हालचाली हे त्याचे कारण असेल. त्याकरिता जादा भांडवलही उभे करावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या प्रावीण्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. त्याच्या बदल्यात तुम्ही एखादी सवलत मिळवाल. घरगुती खर्च वाढवण्याची नांदी होईल.

कर्क स्वत:ची कोणतीही इच्छा अपुरी न ठेवता ती वेळेत पूर्ण करून टाका असा ग्रहांचा तुम्हाला संदेश आहे. व्यापार-उद्योगात जी कामे हातातोंडाशी येऊन ठप्प झालेली होती त्यांना गती देण्यासाठी एखाद्या मध्यस्थाचा उपयोग करावासा वाटेल. तुमचे व्यक्तिगत हितसंबंध, जाहिरात आणि प्रसिद्धी यामुळे बाजारातील प्रतिष्ठा उंचावेल. नोकरीमध्ये एखाद्या कारणामुळे तुमच्या कामाचे महत्त्व वाढेल. त्यामुळे तुम्ही भाव खाल. घरामध्ये प्रश्न कोणताही असो, तो सोडवण्यासाठी सगळ्यांना तुमचाच आधार वाटेल.

सिंह ज्या व्यक्तींनी एके काळी तुमच्या कामात अडथळे निर्माण केले होते किंवा तुम्हाला नकारघंटा ऐकवली होती त्यांच्याकडून आता तुम्हाला मित्रत्वाची भाषा ऐकू येईल. व्यवसाय-उद्योगात एखाद्या प्रतिष्ठा वाढविणाऱ्या कामाकरिता तुम्ही पूर्वी प्रयत्न केले असतील तर त्याला आता चांगली कलाटणी मिळेल. नोकरीमध्ये इतरांचे ऐकून न घेता माझे तेच खरे असा तुमचा दृष्टिकोन राहील. घरामध्ये एखादा कार्यक्रम लांबलेला असेल तर त्याचे नियोजन तातडीने करून तो कार्यक्रम घाईघाईने पार पाडाल.

कन्या आपल्या कोषात जाऊन काम करणारी तुमची रास आहे आणि त्यामध्येच तुमचा आनंद असतो. व्यवसाय-धंद्यात सध्या चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त वेगळे काम तुम्हाला करावेसे वाटेल. त्याला योग्य व्यक्तीकडून अनुमोदन मिळेल. नोकरीच्या ठिकाणी ज्या संस्थेमध्ये तुम्ही काम करीत आहात तेथे एखादी नवीन कार्यपद्धती अमलात आणण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. घरामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने इतरांना तुमच्या तालावर नाचवाल. त्याचा राग इतरांना येईल.

तूळ ज्या गोष्टी तुम्ही करू शकाल त्याचा ताबडतोब फायदा उठवाल. व्यापार-उद्योगात नवीन संकल्प मनामध्ये असतील. त्याच्याविषयी जरी तुम्हाला आकर्षण असले तरी दैनंदिन कामाकडे, तब्येतीकडे दुर्लक्ष किंवा आळस करून चालणार नाही. नोकरीमध्ये जे काम तुम्ही साध्य करीत आहात त्याचा उपयोग होणार नाही असे वाटेल, पण नंतर त्याचा फायदा होईल. वरिष्ठांच्या हो ला हो म्हटल्यामुळे कामाचा तणाव मात्र वाढेल. घरामध्ये सर्व जण तुमच्याकडे वेगवेगळ्या अपेक्षा ठेवून मागण्या करीत राहतील.

वृश्चिक पूर्वी काही कारणाने लांबविलेल्या कल्पना आता सत्यात उतरविण्याची तुम्हाला घाई असेल. व्यापार-उद्योगात नवीन कामगार नेमणे किंवा एखाद्या कामगाराची रदबदली करणे अशा कामांना प्राधान्य द्याल. पशाची कमतरता दूर करण्याकरिता वित्तीय संस्था किंवा हितचिंतकाची मदत मिळेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे महत्त्व तुम्ही संस्थेला/ वरिष्ठांना न बोलता कृतीतून दाखवाल. घरामध्ये जुने प्रश्न डोके वर काढतील. त्यात अक्कलहुशारीने तोडगा काढाल. घरातील सदस्याच्या समस्येमुळे तुम्ही चिंतेत पडाल.

धनू सगळीकडे अंधार असला आणि प्रकाशाचा एखादा छोटासा जरी किरण दिसला तरी आपण आशावादी बनतो. तशी तुमची स्थिती असेल. व्यवसाय-उद्योगात सध्या जशी परिस्थिती असेल तशी पाठ फिरवा म्हणजे एखादा सोईस्कर मार्ग निघून कामाला थोडाफार वेग मिळेल. नोकरीमध्ये कोणाची मदत तुम्ही मागितली असेल तर वरिष्ठ ती द्यायला तयार होतील. संस्थेतील राजकारणापासून लांब राहा. घरामध्ये आवडत्या व्यक्तीबरोबर तुमचे मन मोकळे करता आल्याने तुमच्या मनावरचा ताणतणाव कमी होईल.

मकर हातात घेतलेले काम लवकर संपवण्याची तुम्हाला घाई असेल. व्यवसाय-उद्योगात तुमच्या स्वभावातील कल्पकता उपयोगी पडेल. जे काम चालू आहे त्याचा दर्जा अधिक चांगला कसा होईल, याकडे तुमचे लक्ष असेल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामात इतरांनी हात टेकले होते, त्यात तुम्ही युक्ती लढवून काम मार्गी लावाल. वरिष्ठ तुम्हाला काही वेगळे भत्ते देतील. घरामध्ये इतरांना तुम्ही जो सल्ला द्याल त्यामध्ये तुमची दूरदृष्टी उपयोगी पडेल. नवीन वास्तू किंवा वाहन खरेदीच्या विचारांना चालना मिळेल.

कुंभ मनामध्ये एक आणि कृतीमध्ये काहीतरी वेगळेच असेल. व्यापार-उद्योगात जे खर्च अत्यावश्यक असतात त्यासाठी तरतूद करून ठेवावी लागेल. व्यावसायिक जागेची डागडुजी अणि कामगारांचे प्रश्न याकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या गुणांचा योग्य प्रकारे फायदा करून घेतील. पण त्याच्या बदल्यात तुम्हाला कोणतीही सवलत देणार नाहीत. बदली हवी असेल तर ताबडतोब प्रयत्न करा. घरामध्ये प्रिय व्यक्तींना सल्ला तुम्ही द्याल. मात्र तुम्हाला त्याचे कौतुक ऐकायला मिळेल.

मीन सहसा तुमचे अंदाज-आडाखे चुकत नाहीत. या आठवडय़ात प्रत्येक आघाडीवर तुम्हाला याचा फायदाच मिळेल. व्यापार-उद्योगात ज्या व्यक्तींनी कधीतरी पूर्वी तुम्हाला विरोध केला होता त्या व्यक्तीकडून आता तुमचे गोडवे ऐकायला मिळतील. कारण याचा तुमच्याकडून फायदा असेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची असूया जाणवेल. अवघड कामात तुम्ही सफल व्हाल. घरामध्ये एखाद्या सदस्यांच्या जीवनातील आनंददायी सोहळा ठरेल किंवा पार पडेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader