सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष : चंद्र आणि शुक्र या दोन स्त्री ग्रहांचा अग्नी तत्त्वातील राशीतून होणारा नवपंचम योग धिटाई, हिंमत आणि आत्मविश्वास देणारा योग आहे. नव्या जोमाने जबाबदाऱ्या पार पाडाल. वरिष्ठ आपल्या मुद्दय़ावर अडून बसतील. वास्तव परिस्थिती समजावून सांगणे हे मोठे आव्हान ठरेल. सहकारी वर्गाची विशेष मदत होईल. जोडीदाराच्या उत्साहाचा आणि ज्ञानाचा चांगला उपयोग होईल. मुलांच्या समस्या नीट समजून घ्याल. पचन आणि उत्सर्जन यावर परिणाम होईल. पथ्य पाळावे.
वृषभ : चंद्र-बुधाचा केंद्र योग काहीसा गोंधळात टाकणारा योग आहे. भावना आणि कर्तव्य यात संघर्ष निर्माण होईल. भावनांची नक्कीच कदर कराल. पण कर्तव्याला मुकू नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. सहकारी वर्गाला आपली मदत होईल. जोडीदाराच्या कामाचा व्याप आणि ताप वाढेल. कौटुंबिक वातावरणावर त्याचा परिणाम होऊ देऊ नका. मुलांशी मनमोकळा संवाद साधा. वातावरणातील कोरडेपणामुळे त्वचाविकार बळावतील.
मिथुन : चंद्र-नेपच्यूनचा समसप्तम योग कल्पना, संकल्पना अमलात आणणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात जिद्द आणि चिकाटी यांची गरज भासेल. वरिष्ठांना आपले मत पटवून द्याल. सहकारी वर्ग नव्या समस्या घेऊन येईल. सारासार विचार करून एकेक अडचणी दूर कराल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. एकमताने घेतलेले निर्णय कुटुंबाच्या हिताचे ठरतील. मुलांचा आत्मविश्वास वाढेल. लहान-मोठय़ा जखमेत पाणी, पू तयार होईल. काळजी घ्यावी.
कर्क : चंद्र-मंगळाचा केंद्र योग हा मनाची अस्वस्थता वाढवणारा योग आहे. सर्व बाजूंनी सारासार विचार करावा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. जुन्या ओळखीतील ज्येष्ठ मंडळींच्या भेटीगाठी होतील. चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. सहकारी वर्गाकडून वेळेत कामे करून घेणे आव्हानात्मक ठरेल. धीर सोडू नका. जोडीदाराची साथ मिळाल्याने भार हलका होईल. मुलांना आपल्या आधाराची गरज भासेल. मूत्रिपडाचे आरोग्य जपावे.
सिंह : चंद्र-गुरूचा समसप्तम योग हा प्रतिकार शक्ती वाढवणारा योग आहे. कर्तृत्वाला नवी दिशा मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात आपल्या अधिकार पदाचा चांगल्या मार्गाने उपयोग कराल. सहकारी वर्गाच्या कामातील त्रुटी दूर कराल. शिस्तीचा अवलंब चांगलाच कामी येईल. जोडीदाराच्या कामकाजात प्रगती होईल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. गर्दीची ठिकाणे, सामाजिक स्थळे यांना भेटी देणे टाळावे.
कन्या : रवी-चंद्राचा लाभ योग हा कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा योग आहे. द्विधा मन:स्थिती निर्माण होईल. नोकरी-व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल. शब्द जपून वापरा. वरिष्ठ अधिकारी आपल्या बारीकसारीक चुका नेमक्या हेरतील. सावध राहा. सहकारी वर्गासह फारशी सलगी न करता जेवढय़ास तेवढे ठेवावे. परिस्थिती निवळेल. जोडीदाराच्या अडचणी त्याचा तो सोडवेल. मुलांना वेळेचे महत्त्व पटवाल. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवावे.
तूळ : चंद्र-मंगळाचा लाभ योग हा प्रेरणादायी योग ठरेल. मानसिक व बौद्धिक उत्साह वाढेल. नव्या विचारांना चालना मिळेल. नोकरी-व्यवसायात स्वत:च्या प्रगतीसह इतरांचाही उत्कर्ष साधाल. सहकारी वर्गाकडून कामे चोखपणे पूर्ण करून घ्याल. नातेवाईकांची आत्मीयतेने चौकशी कराल. त्यांना धीर द्याल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. त्याच्या कामकाजात नव्या गोष्टींचा सामावेश होईल. पाय, पावले जड होणे, दुखणे असा त्रास उद्भवेल. व्यायाम व प्राणायाम आवश्यक!
वृश्चिक : आत्मकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांचा केंद्र योग हा गैरसमज निर्माण करेल. अशा परिस्थितीत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विरोध पत्करून जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. सहकारी वर्गाचा पाठिंबा मिळाल्याने आपली बाजू भक्कम बनेल. जोडीदार त्याच्या कामकाजात चुणूक दाखवेल. मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. अभ्यासाची गोडी लागेल. पडणे, झडणे, मार लागणे , हाड मोडणे यापासून सावधगिरी बाळगा.
धनू : मंगळ आणि नेपच्यूनचा बौद्धिक राशीतून होणारा नवपंचम योग हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती करेल. संशोधनास साहाय्य करेल. नोकरी-व्यवसायात मोठे निर्णय घेताना आर्थिक व्यवस्था मजबूत करावी लागेल. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्या साहाय्याने मोठी मजल गाठाल. लांबचे प्रवास संभवतात. जोडीदाराची चिडचिड समजून घ्याल. मुलांकडून अपेक्षा पूर्ण होतील. त्यांच्या आनंदात भर पडेल. कोरडय़ा त्वचेच्या तक्रारी वाढतील. सायनसचा त्रास बळावेल.
मकर : चंद्राची निरीक्षणक्षमता आणि शनीची परीक्षण करण्याची वृत्ती यांचा मेळ बसेल. एखाद्या गोष्टीची चिकित्सकपणे योग्य पारख करून घ्याल. नोकरी-व्यवसायात हिमतीने आणि जिद्दीने आपला कार्यभार सांभाळाल. सहकारी वर्गासह अनावश्यक चर्चा टाळा. शब्द जपून वापरा. जोडीदाराला नव्या संधी उपलब्ध होतील. मुलांचे शिक्षण आणि त्यांचे कामकाज यातील वेग वाढेल. मित्रमंडळी भेटतील. चर्चा रंगतील. पचन आणि उत्सर्जन यांची विशेष काळजी घ्यावी लागेल.
कुंभ : कुशाग्र बुद्धीचा बुध आणि सखोल ज्ञान, चिकाटीचा कारक शनी यांचा लाभ योग हा मेहनतीला यश देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात कामकाजाच्या बाबतीत अडीअडचणी निर्माण झाल्या तरी त्यातून लाभकारक मार्ग सापडेल. वरिष्ठ साहाय्यकारी झाले तर प्रगतीचा वेग वाढेल. सहकारी वर्गाला मौलिक मदत कराल. मुलांचे समज-गैरसमज दूर कराल. जोडीदाराच्या आर्थिक प्रश्नांना उत्तरे सापडतील. ऋतुमानातील बदलामुळे डोळे आणि घसा यांची काळजी घ्यावी.
मीन : भावनांचा कारक चंद्र आणि सारासार विचार करून निर्णय घेणारा बुध यांचा लाभ योग हा भावना व विचारांचा समतोल साधणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळवणे कठीण जाईल. सहकारी वर्ग मात्र मेहनतीची तयारी दाखवेल. जोडीदाराला नवे करार करण्याची संधी उपलब्ध होईल. मुलांवर आपल्या प्रेमाचे आणि शिस्तीचे बंधन आवश्यक आहे. पाठ, मणका आणि पायाचे स्नायू दुखावण्याची शक्यता आहे. काळजी घेणे आवश्यक!