मेष तुमची स्थिती ‘कळतं पण वळत नाही’ अशी असेल. अनेक चांगल्या गोष्टी तुम्ही मनाशी ठरवाल, पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर तुमचाच मोहरा का बदलला हे तुम्हालाच कळणार नाही. व्यापार-उद्योगात मात्र भावनेपेक्षा व्यवहारालाच महत्त्व जास्त असते हे लक्षात ठेवून त्या पद्धतीने वागा. नोकरीमध्ये एखादी गोष्ट रीतसर मागून मिळत नाही असे लक्षात आल्यावर तुमचे मन बंड करून उठेल. वरिष्ठांशी अदबीने वागा. विद्यार्थ्यांनी नशिबावर हवाला ठेवून चालणार नाही. वाहन किंवा मशीन हाताळताना बेसावध राहू नका.
वृषभ एखादे काम जेव्हा तुम्ही हातात घेता त्यापूर्वी त्यासंबंधीचे विचारमंथन आणि नियोजन बराच काळ मनात चालू असते. पण योग्य वेळ आल्याशिवाय त्याची वाच्यता तुम्ही करीत नाही. तुम्ही तुमचे बेत उघडपणे इतरांना यावेळी बोलून दाखवाल. व्यापार-उद्योगात कामाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक आणि इतर नियोजन झाले असेल, पण आयत्या वेळी त्यात फेरफार होतील. नोकरीमधील कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे. घरामध्ये तुम्ही हुकमत गाजवल्यामुळे इतरांना राग येईल.
मिथुन तुम्ही सतत नावीन्याच्या शोधात असल्यामुळे अस्वस्थ आणि अशांत असता. एखादे नवीन काम तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही बेचैन राहाल. पण ‘अतिघाई संकटात जाई’ हे विसरून चालणार नाही. त्यातून आवश्यक असलेल्या व्यक्तींची साथ कशी मिळते ही गोष्टही महत्त्वाची असेल. व्यवसाय-उद्योगामध्ये नवीन योजना आणि प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींकडून संभाव्य धोक्यांचा अंदाज घ्या. नोकरीमध्ये कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांकडून गरजेपेक्षा जास्त मुदत मागून घ्या.
कर्क घरगुती प्रश्न तुमचे लक्ष वेधवतील. तुमचा स्वभाव दूरदर्शी आहे. कोणत्या व्यक्तीचा कधी उपयोग होईल, हे माहीत नसल्यामुळे सगळ्यांशी चांगले संबंध ठेवता. अडचणीच्या वेळी हेच संबंध तुम्हाला उपयोगी पडतात. दैनंदिन कामामध्ये तुम्हाला अडचणींचा डोंगर पार करायचा आहे. व्यापार-उद्योगात भविष्यात पूर्वीचे हितसंबंध उपयोगी पडतील. नोकरीतील अवघड कामातला महत्त्वाचा टप्पा पार कराल. घरामध्ये ‘कर्तव्य हीच काशी’ असे तुमचे ब्रीदवाक्य असेल. विद्यार्थ्यांनी प्रयत्नांवर विश्वास ठेवावा.
सिंह ज्यावेळी साध्या आणि सरळ मार्गाने तुम्हाला यश मिळत नाही त्यावेळी तुम्ही चिथावून जाता आणि आडवळणाचा मार्ग स्वीकारता. पण असे करण्यामुळे तुमचा धोका प्रमाणाबाहेर वाढेल. व्यवसाय-उद्योगात नवीन प्रयोग करून बघण्याचा मोह होईल. पण त्यापेक्षा ‘जैसे थे’ ठेवणे चांगले. नोकरीमध्ये लक्ष कामावर केंद्रित करा. तुमच्या प्रतिक्रिया मनातच ठेवा. घरामध्ये क्षुल्लक कारणावरून तुमच्या रागाचा पारा वर जाईल. नंतर तुमचीच चूक तुम्हाला लक्षात येईल. विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवावे.
कन्या तुमच्या राशीला शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध काम करण्याची सवय आहे. त्यामध्ये फेरफार झाले की तुम्ही गांगरून जाता. या सप्ताहात तुमची जशी परिस्थिती असेल तसा तुमचा पवित्रा बदलून काम करणे भाग पडेल. व्यापार-उद्योगामध्ये एखाद्या मध्यस्थाची मदत घेणे भाग पडेल. नोकरीमध्ये तुमच्या हातून छोटी जरी चूक झाली तरी वरिष्ठांना सहन होणार नाही. आणि तेच काम पुन्हा करण्याचा त्यांचा आग्रह राहील. घरामध्ये अनेक डगरींवर हात ठेवायला लागल्याने तुमची धावपळ उडेल.
तूळ प्रत्येक गोष्ट वेळेत आणि शिस्तबद्धपणे पार पाडणे तुम्हाला आवडते. आता प्रयत्न करूनही हे सगळे न घडल्याने तुम्ही चिथावून जाल. क्वचित प्रसंगी वेडेवाकडे निर्णय घेण्याचाही विचार मनात डोकावेल. हीच तुमची खरी कसोटी आहे असे समजून शांत राहा. व्यवसाय-उद्योगात प्रतिस्पर्धी चकवा निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यावर नीट विचार करून कृती करा. नोकरीमध्ये तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जपून बोला. घरामध्ये जोडीदाराशी तात्त्विक मुद्दय़ावरून ‘तू तू मैं मैं’ होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात धोका पत्करू नये.
वृश्चिक तुम्हाला राग चटकन येतो, पण तो तुम्ही चेहऱ्यावर दाखवत नाही. ज्या व्यक्तींकडून तुम्ही अपेक्षा ठेवाल त्यांच्याकडून त्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचा राग अनावर होईल. व्यापार-उद्योगात बाजारातील परिस्थिती जशी असेल त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे धोरण नमते ठेवावे लागेल. नोकरीमध्ये संस्था किंवा वरिष्ठ यांच्याविषयी मतप्रदर्शन करताना जपून राहा. नाहीतर त्यांचा गैरसमज होईल. घरामध्ये बुजुर्ग व्यक्तींचा सल्ला बरोबर असला तरी तो तुम्हाला पटणार नाही. विद्यार्थ्यांनी त्यांचे लक्ष विचलित होऊ देऊ नये.
धनू एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये असते, त्यावेळेला ती मिळेपर्यंत तुम्ही अस्वस्थ असता आणि समोरच्या व्यक्तींनादेखील करता. तुमचा हा स्वभाव विशेषरूपाने जागृत होईल. व्यापार-उद्योगामध्ये प्राप्तीचे प्रमाण वाढविण्याकरिता नवीन हितसंबंध जोडावेसे वाटतील. पण ‘जुने ते सोने’ हे विसरू नका. कारखानदार व्यक्ती छोटी परदेशवारी करून नवीन मार्केटचा शोध घेतील. तुमच्या कौशल्याला वाव असेल. त्या नादात अतिसाहस नको. घरामध्ये एखादा वेगळा कार्यक्रम ठरेल. विद्यार्थ्यांनी स्मरणशक्तीवर ताण देऊ नये.
मकर सहसा न दिसणारी एकदम निर्णय घेण्याची वृत्ती तुमच्यात निर्माण होईल. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे त्या गोष्टीत तुम्ही हट्टी बनाल. त्यामध्ये तुमचे उद्दिष्ट पूर्ण होईल, पण ते खर्चीक असेल. व्यापार-उद्योगात कामाचा पसारा वाढवण्यासाठी ज्या व्यक्तींशी हितसंबंध ठेवाल त्यांची नीट माहिती काढा. नोकरीमधल्या धावपळीचा कंटाळा येईल. वरिष्ठ मात्र तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. घरामध्ये जबाबदाऱ्या वाढण्याची नांदी होईल. प्रत्येक सदस्य आपल्या मागण्या तुमच्या पुढे ठेवतील. विद्यार्थी खूश असतील.
कुंभ मनामध्ये अनेक नवीन कल्पना आणि विचारांचे काहूर माजलेले असेल. तुमच्या क्षेत्रामधल्या अनुभवी व्यक्तीचा आणि हितचिंतकांचा सल्ला घेणे चांगले. व्यवसाय-उद्योगामध्ये जादा पैसे मिळवण्याच्या मोहामुळे अतिसाहस करावेसे वाटेल, पण त्यापासून लांब राहा. परदेश व्यवहार करताना त्यातल्या कायदेशीर बाजूचा अभ्यास करा. नोकरीमध्ये वरिष्ठांना कोणतेही आश्वासन देण्यापूर्वी तुम्ही ते निभावून नेऊ शकाल का, याचा विचार करा. घरामध्ये भावंडासंबंधी अर्धवट बातमी कळल्यामुळे एखादे कोडे निर्माण होईल.
मीन माणसाचे मन एकदा सैरभैर झाले की त्याच्या हातून चुका व्हायला वेळ लागत नाही. हे टाळण्यासाठी तुम्हाला तुमचे खरे मित्र आणि हितचिंतक मदत करतील. व्यवसाय-उद्योगात उत्पन्न वाढविण्याकरिता हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. शक्य असेल तर एखादा जोडधंदा बघावा. नोकरीमध्ये नवीन पद्धतीचे काम तुम्हाला दिले गेल्यामुळे वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. घरामध्ये वादविवाद नव्याने डोके वर काढतील. शक्यतो मोठे आर्थिक धोके पत्करू नयेत.